Pune News : कोल्हापुरमधील माधुरी या पाळीव हत्तीचा प्रश्न थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहचला आहे. न्यायालयात कोल्हापुरातील जैन धर्मीयांच्या संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर शनिवार (ता.१६) सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने गुजरातमधील जामनगर येथील एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे माधुरीस पाठवण्याच्या एचपीसीच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली आहे.
माधुरी हत्ती ही स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, संस्थान मठ नांदनी ता. शिरोळ यांच्या मालकिची आहे. ती फक्त धार्मिक विधीत वापरली जात असल्याचे मठाने सांगितले आहे. तर प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या पेटा संस्थेने देशपातळीवरील वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या उच्चाधिकार समिती (एचपीसी) कडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर २८ डिसेंबर २०२३ ला माधुरीला गुजरातमधील जामनगर येथे पाठविण्याचे आदेश एचपीसी दिले होते. तर पेटाने हत्तीच्या शारिरीक आणि मानसिक कारणांचा उल्लेख केला होता. तसेच गेल्या चार वर्षांपासून ती हत्ती जामनगर येथील ट्रस्टकडे जावा यासाठी प्रयत्न केले होते. तर मठास धार्मिक विधींसाठी १२ लाखांचा इलेक्ट्रीक हत्ती देऊ, असे आश्वासन देखील दिले होते.
मात्र धार्मिक आस्था एचपीसीने दिलेल्या आदेशाविरोधात कोल्हापुरातील जैन धर्मीयांच्या संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच पेटाने दाखल केलेल्या तक्रारीविरोधात एचपीसीने घेतलेल्या भूमिकेवरून याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती ए.एस चांदूरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठा समोर शनिवार (ता.१६) सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने एचपीसीच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली. तसेच न्यायालयाने एचपीसीला संस्थेची बाजू ऐकून घ्यायला हवी होती. यानंतरच माधूरीला हलविण्याचे आदेश द्यायला हवे होते, असे म्हटले आहे.
काय म्हणाले न्यायालय?
माधुरी नामक हत्ती ही मठाच्या मालकिची आहे. मठ संस्थेने तसा दावा केला आहे. यामुळे तिच्या बाबत कोणताही आदेश काढण्याआधी उच्चाधिकार समितीने (एचपीसी) मठाचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक होते. तर याआधीच मठाकडून एचपीसीकडे सर्व हकीकत सादर करताना विनंती करण्यात आली आहे. मात्र यावर देखील उच्चाधिकार समितीने निर्णय घेतलेला नाही. यामुळे मठाने केलेल्या विनंतीमधील सर्व पैलूंचा विचार करावा. तसेच एचपीसी जो काही निर्णय घेईल, तो सात दिवस लागू करू नये, असे आदेशही न्यायालयाने देताना माधुरीच्या जामनगरमध्ये स्थलांतरास अंतरिम स्थगिती दिली आहे.
नांदनी मठाचे म्हणणे काय?
नांदनी ता. शिरोळ येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, संस्थान मठाच्या मालकी हक्काची माधुरी हत्ती आहे. याबाबत वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ४०(२) अंतर्गत आवश्यक घोषणापत्रही मठाकडे आहे. तर माधूरी ही १९९२ पासून त्यांच्यासोबत असल्याचा दावा मठाने केला आहे. तसेच मठ माधुरीची पुरेशी आणि योग्य काळजी घेत घेते. दर चार-पाच महिन्यांनी तिची आरोग्य तपासणी शिमोगा येथील वन विभागातील डॉक्टरांकडून केली जाते. यामुळे राधेकृष्ण मंदिर एलिफंट वेलफेअर ट्रस्टकडे माधूरीच्या पाठवणीचे आदेश असे येणे अपेक्षित नव्हती. येथे महादेवीवर मोठ्या प्रमाणात लोकांची श्रद्धा असून माधुरीवर लोकांचे प्रेम आहे. मात्र याबाबत एचपीसीने संस्थेला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिलेली नाही.
कोणतेही पाऊल उचलणार नाही
सुनावणीदरम्यान सरकारी वकील आणि इतर पक्षकारांनी या प्रकरणी सूचना घेण्यासाठी वेळ द्यावा, मागणी न्यायालयाकडे केली. तर माधुरीची ज्या ट्रस्टकडे पाठवली जाणार होती. त्या ट्रस्टच्या वकिलानेही याचिकाकर्त्याच्या विनंतीवर निर्णय होत नाही तोपर्यंत माधुरीच्या बदलीच्या दिशेने कोणतेही पाऊल उचलणार नसल्याचे न्यायालयास सांगितले आहे.
काय आहे उच्चाधिकार समिती?
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांनी १२ मे २०२३ रोजी पर्यावरणविषयक समस्या आणि इतर समस्यांवर विचार आणि लक्ष ठेवण्यासाठी उच्चाधिकार समिती (HPC) समिती नेमली. ही समिती वन्य हत्ती आणि इतर प्राण्यांना पकडणे आणि त्यांचे इतर राज्यात हस्तांतर करणे या गोष्टींवर लक्ष ठेवते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.