Water Management Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : देवळ्यातील मृत ओढा झाला पुनरुज्जीवित

ग्रामस्थांचे भगीरथ प्रयत्न; दोन किलोमीटरचे खोलीकरण

Team Agrowon, राजेश कळंबटे

राजेश कळंबटे
रत्नागिरी ः काळाच्या ओघात पिढ्यान् पिढ्या बारमाही वाहणारा देवळे (ता. संगमेश्‍वर) येथील मृत झालेला ओढा दोन वर्षांच्या भगीरथ प्रयत्नांनी पुनरुज्जीवित करण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. दोन किलोमीटरच्या ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून ओढा पूर्वीप्रमाणे प्रवाहित झाला आहे. सुमारे आठ कोंडीमध्ये (नैसर्गिक खड्डे) पाणी साचलेले आहे. तर दरवर्षी येणाऱ्या पुरापासून देवळे बाजारपेठेतील व्यावसायिकांची सुटका झाली.

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर देवळे गाव आहे. या गावातून वाहणारा ओढा गेल्या काही वर्षांमध्ये दगड गोट्यांनी भरून गेला होता. त्यामुळे ओढ्याने झरेही बंद झाले. बारमाही वाहणाऱ्या ओढ्याचा प्रवाह थांबला आणि किनाऱ्यावरील विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली. शेजारील साखरपा येथील नदीतील गाळ काढण्याचे काम ‘नाम’ फाउंडेशनच्या मदतीने करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर नीलेश कोळवणकर यांनी ‘नाम’चे श्री. गोखले यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी सहकार्याचे आश्‍वासन दिल्यानंतर ‘जलसमृद्धी योजना देवळे’ या नावाखाली प्रत्यक्ष कामाला आरंभ केला. आर्थिक प्रश्‍न सोडविण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले. त्यामधून सुमारे साडेसहा लाख रुपये जमा झाले आणि दीड लाख रुपये ग्रामपंचायतीने तरतूद केली. ‘नाम’ फाउंडेशनने मशिनरी उपलब्ध करून दिली. त्यामुळे ओढा खोलीकरणाच्या कामाला सुरुवात झाली.

ग्रामस्थांचा उत्साह कायम
गेल्या वर्षी सुरू झालेले हे काम ४० टक्के पूर्ण झाले आणि १५ मे २०२१ ला मोठा पाऊस झाला आणि काम थांबले; परंतु ग्रामस्थांचा कामाचा उत्साह कमी झाला नाही. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या डिझेलचा दररोजचा खर्च पंधरा हजार रुपये होता. पूर्ण झालेल्या ६०० मीटरच्या कामामुळे देवळे बाजारपेठेला गतवर्षी पुराच्या पाण्याचा फटका बसला नाही. उर्वरित कामाला यंदा उन्हाळ्यात सुरुवात करण्यात आली.

सुमारे ४५ दिवसांमध्ये १४०० मीटर भागाचे खोलीकरण, रुंदीकरण करण्यात आले. हे काम करताना तांत्रिक गोष्टींचाही विचार केला गेला. पावसाचे पाणी साचून राहावे यासाठी नैसर्गिंक कोंडी (डोह) जशासतसा जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. त्यात सुमारे ६ ते ७ फूट पाणी उन्हाळ्यात आहे. पुढच्या वर्षी मुले तेथे पोहू शकतील. पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्या पुढील भागात खोलीकरण झालेले नाही. वहाळाच्या काठावरील गाळ परत ओढ्यामध्ये जाणार नाही यासाठी ओढ्याकाठी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासाठी श्री. कोळवणकर यांनी पुढाकार घेतला.

गावातून वाहणारा ओढा हा पाण्याचा नैसर्गिक स्रोत आहे. त्याचे पाणी कायमस्वरूपी वाहत राहावे या उद्देशाने खोलीकरण आणि गाळ उपसा करण्याचा निर्णय घेतला होता. ते काम पूर्ण झाले आहे.
- नीलेश कोळवणकर, ग्रामस्थ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT