डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील
Crop Diversification Index, CDI : पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचा कार्यक्रम योग्य प्रकारे राबविल्यानंतर त्यातून गावामध्ये पाण्याची उपलब्धता होते. या पाण्याचा विविध पिकांच्या सिंचनासाठी वापर केला जातो. पूर्वी कोरडवाहू पिकांचे प्राबल्य असलेल्या गावामध्ये पाण्याच्या बऱ्यापैकी शाश्वत उपलब्धतेनुसार नवीन पिकांची लागवड सुरू होते.
पूर्वीच्या तुलनेमध्ये पिकांच्या विविधतेमध्ये किती बदल झाला, हे पाहण्यासाठी पीक विविधता निर्देशांक (Crop Diversification Index, CDI) वापरला जातो. या निर्देशांकाद्वारे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामुळे प्रकल्पपूर्व व प्रकल्पपश्चात झालेल्या पिकाच्या विविधतेतील बदल आपण तपासू शकतो.
n
पीक विविधता निर्देशांक CDI = ∑ Pi log (1/Pi)
i = 1
वरील गणितीय सूत्रानुसार Pi म्हणजे i नंबरच्या पिकाच्या क्षेत्राचे एकूण लागवडीखालील क्षेत्राशी प्रमाण.
n म्हणजे त्या पाणलोट क्षेत्रातील एकूण पिकांची संख्या
आता सूत्रानुसार पिकाची विविधता कशी तपासायची, हे एखाद्या गावाचे उदाहरणाने समजून घेऊ.
कडवंची (ता. जि. जालना) गावांमध्ये १८८८ हेक्टर क्षेत्रापैकी साधारणपणे १५११ हेक्टर क्षेत्र हे लागवडीखाली आहे. या गावातील पाणलोटक्षेत्र विकासानंतर पीक विविधता निर्देशांक खालील माहितीनुसार काढला आहे.
तक्ता १ - कडवंची गावातील पिकांचे क्षेत्र खालीलप्रमाणे
२००१-०२ मध्ये २०२२-२३ मध्ये
पीक क्षेत्र Pi (१/Pi) log (१/pi) Pi.log (१/Pi) क्षेत्र Pi (१/Pi) Log (१/pi) Pi.log (१/Pi)
बाजरी ३०३ ०.२० ४.९९ ०.७० ०.१४ ३ ०.०० ५०३.६७ २.७० ०.०१
उडीद ४२ ०.०३ ३५.९८ १.५६ ०.०४ १२ ०.०१ १२५.९२ २.१० ०.०२
मूग १६१ ०.११ ९.३९ ०.९७ ०.१० ६१ ०.०४ २४.७७ १.३९ ०.०६
कापूस ३४७ ०.२३ ४.३५ ०.६४ ०.१५ ३०२ ०.२० ५.०० ०.७० ०.१४
रब्बी ज्वारी ३६१ ०.२४ ४.१९ ०.६२ ०.१५ ३५० ०.२३ ४.३२ ०.६४ ०.१५
गहू ९९ ०.०७ १५.२६ १.१८ ०.०८ १० ०.०१ १५१.१० २.१८ ०.०१
तूर ३५ ०.०२ ४३.१७ १.६४ ०.०४ ४० ०.०३ ३७.७८ १.५८ ०.०४
आले २ ०.०० ७५५.५० २.८८ ०.०० ०.०० ०० ०० ०.०० ०.००
द्राक्ष ६२ ०.०४ २४.३७ १.३९ ०.०६ ६०० ०.४० २.५२ ०.४० ०.१६
डाळिंब ९८ ०.०६ १५.४२ १.१९ ०.०८ २० ०.०१ ७५.५५ १.८८ ०.०२
सीताफळ / मोसंबी ०० ०० ०० ०० ०० २५ ०.०२ ६०.४४ १.७८ ०.०३
भाजीपाला १ ०.०० १५११.०० ३.१८ ०.०० ८८ ०.०६ १७.१७ १.२३ ०.०७
पिकांचे क्षेत्र १५११ -- -- -- ०.८४ १५११ -- -- -- ०.७१
CDI of २००१- ०.८४ CDI of २०२४- ०.७१
कडवंची हे गाव अवर्षणप्रवण क्षेत्रात असून, या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वर्गवारी GP३३ या पाणलोटामध्ये समावेश होतो. हा एकूण पाणलोट साधारण ९२०० हेक्टरचा आहे. त्याचा समावेश अतिशोषित (overexploited) या वर्गवारीमध्ये होतो. अशा विपरीत परिस्थितीमध्ये गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा शेती साह्य मंडळ व कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी यांचे पाणलोट विकासासाठी केलेले नियमित आणि प्रामाणिक प्रयत्न महत्त्वाचे ठरले. आज या गावाची ओळख ‘वाळवंटातील ओअॅसिस’ अशी झाली आहे.
कडवंची गावास १८८८ हेक्टर भौगोलिक क्षेत्र लाभले असून, त्यातील सर्वसाधारणपणे १५११ हेक्टर क्षेत्र हे लागवडीखाली आहे. इंडो- जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत या गावांमध्ये पाणलोट विकासाची कामे शाश्वत पद्धतीने केली गेली.
