Cotton
Cotton  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Verity : कापसाच्या वेगवेगळ्या जातींचा इतिहास ठाऊक आहे का?

Team Agrowon

डॉ. आनंद कर्वे

Cotton Verity सरकीवर असणाऱ्या सेल्युलोजमय तंतूंना आपण कापूस म्हणतो. असे तंतू अनेक वनस्पतींच्या बियांवर असतात आणि त्यांच्यामुळे त्या बिया (Cotton Seed) वाऱ्याने दूर नेल्या जातात. पण सरकीवरील तंतूंची रचना ते बीज वाऱ्याने दूर नेले जाईल अशी नसते. मग या तंतूंचा कपाशीला (Cotton) उपयोग तरी काय असावा?

यासंबंधी माझे मत पुढीलप्रमाणे आहे. मी प्रयोग करून असे दाखवून दिले आहे की बी रुजून येण्यापूर्वी जर आपण जमिनीतल्या सूक्ष्मजंतूंना एखादा कार्बनचा स्रोत (Carbon Source) पुरविला, तर मातीतल्या सूक्ष्मजंतूंची संख्या वाढते.

मातीत सूक्ष्मजंतूंची संख्या जेवढी अधिक, तेवढी त्या मातीची सुपीकताही अधिक असते असा कृषिशास्त्राचा (Agriculture Science) नियमच आहे आणि त्यानुसार अशा मातीत रुजून येणारी रोपे अधिक जोमदार असतात.

म्हणून माझ्या मते जमिनीतले सूक्ष्मजंतूं सरकीवरील सेल्युलोजमय तंतू खाऊन आपली संख्या वाढवतात आणि जमिनीची सुपीकताही वाढवतात.

अमेरिकेतील गॉसिपियम हिर्सुटम आणि गॉसिपियम बार्बाडेन्सी या कापसाच्या जातींची जगाला माहिती होईपर्यंत जगात जे सुती कापड वापरले जाई ते भारतातल्या देशी किंवा जरिला कापूस (गॉसिपियम हर्बेशियम) आणि देवकापूस (गॉसिपियम आर्बोरियम) या जातींच्याच सुतापासून बनविले जात असे.

इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यावर सूत काढणे आणि कापड विणणे ही कामे यांत्रिक पद्धतीने होऊ लागली. त्यासाठी लागणारा कापूस भारतासह इजिप्त, सूदान व अमेरिकेतून येत असे.

पुढे मुंबईत कापड गिरण्या निघाल्या आणि विदर्भात गॉसिपियम हिर्सुटम या अमेरिकन कापसाचे चांगले उत्पन्न येते असे आढळून आल्याने विदर्भात कापूस शेती चांगलीच फोफावली. गेल्या शतकात भारतातला एक तृतियांश कापूस एकट्या महाराष्ट्रात पिकत असे तो विदर्भातल्या कापसामुळेच.

महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यापासून नाशिक जिल्ह्यातील मनमाडपर्यंत असा दक्षिणोत्तर पट्टा हा दुष्काळी भाग आहे. येथे नैऋत्य मॉन्सूनचा पाऊस फारच माफक, म्हणजे एकूण फक्त १५० मी.मी. पडतो आणि तोही बेभरंवशाचा असतो.

हमखास पडतो तो सप्टेंबर-ऑक्टोबरमधला ईशान्य मॉन्सूनचा पाऊस, पण तोही फक्त सुमारे २५० ते ३०० मि.मी. येवढाच. या दुष्काळी प्रदेशाला सह्याद्रीमधील धरणांतले पाणी कालव्यांवाटे पुरविले जाते म्हणून या भागाला डेक्कन कॅनाल्स रीजन (Deccan Canals Region) असेही म्हटले जाते.

जेव्हा कालव्याच्या पाण्याची सोय नव्हती तेव्हा या भागात फक्त रब्बी ज्वारी, करडई किंवा जवस अशी काही मोजकीच पिके घेतली जात. पण कालव्यांचे पाणी मिळू लागल्यापासून या दुष्काळी भागात भाजीपाला, ऊस, द्राक्षे, भुइमूग, गहू, चाऱ्याची पिके, फळे, इ. पिके घेण्यात येऊ लागली.

पूर्वी सोलापूर जिल्ह्यात देशी जरीला कपाशीची ऑगस्टमध्ये लागण केली जाई. रब्बी हंगामात बोंडआळी या कीटकाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणावर होतो आणि देशी कपाशी बोंडआळीला कमी प्रमाणात बळी पडते, यामुळे या पिकापासून शेतकऱ्यांना थोडेफार उत्पन्न मिळे, १९६७-६८ साली निंबकर सीड्स् कंपनीने कर्नाटकात लक्ष्मी या नावाने लोकप्रिय झालेले अमेरिकन कपाशीचे (गॉसिपियम् हिर्सुटम्) वाण डेक्कन कॅनाल्स भागात आणले.

एप्रिल महिन्यात कालव्याचे पाणी देऊन पेरणी केल्यास सप्टेंबर महिन्यातील मोठ्या पावसाच्या आत या पिकाच्या बहुतेक सर्व वेचण्या पूर्ण होत असत.

