Banana Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Cultivation : करमाळ्याच्या पश्‍चिम भागात वाढली केळीची लागवड

Banana Farming : करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्र परिसरातील वाशिंबे, पारेवाडी, केत्तूर, पोमलवाडी, खातगाव, टाकळी, गुलमोहरवाडी येथील शेतकरी ऊस पिकाला फाटा देऊन केळी लागवड करताना दिसत आहेत.

Team Agrowon

Solapur News : करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्र परिसरातील वाशिंबे, पारेवाडी, केत्तूर, पोमलवाडी, खातगाव, टाकळी, गुलमोहरवाडी येथील शेतकरी ऊस पिकाला फाटा देऊन केळी लागवड करताना दिसत आहेत.

उजनी लाभक्षेत्र परिसरातील ६० ते ७० टक्के पारंपरिक ऊस क्षेत्रावरील आडसाली ऊस मोडून शेतकरी केळी लागवड करायला पसंती देत आहेत. करमाळा तालुक्यात चालू वर्षी १० हजार २९४ हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली आहे.

ऊस पिकासाठी मोठा खर्च असला तरी केळी पिकाचे पैसे लवकर मिळतात, तर उसाचे पैसे वेळेवर मिळतीलच याची शाश्‍वती नाही. ऊस घालवण्यासाठी शेतकऱ्यांना तालुक्यातील चारही कारखाने बंद असल्याने तालुक्याबाहेरील कारखान्यांची हांजी-हांजी करावी लागत आहे. ऊस तोडणाऱ्या मजुरांना अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत, इतर खर्च वेगळाच.

गेल्या तीन महिन्यांपूर्वी केळीला ३३ रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला होता. त्यामुळे केळी पीक तोट्यात जात नाही, याचा भरवसा केळी उत्पादकांना आला आहे. केळी लागवडीसाठी कृषी विभागामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून शंभर टक्के अनुदान देण्यात येत असल्यामुळेही करमाळा तालुक्यातील केळीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

सध्या केळीला २० रुपये दर मिळत असला तरी यापुढे निश्चितच केळीच्या दरात सुधारणा होऊन दरात वाढ होणार आहे. करमाळा तालुक्यात सर्वप्रथम सुरवातीला कंदर भागातील शेतकऱ्यांनी केळी पिकाला पसंती दिली व त्यापासून ते केळी उत्पादक मालामाल झाले.

त्यानंतर पश्चिम भागातील वाशिंबे परिसरात केळी पिकाचे क्षेत्र वाढले व पश्चिम भागही केळीचा आगार झाला आहे. पारंपरिक ऊस पिकाला फाटा देऊन परिसरातील शेतकरी केळीबरोबरच पेरू, पपई, सीताफळ, डाळिंब, कलिंगड, खरबूज या पिकांकडे वळत आहेत. केळी पिकामध्ये कांदा, हरभरा, कलिंगड, खरबूज, मिरची यांसारखी आंतरपिके घेतली जात आहेत.

केळीच्या रोपांची दरवाढ

सध्या केळी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून, केळीच्या रोपांची टंचाई जाणवत आहे. जैन कंपनीची रोपे दोन-तीन महिने वेटिंगने मिळत असल्याने सह्याद्री, एमजे बायोटेक, मायक्रोसन, विल्यम प्राइम, राईज अँड शाईन, अजित, गणेश या इतर कंपन्यांच्या रोपांना मागणी असून, लागवडीपूर्वीच रोपांचेही बुकिंग करावे लागत आहे.

करमाळा तालुक्यात मागील वर्षी ७२९० हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली होती. तर चालू वर्षी १० हजार २९४ हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली आहे. ऊस गाळप हंगाम संपेपर्यंत त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
- उमाकांत जाधव, कृषी अधिकारी, करमाळा
शेतामध्ये काहीतरी नवीन करावे या उद्देशाने केळी लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला. केळी पीक घेतल्यानंतर त्या शेतात इतर पिकांसाठी लाभदायक ठरत आहे. नवीन पिकाच्या उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ होते तर ऊस पिकासाठी तर अमृतच मानले जाते.
- विलास खुळे, केळी उत्पादक, करमाळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT