Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदार संघांपैकी अक्कलकोट, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर मध्य आणि पंढरपूर-मंगळवेढा या ५ जागा मिळवत भाजपने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने माढा, करमाळा, मोहोळ आणि माळशिरस या ४ ठिकाणी विजय खेचून आणला. तर, शेकापने सांगोला आणि शिवसेना-उद्धव ठाकरे पक्षाने बार्शी अशा एकेक जागा मिळवत आपले अस्तित्व टिकवण्यात यश मिळवले.
जिल्ह्यात यापूर्वी अक्कलकोटला सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर शहर उत्तर विजयकुमार देशमुख, सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख, पंढरपूर-मंगळवेढा समाधान आवताडे यांच्या रूपाने या जागा भाजपकडेच होत्या, त्या त्यांनी पुन्हा मिळवल्या. त्यात देवेंद्र कोठे यांच्या रूपाने नव्या चेहऱ्याची सोलापूर मध्य मतदार संघामध्ये भर पडली. त्यांनी एमआयएमचे फारुख शाब्दी, माकपचे नरसय्या आडम, काँग्रेसचे चेतन नरोटे यांच्याशी लढत दिली.
माळशिरसमध्ये आमदार राम सातपुते (कमळ) यांना उत्तम जानकर (तुतारी) यांच्याकडून १३ हजार मतांनी पराभूत व्हावे लागले. सोलापूर शहर उत्तरमध्ये आमदार विजयकुमार देशमुख हे ४० हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले, इथे माजी महापौर महेश कोठे (तुतारी) यांनी त्यांना आव्हान निर्माण केले होते. तर सोलापूर दक्षिणमधून माजी मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांनीही ७७ हजार १९२ मताचे मताधिक्य मिळवत विजय मिळवला. शिवसेना-उबाठा गटाचे अमर पाटील यांच्याशी त्यांची लढत झाली. पण अपक्ष धर्मराज काडादी यांचेही मोठे आव्हान होते, पण ते फोल ठरले.
माढ्याचे नवखे उमेदवार अभिजित पाटील (तुतारी) यांनी सलग सहावेळा आमदार असलेले बबनराव शिंदे यांचे पुत्र आणि अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांना टक्कर दिली आणि त्यात ते यशस्वी झाले. शेजारच्या करमाळ्यातही अपक्ष आमदार संजय शिंदे, नारायण पाटील (तुतारी) आणि शिवसेनेचे दिग्विजय बागल अशी तिरंगी लढत झाली. त्यात नारायण पाटील यांनी १६ हजारचे मताधिक्य घेत विजय मिळवला. मोहोळमध्ये राजू खरे (तुतारी) यांनी विद्यमान आमदार यशवंत माने (घड्याळ) यांना आव्हान दिले आणि तेही २७ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले.
सांगोल्यात दीपक साळुंखे (मशाल) शहाजीबापू पाटील (धनुष्यबाण) हे नेते रिंगणात होते, पण या दोघांच्या भांडणात ऐनवेळी शेकापला डावलले गेल्याने याठिकाणी शेकापचे डॅा. बाबासाहेब देशमुख हे २५ हजार ३८४ मतांनी विजयी झाले. बार्शीत विद्यमान आमदार राजेंद्र राऊत (धनुष्यबाण) विरुद्ध दिलीप सोपल (मशाल) या लढतीत सोपल यांनी ६ हजार १६९ मते घेत बाजी मारली. अक्कलकोटला काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे विरुद्ध भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या लढतीत कल्याणशेट्टी यांनी ४९ हजार १३० चे मताधिक्य मिळवत सलग दुसऱ्यांदा म्हेत्रे यांचा पराभव केला.
पंढरपूर-मंगळवेढ्यात चौरंगी लढतीत मनसेचे दिलीप धोत्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अनिल सावंत हे बाजूला फेकले गेले, त्यांच्याऐवजी काँग्रेसचे भगिरथ भालके आणि भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्यातच थेट लढत झाली. त्यात आवताडे यांनी आपला गड पुन्हा एकदा राखला.
विधानसभेत सोलापूरचे पाच नवे चेहरे
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघांपैकी निवडून आलेले ५ आमदार पहिल्यांदाच विधानसभेत पोचणार आहेत. त्यात सोलापूर शहर मध्यमधून भाजपचे देवेंद्र कोठे, त्याशिवाय मोहोळ, माळशिरस आणि माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अनुक्रमे राजू खरे, उत्तम जानकर आणि अभिजित पाटील हे तिघे आणि सांगोल्यातून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॅा.बाबासाहेब देशमुख अशा ५ जणांचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.