Jalgaon News : खानदेशात कापूस दरावर सतत दबाव आहे. तसेच दराबाबत अनेक अफवाही आहेत. पिकात गुलाबी बोंड अळीदेखील वाढली आहे. यामुळे पुढील किंवा २०२५-२६ च्या हंगामात कापूस लागवडीत मोठी घट होईल, असे दिसत आहे.
कापूस पीक नुकसानकारक ठरत आहे. पिकात वेचणीचा खर्च वाढत आहे. मजुरांची समस्या असते. यात दर कमीच आहेत. सरत्या हंगामात नोव्हेंबरच्या सुरवातीला दर कमी होते. मध्यंतरी दर सात हजार रुपये प्रतिक्विंटलवर होते. परंतु नोव्हेंबरच्या अखेरीस दर सतत कमी झाले. सध्या किंवा मागील काही दिवसांपासून दर अस्थिर असल्याने शेतकऱ्यांनी कापूस पीक लागवडीसंबंधी नियोजन स्थगित केले आहे.
खानदेशात कापूस लागवड मे मध्ये सुरू होते. त्याची तयारी शेतकरी या महिन्यात किंवा एप्रिलमध्ये करतील, अशी अपेक्षा होती. परंतु शेतकऱ्यांत यंदा कापूस लागवडीबाबत उत्साह नाही. २०२४-२५ मध्ये कापूस दर कमी होते. उत्पादनही फारसे दिसत नसल्याने नोव्हेंबरमध्येच कापूस पीक काढायला सुरवात केली. काही शेतकऱ्यांनी दर चांगले मिळतील, यासाठी मका, गहू, बाजरी आदी पिके टाळून फरदड कापूस पीक तसेच ठेवले होते.
परंतु दर मिळालेच नाहीत. मागील हंगामातही शेतकऱ्यांच्या फरदड कापसाला कमी दर मिळाले होते. यंदाही बाजार अस्थिर आहे. शिवाय मजुरी वाढली आहे. कापूस पिकात गुलाबी बोंड अळीचा प्रकोप वाढल्याने वेचणीवर हवा तेवढा कापूस येत नाही. बोंडे व्यवस्थित उमलत नाहीत. त्यात कचरा, किडीही येतात.
बाजारात तेजी नसल्याने फरदड कापूस घेण्यासंबंधी खरेदीदार उत्साह दाखवीत नाहीत. यात नुकसान होते. कारण फरदड कापूस पिकाचे एकरी फक्त अर्धा क्विंटल उत्पादन सद्यःस्थितीत शक्य आहे. त्याला वेचणी व इतर बाबींची मजुरी लक्षात घेऊन किमान चार हजार रुपये खर्च आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पुढे कापूस पीक घेणे टाळले आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे, त्यांनी पपई व भाजीपाला, वेलवर्गीय पिकांची पेरणी सुरू केली आहे.
मोठे क्षेत्र पुढे कमी होणार
जळगाव जिल्ह्यात पाच लाख ८० ते ८५ हजार हेक्टरवर कापूस पीक घेतले जात होते. परंतु २०२३-२४ मध्ये कापसाची लागवड पाच लाख ६६ हजार हेक्टर एवढी झाली. २०२४-२५ मध्ये लागवडीत मोठी घट होऊन क्षेत्र पाच लाख ११ हजार हेक्टरवर खाली आले. कापूस लागवड मागील दोन हंगामांत घटली आहे. पुढे लागवडीत मोठी घट होईल, असे दिसत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.