एप्रिल आणि मे या महिन्यांमधल्या कडक उन्हाळ्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव कमीच असायचा आणि पावसाळ्यात पाऊसमान अत्यंत कमी असल्याने फवारलेली कीटकनाशके पावसाने धुतली जाण्याची शक्यताही फार कमी असे. त्यामुळे लक्ष्मी वाणापासून हेक्टरी २५ क्विंटल कापूस सहज मिळायचा.

हा कापूस संपूर्ण भारतात सर्वप्रथम बाजारात येत असल्याने त्याला भावही चांगला मिळत असे. लक्ष्मी कपाशीचे बी कर्नाटकातून आणावे लागे पण पुढे महाराष्ट्र सरकारने परप्रांतातून कपाशीचे बी आणण्यावर काही निर्बंध घातले आणि त्यांमुळे निंबकर सीड्सचा लक्ष्मी कपाशीचें बी विकण्याचा धंदा बंद पडला.

श्री निंबकरांनी हायकोर्टात लढा देऊन सरकारला हे निर्बंध मागे घ्यायला लावले, पण त्यातून शहाणपणा शिकून त्यांनी आपली स्वतःची निंबकर कपाशीची वाणे निर्माण केली. या वाणांचे आयुष्य लक्ष्मीपेक्षा कमी असूनही उत्पन्न अधिक येई, पण ही वाणे डेक्कन कॅनाल्स भागातच चांगली ठरली.

१९७० ते १९८० या दशकात कपाशीची संकरित वाणे निघाली. गुजरातमधील शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकात पटेल यांनी हिर्सुटम कपाशीच्याच दोन वाणांच्या संकरातून निर्माण केलेल्या एच-४ या वाणाने संकरित कपाशीची सुरुवात झाली.

संकर करण्यासाठी एका वाणाच्या फुलातले पूंकेसर हाताने काढून टाकले की त्याचे मादीवाण होई आणि दुसऱ्या वाणाचे परागकण वापरून हातानेच त्याचे परागीकरण केले की त्यापासून संकरित बीज मिळायचे.

हाताने संकर करून तयार केलेले हे बी महाग असे पण त्याचे उत्पन्न चांगले येत असल्याने ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले.

याच सुमाराला वरलक्ष्मी नामक लांब धाग्याच्या कपाशीचेही एक संकरित वाण आले. हे वाण अमेरिकन कापसाच्याच हिर्सुटम आणि बार्बाडेन्सी या दोन भिन्न जातींच्या संकरातून निर्माण केले होते.

लांब धाग्याचा कापूस भारतात मुख्यतः इजिप्तमधून येतो. वरलक्ष्मी वाण आल्याने इजिप्तमधून होणारी कपाशीची आयात बंद पडायला पाहिजे होती, पण तसे काही झाले नाही कारण लांब धाग्याचा कापूस ही भारताच्या उपयोगाची इजिप्तमधील एकमेव वस्तु होती.

त्यामुळे इजिप्त आणि भारत यांच्यातील व्यापार चालू ठेवण्यासाठी भारताला इजिप्तकडून कापूस घेण्यावाचून गत्यंतरच नव्हते, आणि दुसरे कारण असे होते की भारतातला कापडउद्योग इतका वाढला होता की त्याची गरज भागविण्यासाठी परदेशातून कापूस आयात करावाच लागतो.

भारतात अमेरिकन कापूस आल्यापासून देशी कापूस आणि देवकापूस या दोन भारतीय जातींचे महत्त्व कमी होत गेले. एकेकाळी प्रसिद्ध असलेली ढाक्क्याची मलमल देवकापसापासूनच केली जायची. पण देवकापूस बहुवर्षीय असल्याने आणि त्याची शेतात लागवड केली जात नसल्याने तो दुर्लक्षिला गेला.

परसदारात वाढणाऱ्या या झाडाचा कापूस हल्ली फक्त समई आणि निरांजनाच्या वातींसाठी वापरला जातो, पण शेताची दरवर्षी नांगरट करून दरवर्षी नव्याने बी पेरण्याची गरज नसल्याने तामिळाडूतील कोइंबतूर येथील जी.डी.नायडू नामक एका उद्योगपतीने ४ एकरांवर देवकापूस लावून त्याची प्रायोगिक राई निर्माण केली होती आणि फारशी मशागत न करताही प्रति हेक्टर चांगले उत्पन्न येते हे दाखवून दिले होते.

माझ्या माहितीप्रमाणे देवकपाशीवर दुसरे महत्त्वाचे काम मध्यप्रदेशात डॉ. झुल्का नामक शास्त्रज्ञाने केले होते. त्याने देवकपाशीवर एच-४ या वाणाचे कलम करून एच-४ या वार्षिक वाणाचे बहुवार्षिक वाणात रूपांतर केले आणि वृक्षतोडीने उजाड झालेल्या जंगलात ही कलमे लावली.

तिथले आदिवासी ज्याप्रमाणे जंगलातील इतर झाडांपासून काही ना काही उत्पन्न मिळवतात त्याप्रमाणेच त्यांना या कलमांपासून कापसाचे उत्पन्न मिळू लागले. अर्थात ही दोन्ही उदाहरणे प्रायोगिक कामांची आहेत. त्यातून पुढे काही निष्पन्न झाले की नाही हे मला समजले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT