आबाजी उर्फ मिलिंद पाटील
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला पाळीव पशूंचे विविध खेळ, स्पर्धांचं वेड आहे. कृषी संस्कृतीत बैल हा शेतकऱ्याचा जोडीदार असतो. त्याचं बैलांसोबतचं जीवलग सख्य लक्षात घेता घटकाभरची करमणूक करायला सुद्धा ते एकमेकांसोबतचाच खेळ निवडतात. चिखल गुठ्ठा हा त्या पैकीच एक साहसी खेळ.
जो माणूस आणि बैल यांनी सोबत खेळायचा असतो. चिखलात नुसतं चालणं किती अवघड असतं, हे सगळ्यांना ठाऊक आहे; मग चिखलातून चक्क वेगात पळायला तर वेगळी शारीरिक हिकमत लागते.
उरात धडकी भरविणारा हा खेळ नेमका कसा असतो? तो साहसाचं प्रतीक का मानला जातो? त्यांचा राउंड कसा असतो? त्याचे नियम काय आहेत? इत्यादी प्रश्नांचा उलगडा करणारा हा रिपोर्ताज लिहिला आहे, खुद्द गावपाड्यात राहून तिथल्या लोकजीवनाची निरीक्षणं नोंदविणाऱ्या शेतकरी लेखकाने.
नंतर नंतर मात्र शर्यतीच्या बैलगाडीची रचना बदलली. तिच्या निर्मितीची सामग्री बदलली. अवजड लाकडांऐवजी पोकळ पाइप वापरली जाऊ लागली. मोठ्या धावेची चाकं जाऊन हलकी फुलकी लोखंड आणि टणक रबराची चाकं आली. त्यामुळे एकूणच गाडीचा आकार, वजन कमी झालं आणि केवळ शर्यतीसाठी मजबूत बांधणीचा दुबैली छकडा तयार झाला.
त्याच्या माच्यात जेमतेम दोघंच बसू शकतील एवढंच सीमित स्वरूप निश्चित करण्यात आलं. त्यानंतर या शर्यतीतला वेग वाढला, परिणामी आवेगही वाढला. त्यात थ्रिल आणि ग्लॅमरसुद्धा येत गेलं. जुनाट लाकडी चाकं आणि त्यावरची लोखंडी धाव नामशेष झाल्यामुळे शर्यतीतला आवाजी खडखडाट बराच कमी झाला; पण अर्थकारणाचा छनछनाट मात्र प्रचंड वाढला. बक्षीस म्हणून दिल्या जाणाऱ्या फिरत्या ढाली गेल्या आणि लाखो रुपयांच्या रोख रकमांची लयलूट सुरू झाली.
गावोगावच्या देवस्थानांच्या यात्रा, जत्रा, म्हाया, उरूस किंवा गुढी पाडवा, दसरा अशा सणानिमित्त तसेच कुण्या बड्या राजकीय धेंडांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ अशा कशा ना कशाच्या निमित्ताने बैलांच्या स्पर्धांचं आयोजन असतं. परिणामी, राज्यभरातल्या कुठल्याही गावगाड्याला बैलांचं आकर्षण मात्र अशा कित्येक निमित्तांनी वाढतच राहिलं आहे. या शर्यतीतला थरार अनुभवायला तमाम बैल शौकीनांनी माळरानावर गर्दी करायची, हे चित्र कानाकोपऱ्यातल्या खेडोपाडी बघायला मिळतं.
या शर्यतीतली ईर्षा मोठी झिंगबाज ठरली आहे. या वेडाची सुरुवात कोल्हापुरात झालीय. आज त्या शर्यतींना जवळपास दीडशे वर्षांची परंपरा आहे. जिद्द, चेव आणि वेग यावर आधरालेला तो धाडसी खेळ असतो. जल्लोषात चित्कारणारी माणसांची तुफान गर्दी आणि तितक्याच शांत डोळ्यांनी स्पर्धेच्या रांगेत उभी असलेली बैलं असं परस्पर विरोधी चित्र तिथं दिसतं.
(का कुणास ठाऊक पण मला अशा थरारक खेळाच्या ठिकाणी मुद्दाम बैलांचे डोळे न्याहाळावे वाटतात, ती मूक स्पंदनं टिपावी वाटतात. असो.) पण मध्यंतरी मात्र या शर्यतींना गालबोट लावणारे प्रकार खूपच वाढले. बैलांना चाबकाने मारहाण करणे, त्यांच्या त्वचेला दाभणासारख्या मोठ्या सुईने कुणाला न दिसेल असे टोचणे, शेपट्या पिरगाळणे अथवा त्या दाताने करकचून चावणे, शर्यतीमध्ये मोटरासायकल समांतर चालवत पळणाऱ्या बैलाच्या अंगाला इंजिनच्या प्लगच्या हाय करंटचा झटका देणे, स्पर्धेआधी बैलांना भरपूर दारू पाजणे असे निर्दयी प्रकार वाढीस लागले.
या अतिरेकामुळे बैलगाडी शर्यतीवरच बंदी येण्याची नामुष्की ओढावली. अर्थात, हे फारच योग्य झाले, कारण या खेळात मुळात माणसाचं काय तुटत होतं बरं? तो काय बैलगाडीत बसून नुसता बेभान होऊन तोंडाला फेस येईपर्यंत जीव तोडून ओरडणार; पण तंगड्या तोडून पळता पळता खरी फेसाटी होणार ती मात्र बैलांचीच ना?
चिखलगुठ्ठा हा प्रकार मात्र बैलगाडी शर्यतीपेक्षा खूप वेगळा आहे. तो खराखुरा शेतकरी खेळ म्हणावा लागेल. अगदी साधा, नैसर्गिक म्हणावा असा. श्रावण ते विजयादशमी या कालावधीत भातकापणीला अवधी असतो, अजून ऊस हंगाम सुरू झालेला नसतो. या फुरसतीच्या कालावधीत अशा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. यातला थरार टोकाचा असतो; मात्र तो माणूस आणि बैलांच्या शरीराचा कस बघणारा असतो.
याचे दोन प्रकार असतात- दोन मागाचा राउंड आणि चार मागाचा राउंड. पहिल्या प्रकारात एका राउंडमध्ये बैलांसोबत दातक्यावर उभं राहून जाणं आणि येताना बैलांबरोबर पळत येणं आणि चार मागाच्या राउंडमध्ये हाच प्रकार दोन वेळा, पण विनाथांबा करावा लागतो. म्हणजेच चिखलगुठ्ठा या खेळात बैलाबरोबर कासरा धरणाऱ्यानं सुद्धा पळायचं असतं.
हे आव्हान कौशल्याने अचूक साधेल तो सिकंदर ठरतो. आणि विशेष म्हणजे या खेळात जास्त करून जी बैलं असतात ती शेतकामाची असतात... नांगरट करणारी, गाडी ओढणारी, औताची, उभ्या पावसात भात खाचरात चिखल करणारी... ही खरी मूळ संकल्पना अजून टिकवून असलेला हा खेळप्रकार आहे.
या उलट बैलगाड्यांच्या शर्यतीत धावणारी बैलं ही निव्वळ त्याच कारणासाठी हौस म्हणून बारा महिने पोसत ठेवायची असतात. त्यांचा खुराक अस्सल असतो. म्हणून तो गरिबांना परवडणारा खेळ नाही. त्यापेक्षा चिखलगुठ्ठा हा खेळ केव्हाही भारी.
या खेळाला मुक्या जनावरांच्या वेदनेची, त्यांच्या छळवादाची काळी किनार बिलकूल नसते. त्यामुळे हीच खरी जिंदादिल स्पर्धा मानली जाते. अर्थात, हव्यासापायी मध्यंतरी कोल्हापूरच्या दक्षिणी तालुक्यात चिखलगुठ्ठ्यात काठी चाबकाचे वाढत जाणारे गैरप्रकार झाले; पण त्यांना सुरुवातीलाच यशस्वीपणे तत्काळ चाप लावण्यात आला.
त्यामुळे आजमितीला तरी या खेळातला आनंद निश्चितच संपूर्ण निखळ आणि अहिंसक राहिलाय. आता तर आमच्या शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, चंदगड या बैलहौशी डोंगरी तालुक्यांत जनावरांच्या बाबतीतले छळवादविरोधी नियम अगदी कडक आहेत. आणि ते सहजासहजी तोडणं सुद्धा केवळ अशक्यच असतं. याचं मुख्य कारण म्हणजे चिखलगुठ्ठ्याचा जो पाणी भरलेला खंदक (राउंड) असतो, ती एक दहा- बारा फुट रुंदीची आणि जेमतेम शंभर मीटर लांबीची एक मोठी चर असते आणि दुतर्फा तेवढ्याच लांबीच्या मातीच्या उंचवट्यावर प्रेक्षकांनी उभं राहायची सोय असते.
