शेतीतील प्रत्येक निर्णय हा चूक की बरोबर,हे पहिल्यांदा पाऊस ठरवतो नंतर बाजार आणि सरकार. शेती हा व्यवसाय नाही तर,तो जुगार आहे. त्यात हरण्याच्या शक्यता जास्त आहेत. हे सतत सिद्ध होत आलंय. त्यामुळे मी नेहमीच केवळ शेतीवर अवलंबून राहण्याला विरोध करीत आलोय आणि रडण्यालाही. कारण रडण्यातून काहीच हाती लागत नाही. उलट आपण आत्मविश्वास गमावतो. कायम कोणाच्या तरी सहानुभुतीचा विषय बनून जगणं, हे काही जगणं नाही. शिवाय कोणाच्या उमाळ्याने, उसाशाने वा दिलासादायी शब्दांनी ना आपलं भलं होतं ना प्रश्नाची सोडवणूक होते.
मी कोरडवाहू शेती करीत असलो तरी,माझं सगळं लक्ष म्हशीपालनावर आहे. म्हशीपालन हा व्यवसाय आहे. तो मी विचारपूर्वक स्वत: निवडलाय. त्यामुळे तो पुरेशा गांभीर्याने करतो. दहा वर्षांपूर्वी, तो सुरू केल्यापासून मी सांगत आलोय की, यात नुकसानीची शक्यता नाहीच. क्वचित एखादी म्हैस चार महिने सांभाळूनही घेतलेल्या किमतीत विकली गेली तरी, मला त्याचं दु:खं नाही. कारण ती याकाळात भरपूर शेण देऊन जातेच. अर्थात हा माझा दृष्टिकोन आहे.
दरवर्षी मी नव्या नव्या गोष्टी शिकत गेलो. नुकसान कशामुळं होऊ शकतं आणि जादा फायदा कशामुळं होऊ शकतो, याचाही मला नीट अंदाज आलाय. यातील खाचखळगे बऱ्यापैकी माहिती झालेत.तरीही एखाद्या-दुसऱ्या वेळेस फसवणूक होते. कधीतरी निर्णय चुकतो. क्वचित अंगलटही येतो. पण व्यवसाय म्हटल्यानंतर या सगळ्या बाबी गृहीतच आहेत. आता माझं सगळं जगणं शेतीत,रुद्राहटलाच असल्याने, म्हशीपालनात गुंतवणूक करणं सुरूच आहे.किमान उत्पन्नाचा एक खात्रीचा सोर्स सुरू ठेवणं गरजेचं होतं, तो यातून निर्माण झालाय. मला माझ्या खर्चापुरते पैसे यातून मिळतात. मी मस्त जगतो. शेतीचं रडगाणं मी गात नाही.
मी दहा वर्षांपूर्वी दोन वगारींपासून याची सुरूवात केली होती. हळू हळू संख्या वाढवत नेली. सोयाबीन हे माझ्यासाठी महत्त्वाचं पीक आहे. सोयाबीन उत्पादन कमी -जास्त झाले तरी, त्याची गुळी हे म्हशींचं मुख्य खाद्य आहे. त्यामुळे सोयाबीन खालील क्षेत्र वाढवत नेतोय. शिवाय सोयाबीन काढल्यानंतर लगेच ज्वारी पेरतो. तो कडबाही जनावरांसाठी आवश्यक आहे. जवळपास पाऊण एकरवर गजराज नावाचं काटेरी गवत आहे. हे चार-पाच फुटाचं झालं की, जनावरांना घालतो. कुट्टी मशीनने याची कुट्टी करून घातली की, म्हशी काहीच शिल्लक ठेवत नाहीत. बारमाही हिरवा चारा देणारं हे महत्त्वाचं गवत आहे. पण उन्हाळ्यात माझ्याकडं पाण्याची सोय नसल्याने, एक -दीड महिना या चाऱ्याला खंड पडतो. उन्हाळ्यात दोन महिने पाणी मिळण्याची सोय करणं हे एक महत्त्वाचं काम अद्याप बाकी आहे. आठ-नऊ वर्षांपूर्वी घेतलेल्या दोन शेततळ्यांपैकी, एकामध्ये प्लास्टिक अंधरणे हा एक पर्याय आहे. बघतो काय जमते ते!
पावसाळ्यात, हिवाळ्यात म्हशींना बंदिस्त गोठा लागतो. सुरूवातीला सात- आठ जनावरांपुरता तो होता. पाच वर्षांपूर्वी पुर्वीच्या गोठ्याला जोडून तेवढाच वाढवला. १५-१६ जनावरांची सोय झाली.
एवढ्या जनावरांसाठी लागणारा चारा कुठे ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला. पूर्वी कडब्याची बनिम (वळई) रचली जायची.तिचा पृष्ठभाग झाकला की, कडबा अजिबात भिजत नसे. पण अशा बनिम रचणारे लोक आता दुर्मिळ झालेत. तीन वर्षांपूर्वी रचलेल्या बनिममधील निम्म्याहून अधिक कडबा भिजला.सगळा उकंड्यात टाकावा लागला. झाकाझाकीची बेजारी वेगळीच. वैरण सुरक्षित ठेवण्यासाठी कायमस्वरूपी सोय करणे गरजेचे होते. लगेच पुढच्या वर्षी १५×३० या आकाराचे एक बंदिस्त शेड केवळ चाऱ्यासाठी तयार केले. यात सोयाबीन गुळी आणि ज्वारीच्या कडब्याची कुट्टी बसू लागली. सोयाबीनची घरची गुळी पुरेशी होत नसल्याने, बाहेरून विकत घेणंही सुरू झालं. म्हशी आणणं , विकणं सुरू होतंच. यात तोट्याचा प्रश्नच नव्हता।.
गेल्या वर्षीपर्यंत फक्त वयात आलेल्या वगारी घ्यायच्या, त्यांची निगा करायची, त्या गाभण राहिल्या की,नवव्या, दहाव्या महिन्यात विकायच्या, असंच चालू होतं. गाभण म्हशी महाग मिळतात,त्यात गुंतवणूक अधिक, रिस्क अधिक असं माझं मत होतं. त्यामुळं गाभण म्हशी घेत नव्हतो. पण गतवर्षी हा निर्णय बदलावा लागला.असा अनुभव पहिल्यांदाच आला. वयात येऊनही वगारी लवकर माजावर येत नव्हत्या. माज कधी येऊन गेला तेही कळत नव्हतं. माजावर आलेल्या म्हशींना इंजेक्शनने भरवलं किंवा रेडा लावला तरी त्या गाभण राहात नव्हत्या. नेमकं कारण कळेना.सगळ्या वगारींना दोन-दोन,तीन-तीन वेळा भरवावं लागलं. दोन वगारींनी तर दीड-दोन वर्षे खाल्ली. डॉक्टर, औषधं, गोळ्या देऊन परेशान झालो. वर्ष-सव्वा वर्षांत बाजारात विक्रीला जाणारी गाभण वगार, दोन वर्षांपेक्षा अधिक वेळ घेऊ लागली. हा खर्चाचा आणि वेळेचा हिशोब परवडणारा नव्हता. बाजारात दलाली करणाऱ्या अनुभवी मित्राशी चर्चा केली आणि गाभण नसलेल्या वगारी सांभाळायच्या नाहीत असा निर्णय केला. निर्णय झाला की, काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली. डॉक्टरकडून तपासून, दोन महिन्यांपासून सहा महिन्यांची गाभण म्हैस घेणं सुरू झालं. गुंतवणूक वाढली. चारा वाढला. खुराकाचा खर्च वाढला. मात्र ताणही कमी झाला. अशा गाभण म्हशी परिसरातूनच खरेदी होऊ लागल्या. साहजिकच खात्रीशीर दुध देणाऱ्या म्हशी मिळू लागल्या. समोरच्या व्यक्तीला दुधाची खात्री देऊन विकणं शक्य होऊ लागलं.पहिलाडूच्या वगारींबाबत अशी खात्री देणं शक्य होत नव्हतं.
या सगळ्या म्हशी जास्तीत जास्त काळ बंदिस्त गोठ्यात राहू लागल्याने, त्यांचा रंग भुरकट होऊ लागला. काळा रंग हीच गावरान म्हशीची ओळख आहे. भुरकट म्हशींची कातडी तजेलदार दिसत नाही. त्यांना काही वेळ उन, मोकळी हवा देणं गरजेचं बनलं. वीस जनावरांना मोकळ्या रानात चारायला नेणंही अवघड झालं. वगारी पळापळी करायच्या, टकरी खेळायच्या. त्यांची रिस्क वाटायची नाही. पण मोठ्या गाभण म्हशी टकरी खेळू लागल्या तर, त्यात अधिक रिस्क होती. शिवाय २०-२२ म्हशींना लोढणं घालणं, ते पुन्हा काढणं, चारायला नेणं, आणणं हे सगळंच वेळखाऊ होतं. त्यातही काही म्हशींना मोकळं चरायची सवय नसते. त्यामुळे म्हशी चारणे हा कार्यक्रम बंद झाला. म्हशींना बाहेर बांधण्याची सोय करणं गरजेचं बनलं.१५×३० आकाराचे दोन शेड उभे केले.शेतातील सहकारी म्हणाले, पत्र्याचा खर्च जास्त येतोय.वर कडबा टाकूयात.आधी शेडवर बांबू टाकून कडबा टाकला. आम्ही मस्त फोटो काढले. पण हा आनंद काही टिकला नाही.आठवडाभरातच कडबा वावटळीने उडाला.मध्येच लक्षात आलं की, ठिबकचे पाईप लोळत पडलेत. ते गुंफून घ्यावेत. दोन दिवस उन्हात झटून मी आणि नरेशने ते काम केलं. पाईपवर गजराज गवत टाकलं. चारही बाजुने तारेने त्याला करकचून बांधलं. सावली झाली म्हणून खूष झालो. बाहेर म्हशी बांधणं सुरू केलं की,पाऊस लागला. सलग आठवडाभर. शेण,मुत,मातीचा चिखलच चिखल. म्हशींना चाराही खाता येईना. लक्षात आलं की, असले प्रयोग कामाचे नाहीत. लगेच आठवडाभरात दोन्ही शेडवर पत्रे टाकले.एका शेडमध्ये दगड ,मुरूमाने लेव्हलिंग केली. त्यावर सिमेंट काँक्रीटीकरण केलं. समोर चाऱ्यासाठी तीन फुटाची दावण बांधून घेतली.तेव्हा नियमित म्हशी बांधणं सुरू झालं.
या काळात एक मोठा रेडाही विकत घेतला. भरपूर पाऊस असल्याचा हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन, म्हशींची संख्या वाढवली. म्हशींसाठी आणखी एक माणूस वाढवला. पूर्वीच्या दोन देवणी जातीच्या गायी आहेत. त्यातील एका गायीने लाल कंधारी गोऱ्हं दिलंय.चार महिन्यांपूर्वी नातेवाईक मित्राने दोन गायी पाठवल्या. आता माझ्याकडे चार गायी झाल्या... आणि बघता बघता सगळ्या जनावरांची संख्या तीसपेक्षा अधिक झाली. मोठं शेड भरून सोयाबीन व ज्वारीची गुळी, कुट्टी, अर्धा एकर मका, पाऊण एकर गजराज गवत असा भरपूर चारा होता. तरीही मला चारा संपण्याची भीती होतीच. नवीन म्हैस आली की मी भरतमामांना काळजीनं म्हणायचो, बघा बरं वैरण कमी पडायची...आणि मामा म्हणायचे,तुम्ही काही काळजी करू नका सर. वैरण कमी पडणार नाही. खरं तर मी म्हशींची एवढी संख्या वाढवायला तयार नव्हतो. पण म्हशी सांभाळणारे भरतमामा संख्या वाढवत होते. त्यामुळे ही संख्या तीस-बत्तीसपर्यंत वाढली.
पाऊस चांगला राहिला असता तर अडचण निर्माण झाली नसती मात्र जुलै- ऑगस्ट दरम्यान पावसाने तीन आठवड्यापेक्षा अधिक काळ ओढ दिली. त्यामुळे म्हशीचा बाजार मंदावला.नववा,दहावा महिना झालेल्या गाभण म्हशी विकल्या जाणे अपेक्षित होते.मात्र अवर्षणामुळे गरज असूनही कोणी म्हैस विकत घ्यायची हिंमत करेना. पाऊस झाला नाही तर, चारा कुठून आणायचा, हा प्रश्न सगळ्यांसमोर होता. त्यामुळे जनावरांची संख्या कमी होईना. सगळ्या मोठ्या म्हशी. ट्रँक्टर भरून आणलेला चारा एकाच वेळी संपू लागला. मामाचा अंदाज चुकला. गेल्या आठवड्यात गुळीचं शेड पूर्ण रिकामं झालं. साधारण १० ते १२ दिवस पुरेल एवढं गजराज गवत आणि एवढ्याच दिवसाची ज्वारीची ओली वैरण आहे.एका बाजुला. बाजारात म्हशीचे भाव कमी झालेत तर दुसऱ्या बाजुला चाऱ्याचा प्रश्न. मग निर्णय केला जमेल तेवढी जनावरं कमी करायची. पहिल्यांदा लावणीचा रेडा, दोन छोटे रेडे, एक वगार अशी चार जनावरं विकली. अर्थात किंमत कमी आली.
त्यात पुन्हा दुधासाठी एक म्हैस घेतली.पुढच्या दहा-बारा दिवसात चार म्हशी विकल्या.एक व्यायला झाली होती. ती लगेच विकणं गरजेचं होतं. माझी सहा महिन्यांची गाभण म्हैस तुम्ही घ्या, तुमची ही म्हैस मी घेतो... असं म्हणत ओळखीचे जैनूमामा आले. किंमती ठरवून त्यांची म्हैस घेतली व त्यांना आमची म्हैस दिली. प्रत्येक म्हशीला अपेक्षेपेक्षा पाच ते सात हजार रूपये कमी आले. त्याला इलाज नाही. पावसाचीही जोखीम आहेच. मात्र ही जोखीम गृहीत धरून पर्यायी व्यवस्था करावी लागेल.
