Soil Management
Soil Management Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Management : उतारावरील खोल मशागत नेईल उत्पादन घटीकडे

Team Agrowon

डोंगर उताराच्या जमिनीवर नांगरणी (Ploughing) आणि मशागतीची कामे केल्यास शेतीतील माती पातळ होण्याचा धोका आहे. मातीची धूप (Soil Erosion) होऊन भविष्यामध्ये पिकांच्या उत्पादनावर (Crop Production) विपरीत परिणाम होत असल्याचे इंग्लंड येथील लँकेस्टर विद्यापीठ आणि जर्मनी येथील ऑग्सबर्ग विद्यापीठातील अभ्यासात पुढे आले आहे. त्यामुळे अधिक उताराच्या जमिनीवर मशागत करणे थांबविण्याची गरज त्यातून व्यक्त करण्यात आलेली आहे. हा अभ्यास ‘नेचर फूड’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

गेली शेकडो वर्षे शेतकरी शेतांची नांगरट व अन्य मशागत करून पेरणी किंवा रोपांची लागवड करत आलेले आहेत. मात्र पूर्वी शेतकरी बैलांच्या साह्याने हलकी मशागत करत असतात. मात्र गेल्या पन्नास वर्षांपासून प्रगत देशांमध्ये आणि गेल्या दशकामध्ये विकसनशील देशांमध्येही शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे प्रमाण वाढत गेले आहे. त्यामुळे अधिक ताकदवान ट्रॅक्टर आणि माती हलविणारी यंत्रे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अधिक खोलवर आणि ताकदीने मोठ्या प्रमाणात मातीचा थर उकरला जात आहे.

त्यातच वातावरण बदलाच्या स्थितीमध्ये पावसाच्या अनियमितपणामध्ये वाढ होत आहे. एकाच वेळी अधिक पाऊस पडण्यासाख्या किंवा ढगफुटीच्या अनेक घटना होताना दिसत आहेत. अशा स्थितीमध्ये मशागत केलेल्या उताराच्या जमिनीवरून सुपीक मातीची धूप होऊन जातात. मातीचा एक थर बनण्यासाठी हजारो वर्षाचा काळ लागतो. मात्र वाहून जाण्यासाठी एखादा जोराचा पाऊसही पुरेसा ठरतो. वाहून गेलेली माती ही पाण्यासोबत गाळाच्या स्वरूपामध्ये धरणामध्ये साठून त्यांची पाणी साठवण्याची क्षमता कमी करते किंवा समुद्रामध्ये जाते. काही प्रमाणात डोंगराच्या उताराकडील भागामध्ये असलेल्या क्षेत्रामध्ये साठते. हे लक्षात घेता शेतामध्ये मशागत करताना अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे.

मशागत करताना होणाऱ्या मातीच्या मोठ्या हालचालीमध्ये मातीचा सुपीक थर खाली जाण्याचीही शक्यता असते. मातीची जलधारण क्षमता कमी होते. त्यातील जैविक घटक, उपयुक्त जिवाणू कमी होतात. या साऱ्या बाबींचा फटका त्या जमिनीत घेतल्या जाणाऱ्या पिकांच्या उत्पादनाला बसतो.

लँकेस्टर विद्यापीठातील प्रो. जॉन क्विंटन यांनी सांगितले, की पीक उत्पादनामध्ये अन्य साऱ्या घटकांचा प्रामुख्याने विचार केला जात असला तरी मातीची कमी होत चाललेली खोली ही बाब तितकीच गांभीर्याने घेतली जात नाही. पिकांची मुळे चांगली वाढावीत, या उद्देशाने मशाततीची कामे केली जातात. मात्र त्याचा परिणाम डोंगर उताराच्या जमिनीवर नेमका उलटा होतो. मातीची खोली कमी होऊन जमिनी उथळ होतात.

ऑग्सबर्ग विद्यापीठातील प्रो. पीटर फायनर यांनी सांगितले, की मोठ्या यंत्राचा वापर वाढतानाच वातावरण बदलामुळे दुष्काळाची तीव्रताही वाढत आहे. यामुळे मातीची धूप वेगाने वाढत असून, त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे जगभरातील अनेक भागामध्ये दिसून येते.

