Tur Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Cultivation : वेळेवर करा तूर लागवड

Tur Farming : तूर पिकाची पेरणी १५ जून ते १५ जुलै या दरम्यान करावी. जास्तीत जास्त ३० जुलैपर्यंत पेरणी पूर्ण करावी. पेरणीस जसजसा उशीर होईल, तसे उत्पादनात घट येते. त्यामुळे वेळेत पेरणी पूर्ण करावी.

Team Agrowon

डॉ. विजयकुमार गावंडे, वैभव गुल्हाने

Tur Production : कडधान्य पिकांपैकी तूर हे मुख्यत्वेकरून खरीप हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक आहे. तूर पिकाची सलग तसेच मिश्र पीक म्हणून लागवड केली जाते. तूर पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य वाणांची निवड, वेळेवर पेरणी, बीजप्रक्रिया, रासायनिक खतांचा शिफारशीप्रमाणे वापर, ओलित व्यवस्थापन, पीक व्यवस्थापन तसेच तण नियंत्रण या महत्त्वाच्या बाबी आहेत.

जमीन

साधारणपणे ६.५ ते ८.५ दरम्यान आम्ल विम्ल निर्देशांक असलेली जमीन लागवडीसाठी योग्य ठरते.

मध्यम ते अति काळी तसेच कसदार भुसभुशीत पोताची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकासाठी योग्य आहे.

तूर पीक घेताना पिकाची फेरपालट होणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे मुख्यतः मर व वांझ रोग तसेच किडींचे प्रमाण कमी राहून उत्पादन वाढीस मदत होते.

एकाच जमिनीत दरवर्षी तूर लागवड करणे टाळावे.

हवामान

तूर हे उष्ण प्रदेशातील पीक असून वाढीच्या काळात पिकास स्वच्छ सूर्यप्रकाश आवश्यक ठरतो. प्रखर सूर्यप्रकाशात चांगले उत्पादन मिळते, तर ढगाळ हवामानात पिकाची वाढ खुंटते. पिकाची १८ ते २९ अंश सेल्सिअस उष्ण तापमानात चांगली वाढ होते. साधारणपणे ३५ अंश सेल्सिअस तापमान देखील तूर पीक सहन करू शकते.

पूर्वमशागत

उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करून जमीन उन्हामध्ये चांगली तापू द्यावी. शेतातील पीक अवशेष, पालापाचोळा गोळा करून शेताची स्वच्छता करावी.

त्यानंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी हेक्टरी १० ते १२ गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट शेतात पसरवून जमिनीत चांगले मिसळून घ्यावे.

पेरणीची वेळ

साधारणतः ७५ ते १०० मि.मि. पाऊस झाल्यानंतर पेरणी करणे फायदेशीर ठरते. म्हणजेच १५ जून ते १५ जुलै या दरम्यान तूर पिकाची पेरणी करावी. जास्तीत जास्त ३० जुलैपर्यंत पेरणी पूर्ण करावी. कारण, पेरणीस जसजसा उशीर होईल तसे उत्पादनात घट येते.

पेरणीस साधारण १५ दिवस विलंब झाल्यास उत्पादनात २५ ते २७ टक्के घट येते. पेरणीस ३० दिवस उशीर झाल्यास, उत्पादनात ५० ते ५८ टक्के घट होते. पेरणीस सरासरी जितका उशीर होईल तसे प्रतिदिन ८० किलो प्रति हेक्टर प्रमाणे उत्पादनात घट होते.

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास, थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ४ ते ५ ग्रॅम प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. यामुळे पेरणीनंतर जमिनीतील मुळकुजव्या रोगाच्या जिवाणूंमुळे बियाणांचे तसेच अंकुरलेल्या रोपांचे नुकसान टाळले जाते.

तुरीच्या बियाणास चवळी गटाचे रायझोबियम जिवाणू खते लावल्यास उत्पादनात साधारण १० ते २२ टक्के वाढ मिळते. त्याकरिता २५० ग्रॅम जिवाणू संवर्धक गुळाच्या थंड द्रावणात मिश्रण करून प्रति १० ते १२ किलो बियाण्यास चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यास एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. त्यानंतर वरीलप्रमाणे जिवाणू संवर्धक बियाणास लावून बियाणे सावलीत सुकवावे आणि त्वरित पेरणी करावी. जिवाणू संवर्धक लावून झाल्यानंतर बियाणांची पुन्हा साठवणूक करू नये. प्रथम रासायनिक बीजप्रक्रिया आणि त्यानंतर जैविक बीजप्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन

पेरणीच्या वेळी हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश याप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा द्यावी. शिफारशीत खताची मात्रा वेगवेगळ्या खतांद्वारे जसे, ५० किलो युरिया, ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टर किंवा १२५ किलो डाय अमोनिअम फॉस्फेट प्रति हेक्टर प्रमाणे देता येईल. माती परिक्षण अहवालानुसार आवश्यकता भासल्यास, २० ते २५ किलो गंधक तसेच १५ किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टर प्रमाणात द्यावे.