साधारणपणे १९९३ -९४ या वर्षापासून जल व मृद्संधारणाच्या वेगवेगळ्या उपक्रमांना सुरुवात झाली. २००१ मध्ये या गावांमध्ये साधारणपणे ११ पारंपरिक पिके घेतली जात होती. त्यात प्रामुख्याने बाजरी, तूर, कपाशी या पिकांचे प्रमाण अधिक होते. त्याचा पीक विविधता निर्देशांक (CDI) हा प्रकल्पापूर्वी ०.८४ इतका होता.
प्रकल्प राबविल्यानंतर पाणलोट कार्यक्रमाचे व्यवस्थापन शेतकऱ्यांनीही योग्य प्रकारे टिकवले. त्यामुळे पीक पद्धतीमध्ये २०२२-२३ मध्ये खूप मोठा बदल दिसून येत आहे. सध्या कडवंचीमध्ये आठ पिके प्रामुख्याने घेतली जातात. पीक विविधता निर्देशांक हा ०.७१ इतका नोंदवला आहे. सातत्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशिक्षण घेऊन पाण्याचे मूल्य समजावल्यामुळे प्रकल्पपश्चात दुष्काळ प्रतिकारक, आणि आर्थिक फायदा देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल असतो.
२००२/०३ मध्ये कडवंचीमधील आर्थिक उत्पन्न सरासरी ३२६५ रुपये प्रति माणशी होते. ते आता (२०२२/२३ मध्ये) सरासरी एक लाख ७५ हजार रुपये प्रति माणसी झाले आहे. म्हणजेच सरासरी प्रत्येक शेतकरी कुटुंबात साधारणपणे आठ ते नऊ लाख रुपये शेतीच्या माध्यमातून येत आहेत. शेती व शेतीपूरक उद्योगातून २०२२-२३ या वर्षामध्ये कडवंचीमध्ये ५२ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.
मराठवाड्यातील शेतीवर आधारित अशी इतकी आर्थिक सुबत्ता अन्य कोणत्याही गावांमध्ये आलेली दिसून येत नाही. म्हणजेच पीक विविधता निर्देशांक बदलूनही कडवंची गावशिवारातील जलसाठे सुरक्षित आणि शाश्वत आहेत. तुषार सिंचन, ठिबक सिंचनाला मल्चिंगची जोड देत कमीत कमी पाण्यामध्ये अधिकाधिक उत्पादन घेतले जाते. प्रकल्पपश्चात सर्वांत मोठा बदल द्राक्ष पिकाने केला आहे.
प्रकल्पाच्या सुरुवातीला दोन-तीन हेक्टर क्षेत्रावर असलेली द्राक्ष शेती आज ६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर घेतली जाते. याशिवाय भाजीपाला पिकेदेखील ८८ हेक्टर क्षेत्रावर घेतली जातात. बाजरी पिकाखालील क्षेत्रामध्ये कमालीची घट झाली असून, प्रकल्पपश्चात ३०० हेक्टरने बाजरी क्षेत्र कमी झाले आहे. तर डाळिंब ९८ हेक्टर क्षेत्रावर होते. ते आता केवळ २० हेक्टर इतके राहिले आहे.
कडवंचीकडून काय शिकायचे?
निसर्गाच्या चौकटीमध्ये राहून नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर व्यवस्थापन केल्यास निसर्गदेखील आपल्या पदरामध्ये निश्चितपणाने भरभरून दान देतो. कधीकाळी पाण्याची टंचाई असणाऱ्या या गावात संस्था आणि शेतकऱ्यांनी केलेल्या सामुदायिक प्रयत्नातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नच सोडवला असे नाही, तर योग्य पिकांच्या निवडीतून आर्थिक सुबत्ताही मिळवली आहे. येथील पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाचा फायदा वाघरूळ व नांदापूर या शेजारच्या दोन गावांना अत्यल्प प्रमाणात झाला आहे.
कडवंची हे गाव महाराष्ट्रातच आहे. त्याचीही भूगर्भीय स्थिती उर्वरित महाराष्ट्राप्रमाणेच आहे. म्हणजेच राज्याचा ८२ टक्के भूभाग हा काळ्या पाषाणाचा (Compact Basalt) असून, त्यात जमिनीची पाणी मुरण्याची क्षमता अत्यंत कमी आहे. कडवंचीप्रमाणेच आपल्या गावातही पाणलोटाची योग्य प्रकारे केलेली आणि जपलेली कामे आपल्याला पिकांच्या सिंचनासाठी शाश्वत मदत करू शकतात. त्यातही योग्य त्या पिकांची निवड केल्यास त्यातून आर्थिक सुबत्ता मिळू शकते. या कडवंची गावच्या यशोगाथेमध्ये कडवंचीचे ग्रामस्थ व मराठवाडा शेती साह्य मंडळाचे विजयअण्णा बोराडे, कृषी विज्ञान केंद्र खरपुडी (जालना) येथील अभियंता पंडित वासरे व त्यांचा चमू यांचे योगदान मोलाचे आहे.
डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे.)
डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.