Jalgaon News : खानदेशात खरिपात कापूस, उडीद, मूग, ज्वारी आदी पिकांची हानी झाली आहे. पुढे रब्बी हंगामातील पिकांवर मदार असणार आहे. रब्बीची पेरणी सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक होऊ शकते. जळगावात हरभऱ्याची सर्वाधिक सुमारे एक लाख हेक्टरवर पेरणी होणार असून, जिल्ह्यात सुमारे १०० ते ११० टक्के क्षेत्रात पेरणी होईल, असे चित्र आहे.
पाऊसमान यंदा चांगले आहे. जळगाव जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र पावणोदन लाख हेक्टर आहे. तर पेरणी एक लाख ७० हजार हेक्टरपर्यंत झाल्याचा अंदाज आहे. पेरणी गेल्या वेळेस ८० टक्क्यांवर झाली होती. खानदेशात सुमारे पावणेचार लाख हेक्टरवर रब्बी पेरणीची अपेक्षा यंदा आहे. धुळ्यातील रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ६० हजार हेक्टर तर नंदुरबारात सुमारे ४२ हजार हेक्टर एवढे क्षेत्र आहे. या दोन्ही जिल्ह्यातही पेरणी वाढणार आहे.
कार यंदा पाऊस बऱ्यापैकी आहे. जळगाव जिल्ह्यात गिरणा धरणातून रब्बीसाठी पाणी मिळणार असल्याने गिरणा पट्ट्यात रब्बी हंगाम चांगला राहणार आहे. खानदेशात रब्बीची पेरणी एकूण दोन लाख ३० हजार हेक्टरवर नोव्हेंबरच्या मध्यातच होईल, असा अंदाज आहे. त्यात सर्वाधिक हरभरा पीक राहणार आहे.
यापाठोपाठ दादर ज्वारी व संकरित ज्वारी, मका, गहू यांची पेरणी होणार आहे. हरभरा, गहू, ज्वारीची पेरणी ऑक्टोबरमध्येच करण्याचे नियोजन अनेक शेतकरी करीत आहे. संकरित ज्वारी, बाजरी, मका, कांदा यांची लागवडही अपेक्षेनुसार होणार आहे. मक्याची लागवडही रब्बी हंगामात जोमात होईल.
खानदेशात मक्याची सुमारे एक लाख हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. ज्वारीची पेरणी सुमारे ४५ हजार हेक्टरवर होईल, अशी अपेक्षा आहे. गव्हाची पेरणीदेखील १८ हजार हेक्टरपर्यंत होईल. कांदा लागवडही स्थिर राहील, कारण पाऊसमान चांगले असल्याने धुळ्यातील लागवड कायम राहील.
जळगाव जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टरवर, धुळ्यात तीन हजार हेक्टरवर तर नंदुरबारमध्ये सुमारे एक हजार हेक्टरवर कांदालागवड अपेक्षित आहे. बाजरीची पेरणी जानेवारीच्या मध्यापर्यंत सुरू राहील. बाजरीची पेरणीदेखील सुमारे सात ते आठ हजार हेक्टरपर्यंत होईल, असे सांगण्यात आले. धुळ्यात अनेर, पांझरा प्रकल्पातून रब्बीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातही वाघूर, हतनूर धरणातून पाणी सोडले जाईल.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.