संशोधकांना उत्तर जर्मनीतील उकेरमार्क परिसरातील गहू आणि मका उत्पादक पट्ट्यामध्ये सर्वेक्षण केले. हा परिसर युरोपातील कृषिमालाचे अधिक उत्पादन घेणारा पट्टा मानला जातो. गेल्या हजार वर्षांपासून कृषी उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशातील भविष्यातील पन्नास वर्षांचा अंदाज वेगवेगळ्या प्रारूपाद्वारे घेण्यात आला. त्यात जेव्हापासून आधुनिक यंत्राचा वापर सुरू झाला, तेव्हापासून मातीची धूप प्रचंड होत गेली. अशीच वाढ त्यात होत गेली तरी भविष्यामध्ये गहू आणि मक्याचे उत्पादन वेगाने कमी होत जाणार आहे.

अभ्यासासाठी मातीची मशागत, अदलाबदल आणि पिकांच्या वाढीसोबतच उत्पादनाच्या प्रकाशित उपलब्ध माहितीचा वापर करण्यात आला. येथील उताराच्या जमिनीमध्ये मातीची धूप होऊन, त्याचा गाळ परिसरातील खोलगट भागामध्ये जमा होतो. त्याची गणिते मांडल्यानंतर प्रत्यक्षात पुढील प्रकारे परिणाम दिसून आले.

गेल्या पन्नास वर्षांमध्ये उतारावर मशागत केलेल्या उकेरमार्क येथील शेतकऱ्यांच्या हिवाळी गव्हाच्या उत्पादनामध्ये ७.१ टक्क्यांनी घट झाली, तर शंभर वर्षांचा विचार केला असता ही घट १० टक्क्यांपर्यंत जाते. (सामान्य ते दुष्काळी वर्षांचा विचार करता.)

मक्यामध्ये पन्नात वर्षांत चार टक्के घट, तर १०० वर्षांत ५.९ टक्के घट (सामान्य ते दुष्काळी वर्षे) होण्याचा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे.

दुष्काळी वर्षांमध्ये मातीचा थर उथळ होण्याचे प्रमाण वेगाने वाढते. कारण त्यामध्ये ओलावा आणि अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमताच कमी झालेली असते.

ज्या वर्षामध्ये सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडतो, अशा वर्षांमध्येही ५० ते १०० वर्षांमध्ये उत्पादनामध्ये घट दिसून आली.

एकट्या उकेरमार्क प्रदेशाचा विचार केला, तरी हजारो टन उत्पादन गमवावे लागणार आहे.

उत्पादन घटण्याच्या अन्य कारणांपेक्षाही मातीची होणारी धूप ही अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे संशोधकांचे मत आहे. त्यामुळे ही घट कमी करण्याच्या दृष्टीने त्वरित धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता ते व्यक्त करतात.

प्रो. क्विन्टोन म्हणाले, की आमच्या प्रारूपानुसार जर आपण जमिनीची मशागत अशीच सुरू ठेवली तर प्रादेशिक स्तरावर पिकांच्या उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. हीच बाब दुष्काळी कालावधीमध्ये अधिक अडचणीची ठरणार आहे, कारण शिल्लक राहिलेल्या उथळ जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते.

प्रो. जे. एल. ओट्टल आणि प्रो. फियेनर म्हणाले, की आज आपण उतार व त्यावरील सुपीक माती जपली तर भविष्यामध्ये उत्पादनाची काही शाश्‍वती राहू शकते. सध्याच्या अभ्यासामध्ये वातावरण बदलाच्या निकषांचा विचार केलेला नसला तरी येत्या वातावरण बदलाच्या काळामध्ये मशागतीमुळे होणाऱ्या धूपेचा पिकाच्या उत्पादनावर नक्कीच विपरीत परिणाम होणार आहे. त्या बाबत अधिक अभ्यास करण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT