Rural Development | Kalpna Dudhal Agrowon
ॲग्रो विशेष

Kalpna Dudhal : दुसऱ्यांच्या घरात नांदणाऱ्या सावल्या

बायांनी शेजनं पाथा धरल्यात. एकेका सा-याची एकेक पाथ. सगळ्यांनी डोक्यावर काही ना काही पांघरलंय. तेवढंच उन्हाला आडवाण. उजव्या हातातल्या खुरप्याच्या आणीनं बाया गवतं काढत आहेत. डाव्या हातानं गवताच्या मुठी मागं ठेवत आहेत.

कल्पना दुधाळ

Kalpna Dudhal - भर दुपार. उन तळपतंय. चहुबाजूंनी बांधाची मुरड घातल्यागत भुईमूगाचं रान दिसतंय. काळ्या चौकोनी कापडावर हिरवी नक्षी छापलेली असावी तसे भुईमुगाचे झुपकेदार टगळे रानभर पसरलेत.

वाढत्या उन्हाबरोबर टगळ्यांवरची सकाळची हिरवीगार टवटवीत झाक सुकून पांढरीफटक होत चाललीय.

बोटांच्या कांड्याएवढे लंबगोल पानांचे बचकबचक टगळे भूईवर रांगताहेत. कुठंबुठं बुडाशी बारीक नाजूक पिवळी फूलं डोकावू लागलीत.

नुकत्याच सुटलेल्या टोकदार आरा मातीत घुसून टोकाशी बारीक गाठी धरतील. खत, पाणी मिळत जाईल तसं मग त्यात कोवळे दाणे आकारू लागतील.

टरफल टण्णक होत जाईल. आतले कोवळे दाणे निब्बर होतील. शेंगा काढायला येतील. पण आता आरा मातीत घुसण्याआधी भुईमूग खुरपायला पाहिजे म्हणून बायांना खुरपायला बोलवलंय. 

बायांनी शेजनं पाथा धरल्यात. एकेका सा-याची एकेक पाथ. सगळ्यांनी डोक्यावर काही ना काही पांघरलंय. तेवढंच उन्हाला आडवाण. उजव्या हातातल्या खुरप्याच्या आणीनं बाया गवतं काढत आहेत. डाव्या हातानं गवताच्या मुठी मागं ठेवत आहेत.

खुरपण्याची एकसारखी लय बायांबरोबर रानाला आलीय. हळूहळू पाथा पुढं सरकतेत. एखाद्या बाईची पाथ पुढं गेली की मागची हळूच खडा मारून तिला खुणावतेय, एवढं काय भराभर उरकायला लागलीस ? काम काय होईलच की.

एखादी बाई मागं राहिली की तिला दुसरी म्हणतेय, काय झालं गं बाई. लैय मागं रेंगाळली. तर ती म्हणते, काय बाई उत आलाय तणाला. मग ती हात उचलून खुरपतेय. मालकिणीची पात सगळ्यात पुढं.

तिला वाटतंय बाकिच्या बायांनीपण पटापट खुरपावं. पण रोजाच्या बाया कशाच्या पटापट खुरपतेत ? त्यांना काय एक दिवस काम करायचं नाही. रोज कुणाच्या ना कुणाच्या रानात कामाला जायचं.

उरका बायांनो हात उचला म्हणत मालकिण कुणाच्या मागं तण राहतंय का त्यावर नजर टाकते. बाया कुणी काही, कुणी काही सांगतेत. घरचंदारचं. पाव्हण्यारावळ्यांचं. बायांनी घोलमाडलेला भुईमूग सुकल्यागत दिसतोय.

शीपरूट, केणा, इचका, पातर, माठ, चिकटा, चिघळ, घोळू, हारळी, वाघनखी, दुधानीचं ठोंब अशी गवतं काढल्यावर खुरपलेलं रान निर्मळ झालंय. एखादा ठोंब खुरप्यानं निघंना झाला की डाव्या हातानं जोर लावून उपटावा लागतोय.

बायांनी जागोजागी काढून ठेवलेल्या गवताच्या मुठी गोळा करायला घरच्या पोरींना पिटाळलंय.  पाथंची गवतं गोळा करून बांधावरच्या लिंबाखाली ढीग घालायचाय. कलकलत, खेळतमेळत पोरी रानात आल्या.

पटापट गवतं गोळा करून झाली की लिंबाखाली खेळायला पळत सुटतेत. लिंबाच्या पानांच्या लवचिक काड्यांच्या अंगठ्या विणून त्यात गवताचे तुरे खोचून एकमेकींना दाखवत नटताहेत पोरी. लिंबाखाली उन सावलीची हलती रांगोळी आहे.

नुकताच लिंबाला तउर आलाय. बारीक पांढऱ्या फुलोऱ्याचा सुगंधी घमघमाट उन्हात मिसळून मंदमंद दरवळ सुटलाय. काही देठांना नखनख पोपटी लिंबोळ्या डुलताहेत. गवताच्या गार ढिगाला पाठ लावून पोरींच्या गप्पा रंगल्या आहेत, ‘यावर्षी नागपंचमीला मोठा झोका बांधायचा.

या मोठ्या फांदीला. मग या कडेच्या फांदीपासून त्या कडेच्या फांदीपर्यंत झोका चढवायचा. तोंडात पाला आणून दाखवायचा.’ मग शांत स्थिर सावल्या झोक्याबरोबर झुलणार. हलणा-या फांद्या बघत, अंगभर सावल्या झेलत दिवस संपून जाणार. हे सगळं आठवून पोरी जशा काही आत्ताच झोके खेळत आहेत. 

हा बरडाचा मोठा लिंब. घरातल्या जबाबदार माणसागत भक्कम उभाय बांधावर. मोठ्या फांदीला दरवर्षीच्या झोक्याचं दावं कचून कचून खचा पडल्यात. घरातल्या मोठ्या माणसांच्या मागं लागून पोरी झोका बांधून घेतात.

पलीकडच्या बांधाला उंबराचं झाड आहे. त्यावर पाखरांचा कलकलाट चालू आहे. चारपाच पाखरं वर उडाल्यागत करतात की परत तिथंच घुटमळत आहेत. पाखरात पाखरं मिसळतात. कच्ची, पिकलेली उंबरं, अर्धवट खाल्लेली, खाऊन खाऊन भुगा पडलाय खाली. उंबराचा गोडसर वास दरवळतोय.  

पाथा पुढं गेल्या की गवतं गोळा करणं लांब पडतंय म्हणून पोरी गवतं धडप्यात बांधून लिंबाखाली आणून टाकत आहेत. वा-यानं कुठं पानसुद्धा हलत नाही. बाया म्हणतेत, वा-याची दातखिळ बसली का काय.

घामाच्या धारा लागल्यात. गवताचा ढीग सुकतोय. दुपारच्या भाकरी खायला सगळे लिंबाखाली गोळा झालेत. पाणी प्यायला भरून आणलेली कळशी लिंबाच्या बुडाशी ठेवलीय. नुकत्याच कुंभाराकडनं आणलेल्या मातीच्या काळ्या कळशीवरनं पाण्याचे थेंब खाली घरंगळतेत.

त्या झिरपलेल्या पाण्यानं बुडाखालची माती ओली झालीय. पाण्यातल्या सावल्यांचे घोट घटाघटा वाजत आहेत. भाकरीच्या तुकड्यावरच्या सावल्या घासाबरोबर पोटात जात आहेत. मग हूश्श करत बाया घडीभर इथंतिथं आडव्या झाल्यात. पोरीही गवताच्या ढिगाशेजारी हसत खिदळत पडल्यात. 

इतक्यात कुठूनतरी वा-याचा भराका लिंबात घुसला. फांद्या हलल्या. सावल्या हलल्या. अंगावरचं ठळक उन हललं. फांद्यांवरचं आभाळ हललं. बांधावर झोपलेल्या सावल्या हलल्या. वा-याच्या झुळकीनं पोरींना बरं वाटलं. 

पोरी उल्हासल्या. पोरी आणि सावल्या वेगवेगळ्या नाहीतच. हूड पोरी झुळकीबरोबर झुळूक झाल्या, सावल्या झाल्या. वारा पोरींना विचारतोय, सांगा, सांगा पोरींनो कुणाच्या व् तुम्ही ? वा-याच्या अचानक प्रश्नांनी पोरी काव-याबाव-या झाल्या. कुणाचं नाव सांगावं ?

