डॉ. ए. व्ही. झांबरे, धनंजय कुलकर्णी
Agricultural Engineering Career : भारत हा कृषिप्रधान देश आहे. परंतु आजही शेती व्यवसाय हा शाश्वत नाही. शेतीला शाश्वत करण्यासाठी शेतीचे आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठीच कृषी अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो.
कृषी अभियांत्रिकी शाखेमध्ये अन्न प्रक्रिया व तंत्रज्ञान, कृषी यंत्रे व शक्ती, जलसिंचन व निचरा, मृद् व जलसंधारण व अपारंपरिक ऊर्जा असे प्रमुख विभाग आहेत.
अन्न प्रक्रिया व तंत्रज्ञान विभागामध्ये विविध अन्नपदार्थांची प्रक्रिया, हाताळणी, साठवणूक, संवर्धन, नियंत्रण, पॅकेजिंग आणि वितरण आदी बाबींचा समावेश होतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अन्नपदार्थांचे निर्जंतुकीकरण, निर्जलीकरण, साठवण कालावधी वाढविणे, तसेच पोषक घटकांचे जतन, संरक्षणात्मक पॅकेजिंग, कॅनिंग इ.च्या माध्यमातून अन्नपदार्थांचे मूल्यवर्धन करता येते.
पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या वापरातून उत्पादन खर्च कमी करून अन्नपदार्थांची दीर्घकाळ साठवण करणे शक्य होते. अन्नप्रक्रिया उद्योगातील विविध खासगी कंपन्यांमध्ये तज्ज्ञ आणि कुशल मनुष्यबळाची गरज दिवसेंदिवस वाढते आहे. त्याचअनुषंगाने कृषी अभियांत्रिकी अंतर्गत अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना विविध करिअर संधी आहेत.
प्रवेश प्रक्रिया ः
बारावीनंतर बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी) हा चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे. या अंतर्गत कृषी अन्न प्रक्रिया व तंत्रज्ञान या विद्याशाखेचा अभ्यास विद्यार्थ्यास करता येतो.
भारतातील विविध कृषी विद्यापीठांतर्गत हा अभ्यासक्रम राबविण्यात येतो. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावीमध्ये विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होऊन एमएचटी-सीईटी/जेईई या सामाईक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे.
करिअर संधी ः
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विविध अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये तसेच विविध केंद्रीय आणि राज्यस्तरीय अन्न संशोधन संस्थांमध्ये वैज्ञानिक म्हणून नोकरीच्या संधी आहेत.
यासह स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासन (फूड इन्स्पेक्टर), भारतीय खाद्य निगम, कृषी कार्यालय, अन्नसुरक्षा अधिकारी तसेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच पदवीधर विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय देखील करू शकतो.
- डॉ. ए. व्ही. झांबरे, ९९२२५९४५२४
- धनंजय कुलकर्णी, ९६६५३४३३९६
(डॉ. झांबरे हे प्राचार्य म्हणून, तर कुलकर्णी हे कृषी प्रक्रिया अभियांत्रिकीचे विभागप्रमुख म्हणून
श्रीराम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, पानीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.