आम्ही माणसांना सांभाळल्यागत जनावरं सांभाळतो. चारा,स्वच्छता आणि आजारपण याकडं माझं बारकाईने लक्ष असतं. एखादी म्हैस चारा खात नाही, असं लक्षात आलं की,लगेच डॉक्टरला फोन जातो. तो ही त्वरीत येतो. उत्तम औषधोपचार करतो.आमच्याकडं नवीन म्हैस येते तेव्हा तिचे केस वाढलेले असतात.ऊवा, लिका, गोचिड असतात. पहिल्यांदा आम्ही तिला भादरतो. दर महिना-सव्वा महिन्याला आम्ही म्हशींना भादरतो. गोचिड,ऊवांची औषधं लावतो. सतत धुतो. त्यामुळे जनावरं निरोगी राहतात. मला गोठ्यावर येणारी माणसं विचारतात की, दोन माणसांची पगार, दरमहा ३०हजाराची पेंड,चुनी आणि पीठ,हे दरमहा भादरणं,डॉक्टर, औषधाचा हा खर्च जाऊन ,किती पैसे उरतात? मी त्यांच्याकडं बघून छानसं हसतो..बघा..तुम्हीच अंदाज करा,असं बोलून विषय उडवून लावतो.खरं तर याचं उत्तर आकड्यात देणं कठीण आहे. मात्र हे खर्च जाऊनही पैसे उरतात, हे नक्की. एखादी म्हैस चार-सहा महिन्यात १५-२० हजार रूपये देऊन जाते. एखादी म्हैस सहा महिने सांभाळूनही बरोबरीत विकावी लागते .एखादा अपवाद सोडला तर, म्हशीत तोटा होत नाही. अपेक्षित फायदा प्रत्येक म्हशीत मिळाला नाही तरी ती शेण देऊन जातेच.
म्हशीपालनात दरवर्षी मी नवं काहीतरी शिकतोय. अडचणीच्या ठरलेल्या बाबी टाळतोय. केवळ गाभण म्हैस घेणं पुरेसं नाही तर, ती कोणत्या महिन्यात बाळंत होणार, हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. साधारणपणे म्हशीचा बाजार कधी तेजीत असतो, कधी पडतो याचाही अंदाज आलाय. आता हे सगळं लक्षात घेऊनच यापुढील काळात म्हशींची खरेदी करावी लागेल. जनावरं जास्त ठेवायची तर यापेक्षा अधिक चारा तयार करावा लागेल.किमान १५ ते २० म्हशी ठेवल्या तरच व्यावसायिक दृष्टीने हा सगळा खर्च परवडणारा आहे.
अभिमानाने सांगायची बाब म्हणजे,आम्ही या व्यवसायात निर्माण केलेली विश्वासार्हता.गेल्या वर्षभरात आम्हाला म्हशी विकण्यासाठी बाजारला जावे लागले नाही. म्हशी आमच्या शेडवरून विकल्या जात आहेत. ज्यांना म्हैस विकायचीय ते पशुपालक आम्हाला भेटायला येतात.म्हैस योग्य वाटली की खरेदी करतो.बाजारची कटकट आणि वेळ यामुळं वाचतोय.
सध्या तरी म्हशीपालन हाच माझ्यासाठी सोयीचा,योग्य पर्याय आहे. माझ्या लाईफस्टाईलशी तो जुळणारा आहे.म्हशीराख्या असं मला कोणी म्हटलं तर,मला आनंदच होतो.आमच्या घरासमोरची बाग या शेणखतावरच बहरलीय.तिथं बारमाही कोणती ना कोणती चवदार फळं उपलब्ध असतात. दहा वर्षांच्या अनुभवावरून मी सांगतोय,मी यात यशस्वी आहे.हा तोट्याचा धंदा नाही.मात्र ही यशोगाथा नाही. हे आहे विचारपूर्वक केलेल्या कष्टाचं फळ.शेतीत केलेल्या कष्टाचं फळ मिळेल याची खात्री नाही.पण म्हशीपालनात फळ मिळतंच.आजही मी कधीही हातात खोऱ्या धरून शेण ओढतो, पाण्याचा पाईप धरून म्हशी धूतो.येता-जाता त्यांच्यावर नजर ठेवतो. यशाचं हेही कारण आहेच. या कामात शेतातील सहकाऱ्यांसोबतच माझ्या सहचारिणीचंही मोलाचं योगदान आहे..हे सामुहिक यश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.