आईचं, वडलांचं, आजीचं, आजोबांचं की नुसतंच आडनाव सांगावं ? की तो-यात स्वतःचं नाव सांगावं ? पोरींची चुळबूळ चालूय. वारा भलतेसलते हावभाव करतोय. उठून जावं तर अडवतोय. फांद्यातून, सावल्यांतून पोरींशी चाळे करतोय.

पोरी अंग चोरून बसल्यात. उनाड वारा थांबत नाही. भराक्यामागनं भराके सुटलेत. आता मात्र पोरींना वा-याचा राग आलाय. त्या डोळे वटारताहेत. कुजबुजताहेत. आतापर्यंत दडलेलाच बरा होता. कुणी याचं दार उघडलं आणि हा कानात वारं शिरल्यागत भान विसरलाय.

धुराळा, उन, गचपान उधळतंय. सावल्यांचे आकार बदलत आहेत. लिंबात लुडबुडतोय वारा. हट्टाला पेटलाय. झिप-या उडवून तोंडावर आणतोय काय, झग्यामधे घुसून छत्रीगत फुगवतोय काय, हाताला ओढतोय काय.

काय करावं पोरींना काही सुचत नाही. नंतर नंतर तर वा-यानं पोरींच्या अंगावरचे कपडे काढून घेतले आणि स्वतःच नेसून उनाडू लागला. वारा खिदळतोय. चिडवतोय. हसवतोय. खदाखदा अघोरी हसतोय. सगळीकडनं पोरींना घेरलंय.

पोरींना पळू देत नाही वारा. धुम्माट पळायचं बळ आहे त्यांच्या काटक पायात. पण पोरींना सावल्यांगत लिंबाला बांधलंय. वारा छळतोय पोरींना लांबून जवळून. जरा रिकामं सोडून लांब जाऊ देतोय की पुन्हा माघारी ओढतोय. हिसकं देतोय.

वारा वेड्यासारखा करतोय. फडफडत्या सावल्यात धडपडत्या पोरी. उन्हाला, उजेडाला पाठीवर घेऊन वा-याचा छळ सोसणा-या सावल्या आणि पोरी. सावल्यांच्या सावल्या. बुडाच्या स्थिर सावल्यांभोवती हलत्या फांद्यांनी फेर धरलाय.

असंख्य बोटं बोटांत गुंतवून फेर धरलेल्या सावल्या. दुसऱ्यांच्या तालावर नाचणाऱ्या सावल्या. दुसऱ्यांच्या घरात नांदणा-या सावल्या. वारा कधी सावल्या तोडून भिरकावतोय तर कधी नव्यानं जोडतोय.

लिंबाच्या पालापाचोळ्यावर पहुडलेली एकेक सावली हलली. उठून बायांबरोबर भुईमूग खुरपायला आली. गवताच्या सावल्या उपटून मागं ठेवल्या. पोरींनी पटापट गवतं गोळा करून ढीगावर आणली. ढीगात सावल्या गुडूप केल्या.

उन्हातनं लसलसत लिंबाखाली गारव्याला आलेल्या कुत्र्याच्या जीभेवर रेंगाळल्या सावल्या. मग लाळ होऊन मातीत मिसळल्या. सावल्यांची चित्रंच चित्र मनाला मोहवली. त्यातली काही चित्रं कवितेत आली- सावल्या

बांधावर निजल्या व्

हुड सावल्या उन्हाच्या

वारा पुसतो पोरींनो

सांगा तुम्ही व् कुणाच्या

चुळबुळल्या पोरी त्या

वारा करताना चाळे

अंग चोरून बसल्या

वटारून मोठे डोळे

कुजबुजल्या पोरी व्

नाकं मुरडून त्याला

त्यो बी हट्टाला पेटला

ओढी पोरींच्या हाताला

डोळ्यांदेखत माझ्या व्

वारा फांद्यात घुसला

झगे ओढून पोरींचे

त्यो ग सोताच नेसला

कशा धुम्माट पळाव्या

पोरी झाडाला बांधल्या

छळ वा-याचा सोसून

घरी उन्हाच्या नांदल्या

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT