डॉ. सुधाकर आवंडकर
Control of CRD Disease : ‘सीआरडी’ हा कोंबड्यामध्ये मायकोप्लाझमा गैलिसेप्टिकम नावाच्या जिवाणूद्वारे श्वसनसंस्थेस जडणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार मांसल, अंडी देणाऱ्या तसेच ब्रीडर कोंबड्यांना होऊ शकतो.
त्याचप्रमाणे बदक, तितर, टर्की आणि कबुतरामध्ये दिसून येतो. या आजाराचा प्रतिबंध आणि उपचार योग्य वेळी न केल्यास मरतुक वाढते. हा आजार कोंबड्यांच्या अयोग्य व्यवस्थापनाचे सूचक आहे.
प्रसार :
बाधित कोंबड्यांच्या अंड्यातून उबविलेल्या पिलांद्वारे पसरतो.
बाधित कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्या निरोगी कोंबडीमध्ये आजाराचा प्रसार होतो.
दूषित वातावरण, भांडी, उपकरणे, खाद्य, पाणी, पायताण, कपडे इत्यादी माध्यमांतून आजार पसरतो.
जंगली पक्षी आणि उंदीर या आजाराच्या जिवाणूंचे वाहक म्हणून कार्य करतात.
बाधित कोंबड्यांचा गट जीवनभर वाहक म्हणून कार्य करतो.
मुख्य लक्षणे :
आजारामुळे श्वसनसंस्था बाधित होते. श्वसनाशी संबंधित विकार उद्भवतात.
बाधित कोंबड्यांना श्वास घेण्यास त्रास होतो.
श्वास घेतेवेळी कोंबड्या घर्र -घर्र आवाज करतात, शिंकतात आणि खोकलतात.
नाकातून शेंबडासारखे चिकट आणि घट्ट स्राव येतो. त्यामुळे नाकपुड्या अरुंद आणि बंद होतात. कोंबड्या चोचीने श्वास घेतात.
डोळ्यावर सूज येते आणि डोळ्यातून पाणी किंवा फेस येतो.
कोंबड्या सुस्त राहतात. त्या हालचाल करीत नाहीत. जबरदस्तीने उठविले तरच हालचाल करतात.
शारीरिक वाढ खुंटते. वजन लक्षणीयरीत्या कमी होते.
दीड ते दोन किलोच्या दिसणाऱ्या मांसल कोंबड्यांचे वास्तविक वजन अपेक्षेपेक्षा भरपूर कमी दिसून येते.
खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते.अंडी देण्याचे प्रमाण कमी होते.
बाधित कोंबड्यांचा तुरा आणि लोंब सुकतात आणि काळसर पडतात.
कोंबड्या लंगडताना दिसून येतात. त्यांचे पंख लटकलेले दिसून येतात.
बाधित कोंबड्यांना इतर अनेक आजार दिसून येऊ शकतात.
निदान :
लक्षणांवरून किंवा शव विच्छेदन करून अचूकपणे करता येत नाही. त्यामुळे नमुने प्रयोगशाळेत पाठवून खात्री करून घ्यावी.
उपचार :
प्रतिजैविके देऊन या आजाराचा कायमस्वरूपी उपचार होऊ शकत नाही.
पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन आवश्यक उपचार करावेत.
अंडी देणाऱ्या कोंबड्यांना प्रतिजैविके दिल्यास अंड्यात जिवाणू संसर्गाची शक्यता कमी होते. मात्र नाहीशी होत नाही.
प्रतिबंधात्मक उपाय :
शेड व्यवस्थापन :
पिले आणण्यापूर्वी शेडची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण चांगल्या प्रकारे करावे.
तीन ते चार दिवस दररोज जिवाणूरोधी औषध फवारावे.
शेडमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
शेडमध्ये अमोनियाची मात्रा कमीत कमी राहील याची खात्री करावी.
शेडमध्ये वायुविजन योग्य होईल याची दक्षता घ्यावी.
गादी ओली होऊ देऊ नये. तसेच जास्त कोरडी होऊन धूळ उडू देऊ नये.
शेडमध्ये जंगली पक्षी, उंदीर, घुशी यांसारखे वाहक प्राणी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
दैनंदिन व्यवस्थापन
शेडमधील व्यवस्थापण चांगले ठेवावे.
पिण्याचे पाणी स्वच्छ, ताजे, जिवाणू आणि विषाणूरहित असावे. पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे.
दूषित खाद्य आणि पाणी देऊ नये. खाद्य बुरशीजन्यरहित असावे.
फिडर आणि ड्रिंकर स्वच्छ केल्यानंतर जीवाणूरोधी औषधामध्ये बुडवून घ्यावे.
पिले नामांकित हॅचरीमधून विकत घ्यावीत.
ऑल इन ऑल आउट पद्धतीचा अवलंब करावा.
शेडमध्ये जात असताना हात धुऊन घ्यावे. पाय निर्जंतुक द्रावणात बुडवून घ्यावेत.
जैवसुरक्षा मानकांचा काटेकोर अवलंब करावा.
आजारी कोंबड्यांना निरोगी कोंबड्यांपासून वेगळे करावे.
मृत कोंबड्यांना खोल पुरून टाकावे.
आजाराचे नियंत्रण करण्यासाठी बाधित शेडमधील सर्व कोंबड्या आणि लिटर काढून टाकावे. शेड, संपूर्ण परिसर, फिडर, ड्रिंकर इत्यादींचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
ब्रीडर व्यवस्थापन
ब्रीडर कोंबड्यांना २०० ते ३०० संख्येच्या समूहात ठेवावे.
ब्रीडर कोंबड्यांची नियमित रक्तजल चाचणी करावी.
उबवणुकीसाठीच्या अंड्यांमधील जिवाणूंचा नाश करण्यासाठी प्रक्रिया करावी. त्यासाठी ताज्या अंड्यांना दोन तास उबणूक यंत्रात ठेवावे. त्यानंतर त्यांना दोन ते चार अंश सेल्सिअस तापमानावर योग्य प्रतिजैविक द्रावणात ३० मिनिटे बुडवून घ्यावे किंवा अंड्यांना उबणूक यंत्रात ४० ते ४७ अंश सेल्सिअस तापमानावर ११ ते १४ तास ठेवावे. त्यानंतर सामान्य तापमानापर्यंत थंड करावीत.
डॉ. सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९
(पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.