दाटीवाटीने का होईना पण शर्यत सर्वांना नीट पाहता येते. या मार्गाच्या दोन्ही टोकाला एक एक टाइम किपर आणि दोन झेंडेधारी व पंच मंडळी असतात. संयोजकांचा नी समालोचन करणाऱ्यांचा तसेच बक्षिसांचे प्रायोजक, प्रतिष्ठित पाहुणे बसायचा मंडप सगळी स्पर्धा पूर्ण दृष्टिक्षेपात यावी अशा उंचावर असतो.
म्हणजे एकूणच हा सगळा एकदम खुला मामला असतो. लपवून छपवून काही नाही. त्यामुळे शर्यतीच्या वेळी कुण्या गुठ्ठकऱ्याच्या हातात साधी काठी जरी दिसली आणि धावताना बैलाची शेपटी जरी हातात धरलेली आढळली तरी हजारो डोळ्यांचे लक्ष असते. आयोजकांच्या नजरेतून ही गोष्ट सहसा सुटत नाहीच. पण चुकून सुटलीच तर प्रेक्षक आरडाओरड करून ती निदर्शनाला आणण्याची जागरूक तत्परता दाखवतात.
ही सार्वजनिक काळजीवाहू सजगता म्हणजे सर्वांनी मिळून बैलांवर केलेला एक उपकारच म्हणावा लागेल. या स्पर्धेत बैलाबरोबर माणूस सुद्धा तेवढ्याच धाडसाने सामिल असतो. म्हणून चिखलगुठ्ठ्यात मिळणारा आनंद हा आसुरी नसतो. तर तो केवळ निर्भेळ असतो. स्पर्धेला आलेली फिस्कारत्या श्वासांची ती धिप्पाड बैलं आणि त्यांचे शिडशिडीत पण चपळ गुठ्ठकरी नजरेत मावत नाहीत.
एकेका बैलजोडीभोवती त्यांचे समर्थक त्यांना प्रेरणा देत असतात, बैलांच्या पाठीवर मायेचा हात फिरवत असतात. बाकी हितचिंतक मित्रमंडळी बैलाबरोबर धावणाऱ्या गुठ्ठकऱ्याचा आत्मविश्वास बुलंद करत असतात. या गुठ्ठकऱ्यांना ड्रायव्हर अथवा जॉकी असं पण संबोधन आहे.
कमालीच्या चपळाईने बैलं ताणवणाऱ्या या सराईत ड्रायव्हरांची या स्पर्धेत हिकमत दिसून येते. जेवढा ड्रायव्हर चुणचुणीत तेवढी त्याला मागणी जास्त. एक बैलजोडी पळवून आणल्यावर बैलमालक लोक पाचशे ते सातशे रुपये मानधन स्वखुशीने देतात. पण काही हौशी गुठ्ठेकरी मात्र केवळ छंद म्हणून विना मोबदला हे काम करतात.
आमच्या पन्हाळा तालुक्यातल्या कणेरी गावच्या रणजित गणपती पाटील या तगड्या तरुण जॉकीची तर बातच जगावेगळी आहे. तो बैलं पळवल्याचे पैसे मागत नाही, कुणी खुशीने दिले तरच घेतो. पण हमखास मैदान मारून गुलाल घेणारा म्हणून रणजित सगळ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. मी त्याला विचारलं की बाबा रे जीवाचं नाव शिवा ठेवून तू हे काम करतोस खरं.. कधी कसली जोखिम आली तर रे? तर तो हसत हसत म्हणतो कसा,‘‘मला साधं बडीशेपचं सुद्धा व्यसन नाही.
ताळतंत्र ठेवून काम केलं की कसली भिती हो? तरी पण ज्याची बैलं ताणवायची आहेत त्या मालकांना मी आधी एवढंच सांगतो की मला काय दुखापत झाली तर मला दवाखान्यात पळवायची व्यवस्था तेवढी लगोलग करा. पण अशी वेळ अजून तर आलेली न्हाई.’’ मात्र मालकाला गुलालाचा मान मिळवून दिला की मात्र या बैलांबरोबर गुठ्ठकऱ्याचा पण यथोचित सन्मान करत त्याला भरघोस रक्कम दिली जाते.
एखादा हौशी मालक तर बक्षिसाची संपूर्ण रक्कम गुठ्ठकऱ्याला देऊन टाकतो. त्याला आपल्या बैलाच्या कर्तृत्वाचा आणि त्या मानाच्या गुलाली फेट्याचाच काय तो मनभरून अभिमान असतो. तो क्षण त्याच्यासाठी लाख मोलाचा असतो. मानाच्या फेट्याबरोबर सन्मानचिन्ह म्हणून बैलमालकाला आजकाल कुठे कुठे गदासुद्धा बहाल केली जाते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.