Pune News: अमेरिकेत यंदा कापूस लागवड १४ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाची लागवडही २४ टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच चीन, भारत, ऑस्ट्रेलिया आणि टर्की या देशांमध्ये उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने जागतिक कापूस उत्पादन कमी राहील, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) व्यक्त केला आहे.
अमेरिकेचा कापूस हंगाम भारताच्या तुलनेत लवकर सुरू होतो. त्यामुळे अमेरिकेतील कापूस बाजारातील घडामोडींचा भारतातील कापूस दरांवर परिणाम होत असतो. अमेरिकेत कापसाबरोबरच सोयाबीन, मका आणि गव्हाच्या पेरणीला वेग आला आहे.
अमेरिकेतील महत्त्वाच्या कापूस उत्पादक भागात पावसाला उशीर झाला. अमेरिकेच्या दक्षिण आणि आग्नेय भागातील राज्यांत पुरेसा पाऊस नव्हता. त्यामुळे कापूस पेरणीला उशीर झाला. पण आता पेरण्यांनी वेग घेतला आहे. कापसाची जवळपास ३० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मागील वर्षी याच काळात जवळपास ३३ टक्के पेरा झाला होता.
कापूस लागवड घटणार
अमेरिकेत यंदा कापसाची लागवड कमी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षभर अमेरिकेतील शेतकऱ्यांना कापसाला कमी भाव मिळाला. सोयाबीनचा भावही कमीच होता. पण मक्यातून चांगला परतावा मिळाला. त्यामुळे यंदा कापूस आणि सोयाबीनची लागवड कमी होऊन मक्याची लागवड वाढण्याचा अंदाज आहे.
अमेरिकेतील शेतकरी यंदा कापसाची लागवड १४ टक्क्यांनी कमी करण्याची शक्यता आहे. यंदा सुमारे ९७ लाख एकरवर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे. अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाची लागवड जवळपास २४ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.
जागतिक कापूस उत्पादनावर परिणाम
अमेरिकेच्या कृषी विभागाने नव्या हंगामात जागतिक कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, टर्की या देशांमध्ये कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. जागतिक कापूस उत्पादन १ हजार ५०८ लाख गाठींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. चालू हंगामात १ हजार ५४९ लाख गाठी उत्पादन झाले आहे.
सोयाबीन घटणार, मका वाढणार
अमेरिकेत सोयाबीनची लागवडही ५४ टक्क्यांवर पोचली. यंदा अमेरिकेत सोयाबीनची लागवड ४ टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे. मक्याची लागवड ६५ टक्के पूर्ण झाली आहे. यंदा मक्याची लागवड ५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. ज्वारीची लागवड ४ टक्क्यांनी तर भुईमूग लागवड ८ टक्क्यांनी वाढेल, असा अमेरिकेच्या कृषी विभागाचा अंदाज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.