आंतरमशागत

तूर बियाची उगवण झाल्यानंतर साधारणपणे १० ते १५ दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एक किंवा दोन रोपे ठेवावीत. तुरीचे पीक पेरणीनंतर सुरवातीला अतिशय सावकाश वाढते. त्यामुळे पेरणीनंतर साधारण ६० ते ९० दिवस पीक तणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिता कमीत कमी दोन वेळा निंदणी करावी. पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी पहिली कोळपणी आणि त्यानंतर २० ते २५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या कराव्यात.

वाण निवड

तूर पिकाच्या परिपक्वता कालावधीनुसार वाणांचे वर्गीकरण केले जाते.

अति लवकर होणारे वाण : १३० दिवसांच्या आत.

लवकर परिपक्व होणारे वाण : १३१ ते १५० दिवस.

मध्यम लवकर तयार होणारे वाण : १५१ ते १६५ दिवस.

मध्यम कालावधीचे वाण : १६६ ते १८५ दिवस.

उशिरा परिपक्व होणारे वाण : १८६ दिवसांपेक्षा अधिक.

जमीन, पर्जन्यमान आणि पीक पद्धतीचा विचार करून लागवडीसाठी योग्य वाणाची निवड करावी.

जमीन आणि पर्जन्यमानाप्रमाणे वाण निवड

मध्यम जमीन तसेच मध्यम पर्जन्यमान असल्यास लवकर तयार होणारे वाण लागवडीसाठी निवडावेत. उदा. आय. पी. ए. १५-०६, ए.के.टी. ८८११, आय.सी.पी.एल. ८७ (प्रगती) ए. राजेश्वरी, गोदावरी ए, रेणुका ए, फुले तृप्ती.

मध्यम ते भारी जमीन आणि खात्रीशीर पर्जन्यमान असल्यास, मध्यम कालावधीचे वाण निवडावेत. उदा. पी. के. व्ही. तारा, विपुला ए. बी. एस. एम. आर. ७३६, बी. एस. एम. आर. ८५३, बी. डी. एन. ७०८, बी. डी. एन. ७१६, पी. डी. के. व्ही. आश्लेषा.

भारी जमीन तसेच खात्रीशीर पर्जन्यमान असल्यास, उशिरा तयार होणारे वाण निवडावेत. उदा. आशा (आय. सी. पी. एल. ८७११९) किंवा पी. डी. के. व्ही. आश्लेषा.

पीक पद्धतीनुसार वाण निवड

अ) दुबार पीक : तूर पिकानंतर लगेच दुसरे पीक घ्यावयाचे असल्यास, लवकर तयार होणारे वाण उदा. आय. पी. ए. १५-०६, ए.के.टी ८८११ ए.आय.सी.पी.एल. ८७ (प्रगती) यापैकी वाणाची निवड करावी.

ब) आंतरपीक : तूर पिकामध्ये साधारणपणे मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी इत्यादी पिके आंतरपीक म्हणून घेतली जातात. त्याकरिता मध्यम ते उशिरा तयार होणारे वाण उदा. आशा, बी. एस. एम. आर. ८५३, पी. के. व्ही. तारा, पी. डी. के. व्ही. आश्लेषा यापैकी वाणाची निवड करणे योग्य ठरते.

लागवड पद्धती

तूर पिकाच्या विविध वाणांचे हेक्टरी बियाणे प्रमाण तसेच लागवड अंतर हे वेगवेगळे असते. खालील तक्त्यात लागवड पद्धतीनुसार वाणनिहाय बियाणे प्रमाण आणि लागवडीसाठी शिफारशीत अंतर दिले आहे.

वाण हेक्टरी बियाणे (किलो) दोन ओळींतील अंतर (सेंमी) दोन झाडांतील अंतर (सेंमी)

सलग लागवड

आय.सी.पी.एल. ८७ ४० ते ४५ ४५ २०

ए.के.टी. ८८११, आय. पी. ए. १५-०६, फुले राजेश्वरी, गोदावरी, फुले तृप्ती, बी.डी.एन.७१६ २५ ते ३० ६० २०

पी.के.व्ही. तारा, बी.एस.एम.आर. ७३६, बी.एस.एम.आर. ८५३, विपुला, आशा, पी.डी.के.व्ही. आश्लेषा १२ ते १५ ९० ते १२० २० ते ३०

आंतरपीक

मूग, उडीद, सोयाबीन इत्यादी पिकांमध्ये तुरीचे मध्यम लवकर ते मध्यम उशिरा तयार होणाऱ्या वाणांची लागवड ५ ते ६ १८० २० ते ३०

जमिनीच्या प्रतीनुसार दोन ओळींतील किंवा दोन झाडांतील अंतर अवलंबून असते. भारी व खोल जमीन असल्यास दोन ओळींतील तसेच झाडांतील अंतर जास्त ठेवावे. मात्र हलक्या जमिनीत अंतर कमी ठेवणे फायदेशीर आहे. पेरणीस जसजसा उशीर होईल तसे अंतर कमी करावे.

डॉ. विजयकुमार गावंडे ९८२२७ ५५७७५

(वरिष्ठ शास्त्रज्ञ- तूर पैदास, कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT