Kolhapur Jilha Bank Politics : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकाराचे दुसरे सत्ता केंद्र असलेल्या जिल्हा बँकेत ४ आमदारांनी पुन्हा गळ्यात माळ पाडून घेतली आहे. मागच्या २०१९ विधानसभा निवडणुकीत ६ आमदार जिल्हा बँकेत होते. यामध्ये उपाध्यक्ष काँग्रेसचे राजू आवळे व राजेश पाटील यांचा पराभव झाला. उर्वरित चार संचालकांच्या गळ्यात पुन्हा आमदारकीची माळ पडली आहे, त्यात विद्यमान अध्यक्ष हसन मुश्रीफ यांचा समावेश आहे.
तालुक्याच्या राजकारणावर साखर कारखाना किंवा जिल्हा बँकेची सुत्रे हातात ठेवण्यासाठी नेते मंडळी जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी आग्रही असतात. जिल्हा बँकेच्या संचालकपदाची सुत्रे हातात असतील तर आमदारकीचे गणित जुळण्यास फार काळ लागत नाही असे समीकरण कोल्हापूर जिल्ह्याचे झाले आहे. नेतेमंडळी जिल्हा बँकेत जाण्यासाठी प्रयत्नशील असतात. जिल्हा बँकेत संचालक झाले तर तालुक्यातील विकास सेवा संस्थांवर वर्चस्व ठेवता येते. तालुक्यातील शेतकरी हा विकास संस्थेशी जोडलेला असतो.
संचालक पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतून सहकार्य करून त्याचा फायदा विधानसभेत घ्यायचा, अशी रणनीती असते. त्यातून २०१९ च्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह स्वर्गीय पी. एन. पाटील, आमदार राजू आवळे, डॉ. विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, राजेश पाटील हे सहाजण आमदार झाले.
जिल्हा बँकेच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत हातकणंगले विकास सेवा संस्था गटातून आमदार अमल महाडिक संचालक म्हणून आले. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामधून विजय मिळवला.
अमल महाडिक यांच्याशिवाय पालकमंत्री मुश्रीफ, डॉ. विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर या चार संचालकांच्या गळ्यात पुन्हा आमदारकीची माळ पडली आहे. तर विद्यमान उपाध्यक्ष राजू आवळे हे हातकणंगलेतून, तर संचालक राजेश पाटील चंदगड मतदारसंघातून पराभूत झाले.
याशिवाय संचालक ए. वाय. पाटील राधानगरीतून रिंगणात होते; पण त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला. राधानगरीतूनच संचालक रणजितसिंह पाटील यांचे वडील माजी आमदार के. पी. पाटील पराभूत झाले.
‘गोकुळ’ मध्ये पत्नीचा पराभव
चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचा ‘गोकुळ’च्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्याचबरोबर त्यांचे मेहुणे व माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांचे पूत्र वीरेंद्र मंडलिक यांचाही सत्तारूढ गटातून पराभव झाला होता. यावेळी राजेश पाटील हेच चंदगडमधून पराभूत झाले.
यावेळच्या निवडणुकीत साखर कारखान्यांशी संबंधित ६ जणांनी विजयश्री खेचून आणली आहे. यापैकी पालकमंत्री हसन मुश्रीफ, डॉ. विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर हे विद्यमान सभागृहात होते. यात नव्याने राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक, ‘कुंभी’चे अध्यक्ष चंद्रदीप नरके व ‘जवाहर’चे संचालक राहुल आवाडे यांची भर पडली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.