Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीने शुक्रवारी (ता. १८) येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयापुढे घंटानाद आंदोलन केले. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे.
सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असताना शेतकऱ्यांनी धान, कपाशीसारख्या पिकांची पेरणी केली होती. मात्र गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे आणि उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.
अशा परिस्थितीत शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या मदतीस धावून यावे, पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, दुबार पेरणीसाठी आवश्यक ते सर्व शासकीय पाठबळ द्यावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुबार पेरणीकरिता उत्तम दर्जाचे बी बियाणे देण्यात यावे, जिल्ह्यात बोगस बी-बियाणे विक्री करणारे व्यापारी व कंपन्यांवर कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतानासुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खत मिळत नाही, अनेक कृषी केंद्रांवर युरिया व डीएपी खतांचा तुटवडा आहे.
तसेच काही ठिकाणी खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना ‘लिंकिंग’ पद्धतीने खते घेण्यास भाग पाडले जात आहे, त्यामुळे खत घेणाऱ्या शेतकऱ्यांना खतासोबत दुसऱ्या वस्तूंची खरेदी बंधनकारक केली जाते. ही पद्धत अन्याय करणारी आहे, ती त्वरित थांबवावी व शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खत उपलब्ध करून देण्यात यावे, यासह इतर मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कृषी अधीक्षक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले तसेच जिल्हा कृषी अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अॅड. कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेस अध्यक्ष नीतेश राठोड, प्रभाकर वासेकर, माजी नगरसेवक रमेश चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, घनश्याम वाढई, प्रतीक बारसिंगे, पुष्पलता कुमरेसह शेकडोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.