Banana
Banana  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharudra Manganale: रोज रोज केळी शिकरण...

महारुद्र मंगनाळे

- महारूद्र मंगनाळे

केळी हे खऱ्या अर्थाने सामान्य माणसाचं फळ आहे. स्वस्त अन् बारमाही सहज उपलब्ध असलेलं. छोटं बाळ त्याच्या अन्न खाण्याची सुरूवात केळीपासूनच करतं. गरीब-श्रीमंत अशा सगळ्यांना केळी आवडते.

माझ्या केळीसंबंधीच्या आठवणी अगदी बालपणापासूनच्या आहेत. शेतकरी कुटुंब असल्याने घरी कायम भरपूर दुध असायचं.

घरी केळी आणली की, शिकरण हमखास व्हायचं. मात्र तेव्हा गहू दुर्मिळ होता.

गव्हाची चपाती चैन समजली जायची. सण-वार, पाहुणे, समारंभ असला तरच चपाती व्हायची. बऱ्याच वेळा भाकरी बरोबर शिकरण खायचो. नुसतं शिकरणही चालायचं.

शाळा, कॉलेज, पुढे पत्रकारीता सुरू झाली तरी शिकरणाची आवड कायम राहिली. दैनिक लोकमनचा संपादक म्हणून कार्यरत असताना, आठवड्यातून दोन-तीन वेळा शिकरण चपाती खायचो.

तोंडी लावायला आंब्याचं लोणचं किंवा शेंगाची चटणी असली की पुरे. मला शिकरण आणि चपाती, या दोन्हीवर तूप लागतं. तुपामुळं चवीत मस्त बदल होतो.

साधारण २००० सालापर्यंत हे केळी व शिकरण प्रेम सुरू होतं. याच काळात दुधातील भेसळीच्या बातम्या वाचून बाहेरचं दुध खाणं बंद केलं.

दुधाचा चहाही सोडला. फक्त गावी शिरूरला गेलो तरच दुध भाकरी खायचो.

दरम्यान रसायनांचा वापर करून कृत्रिमरित्या केळी कशा पिकवतात आणि या केळी आरोग्यासाठी कशा घातक असतात, यावर बरंच वाचनात आलं.

हळूहळू केळी खाणं बंद झालं. दोन-चार वेळेस हिरवी केळी आणून घरी पिकवून खाल्ली. पण ते पुन्हा पुन्हा करणं शक्य नव्हतं. केळी, शिकरण एक तपापेक्षा अधिक काळ बंद राहिलं.

मी शेतात घर बांधून तिथं राहायला लागलो. घराला नाव दिलं रुद्रा हट. तिथं राहायला आल्यापासून पुन्हा दुधाचा वापर सुरू झाला.

दुध, दही, ताक, तूप, श्रीखंड, बासुंदी, पेढा... अशी सगळी रेलचेल असते. महिन्यातून एक-दोन वेळा तरी बासुंदी मी घोटतो. पण शिकरण इतिहासजमा झालं होतं.

बागेत तीन-चार जागा रिकाम्या होत्या. गेल्या वर्षी सवितानं कुठून तरी केळीची दोन रोपं लावली. केळीला भरपूर पाणी लागतं.

आम्ही पाणी कमी पडू दिलं नाही. शेणखत दिलं. झपाट्याने केळी वाढली. दोन्ही झाडांना फुलं लागली. त्यातून इवली इवली केळी वाढू लागली.

केळी वाढत असलेली बघणं, हा दररोजचा आनंददायी अनुभव होता. केळी चांगली पोसली. उन्हामुळं केळी उलायला लागली.

दहा-बारा दिवसांपूर्वी दोन्ही झाडांच्या केळीचे घड काढून ठेवले. तीन दिवसांतच चार-पाच केळी पिकल्या.

अनेक वर्षांच्या खंडानंतर शिकरण केलं. चवीचं वर्णन करायला शब्द नाहीत. तृप्त झालो. आज पुन्हा शिकरण-चपाती. हे जेवण केलं की, सात-आठ तास भूक लागत नाही.

अनेक जण केळीचे तुकडे करून, त्यात दुध साखर टाकून चमच्याने खातात... बिच्चारे. त्यांना शिकरण कसं करतात ते माहित नाही. एका पातेल्यात साल काढलेली केळी टाकायची.

त्यात गरजेएवढी साखर टाकायची. हाताने केळी कुस्करून बारीक करायची. त्यात दुध टाकायचं. साययुक्त दुध असेल तर अधिक उत्तम.

पुन्हा हे सगळं मिश्रण एकजीव करायचं. जे तयार होतं ते शिकरण. त्यावर तुप टाकलं तर ते अधिक चविष्ट बनतं.

सध्या माझी शिकरणाची दिवाळी सुरू आहे. केळीची आणखी चार झाडं लावलीत. त्यांना केळी लागली की, बोलवतो शिकरण खायला. तोपर्यंत बाजारची केळी आणि बाजारच्या दुधाचं शिकरण गोड मानून घ्या तुम्ही.

-----------

(लेखक लातूर येथील शेतकरी व पत्रकार आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT