Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : 'उजनी'चे सर्वेक्षण होऊनही गाळ तसाच

Ujani Dam Water Capacity : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार असलेले उजनी धरण दरवर्षी उन्हाळ्यात तळ गाठते. त्यामुळे ‘धरण उशाला अन्‌ कोरड घशाला’ याची प्रचिती जिल्ह्यातील सर्वांना येते.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उजनी धरणात सध्या २० टीएमसी गाळ आहे. त्याचे एक वर्षापूर्वी सर्वेक्षण होऊन अहवाल शासनाला सादर करण्यात आला, पण गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही.

१९८० नंतर सुरवातीच्या दोन वर्षांनंतर तब्बल ४२ वर्षे धरण दरवर्षी उन्हाळ्यात उणे पातळीत गेले. धरणाची क्षमता १२३ टीएमसी आहे, पण गाळामुळे २० टीएमसी पाणी वापरता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार असलेले उजनी धरण दरवर्षी उन्हाळ्यात तळ गाठते. त्यामुळे ‘धरण उशाला अन्‌ कोरड घशाला’ याची प्रचिती जिल्ह्यातील सर्वांना येते. गाळ काढल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटेल व शेतकऱ्यांनाही वेळेवर पाणी मिळेल. त्यातून जिल्ह्याला दुष्काळाची तीव्रता जाणवणार नाही.

दरम्यान सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, धाराशिव या जिल्ह्यांतील ४७ योजना उजनी धरणावरच अवलंबून आहेत. दुसरीकडे, जिल्ह्यातील एक लाख ६९ हजार हेक्टरला धरणातून थेट पाणी मिळते. त्यामुळे रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांखालील क्षेत्र वाढले आहे. सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून सोलापूरची देशभरात नवी ओळख निर्माण झाली. सोलापूर जिल्ह्यात सध्या ४२ साखर कारखाने आहेत.

कर्जत जामखेड, धाराशिव, इंदापूरसह सोलापूर शहर व जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतींच्या योजना उजनी धरणावरूनच आहेत. गतवर्षी धरण उणे ६० टक्के गेले आणि शेतकऱ्यांना गरज असतानाही एक आवर्तन सोडता आले नाही.

दुसरीकडे, शहरांनाही पाणीपुरवठा व्यवस्थित होऊ शकला नाही, त्यांना दुबार, तिबार पंपिंगवर कोट्यवधींचा खर्च करावा लागला. अशी स्थिती प्रत्येक दोन-तीन वर्षांतून एकदा निर्माण होत असतानाही शासनाकडून धरणातील गाळ काढण्याची कार्यवाही झालेली नाही, हे विशेष.

‘कृष्णा-मराठवाडा’ स्थिरीकरणानंतर..

कृष्णा-मराठवाडा स्थिरीकरणानंतर नीरा नदीतील पाणी उजनी धरणात आणले जाणार आहे. जेवढे पाणी नीरा नदीतून उजनी धरणात जमा होईल, तेवढेच पाणी मराठवाड्याला दिले जाणार आहे. या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, पण यामुळे उजनीतील सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावर अतिक्रमण होऊ नये, एवढी माफक अपेक्षा सोलापूरकरांची आहे.

धरणातील पाणीसाठ्याची स्थिती

मृत साठा ६३.६६ टीएमसी

उपयुक्त साठा ५९.५७ टीएमसी

एकूण साठा १२३.२८ टीएमसी

धरणातील गाळ अंदाजे २० टीएमसी

धरणातील गाळाचा एक वर्षापूर्वी सर्व्हे झाला आहे. त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून, आगामी काळात गाळ काढण्याची कार्यवाही होईल. धरणात अंदाजे १८ ते २० टीएमसीपर्यंत गाळ आहे.
- आर. पी. मोरे, कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात उसाची ३१ हजार हेक्टरवर लागवड

Cashew Subsidy : काजू अनुदान अर्ज भरण्यासाठी राहिले केवळ चार दिवस

NCP Sharad Pawar Candidate 3rd List : कृषिमंत्र्यांच्या विरोधात शरद पवारांनी शिलेदार मैदानात उतरवला; परळीतून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी

Water Storage : नंदुरबार जिल्ह्यातील अनेक बंधारे भरले; भूजल पातळी वाढण्याची शक्यता

Agriculture Theft : शिवारातून कापसासह केळी, शेती यंत्रणांची चोरी

SCROLL FOR NEXT