Chimandada Patil
Chimandada Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Chimandada Patil : अंगारवाटेवरील वाटसरू

अनंत देशपांडे

Leader of Farmer Chimandada Patil : आर्थिक चळवळीत काम करणाऱ्‍या कार्यकर्त्यांना आयुष्याच्या शेवटपर्यंत आपले व्यक्तिगत चारित्र्य सांभाळणे आणि भोवतालच्या तसेच जगाच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करून त्या त्या काळाच्या कसोटीवर आपले विचार अद्ययावत आणि कालसुसंगत आहेत, याचे भान ठेवणे ही मोठी आव्हानात्मक बाब असते.

त्यामुळेच तर आर्थिक चळवळीत काम करणारे बरेच कार्यकर्ते काळाबरोबर भरकटताना दिसतात. काही अपवादात्मक कार्यकर्ते अशा प्रकारात मोडतात. दहिवद ता. अंमळनेर जि. जळगाव येथील चिमणदादा पाटील अशीच एक अपवादात्मक आसामी. आसामी अशासाठी ते आयुष्यच असे जगले की इतर कार्यकर्त्यांनासुद्धा त्यांचा हेवा वाटला असेल.

नव्वद वर्षाचे समृद्ध आयुष्य जगून चिमणदादा दोन मार्च रोजी अनंतात विलीन झाले. अमर हबीब, राजीव बसर्गेकर आणि मी गेल्या दोन वर्षांत दोन वेळा त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटलो आणि बोललो आहोत. त्यांचा वैचारिक वारसा साने गुरुजी यांच्या समाजवादी विचारांपासून सुरू झाला.

साने गुरुजी यांनी आत्महत्या केली तेव्हा चिमणदादांचे वय केवळ पंधरा-सोळा वर्षांचे होते. साने गुरुजी यांच्यापासून सुरू झालेली त्यांची वैचारिक वाटचाल स्थिरावली ती शरद जोशी यांच्या स्वातंत्रतावादी विचाराच्या शेतकरी चळवळीपाशी! खरे तर समाजवादी विचारधारा जपणाऱ्‍या कार्यकर्त्यांना शरद जोशी यांच्या खुल्या विचाराचे वावडे.

महाराष्ट्रात त्याला अपवाद दोन ग्रहस्थ. एक सेवा दलाचे विश्वस्त राहिलेले शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष कोपरगावचे भास्कर भाऊ बोरावके आणि दुसरे दहिवदचे चिमणदादा पाटील. हे दोन समाजवादी शेतकरी संघटनेच्या संपर्कात आले आणि समाजवाद या शब्दाची किमान त्यांच्यासाठी तरी या दोघांनी व्याख्या बदलून टाकली.

समाजाच्या विकासासाठी आणि भल्यासाठी योग्य अशी विचारधारा म्हणजे समाजवाद, अशी त्यांनी त्यांच्यापुरती व्याख्या केली. शेतकरी संघटनेचा विचार समग्र समाजाच्या भल्याचा. शेतीशी प्रामाणिकपणे नाळ जोडल्यामुळे असेल कदाचित त्यांना शेतकरी स्वातंत्र्याचा विचार भावला. म्हणूनच ‘सरकार समस्या क्या सुलझाये सरकार खुद समस्या है’ अशा प्रकारची मांडणी करणाऱ्‍या शरद जोशी यांच्या नि:शासकीकरणाच्या विचारापाशी येऊन चिमणदादा विश्वासाने थांबले.

साने गुरुजी यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीशी जोडून घेताना ‘शेतकऱ्‍यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण,’ असे आश्वासन शेतकऱ्‍यांना दिले होते. महात्मा गांधी निवर्तल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शेतकऱ्‍यांच्या शोषणावर औद्योगिकीकरण करण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्यानंतर नेहरूंच्या शेतकरी विरोधी निर्णयाने साने गुरुजी अत्यंत व्यथित झाले.

ज्या दिवशी साने गुरुजींनी आत्महत्या केली त्याच्या दुसऱ्‍या दिवशी अंमळनेरला एक शेतकरी मेळावा होणार होता. त्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याहून साने गुरुजी आणि मधू लिमये येणार होते. मधू लिमये यांना साने गुरुजी म्हणाले, मी शेतकऱ्‍यांना तोंड कसे दाखवू? स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांचे दुःखाचे दिवस कमी होतील, असा विचार सांगणाऱ्या गुरुजींना शेतकऱ्‍यांना तोंड दाखवणे आता लाजिरवाणे वाटत होते. साने गुरुजींच्या

अंतःकरणात ही बाब डाचत होती. महात्मा गांधींचा ‘किमान सरकार’ या विचाराचा वारसा जपणाऱ्‍या साने गुरुजींना नेहरूंची सरकारवादी नीती पचली नाही. कदाचित म्हणूनच साने गुरुजींनी आत्महत्या केली असावी. हा किस्सा चिमणदादांनी आम्हाला सांगितला.

माजी आमदार गुलाबराव पाटील चिमणदादांचे सख्खे भाऊ असल्यामुळे राजकारण्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यांनी ठरवले असते तर राजकारणात चांगला जम बसवू शकले असते. दादा त्या राजकीय जाळ्यात कधी अडकले नाहीत. मात्र शेतकरी संघटनेचा सच्चा पाईक म्हणून शरद जोशी यांचा आदेश शिरोधार्य मानून निवडणूक आंदोलनात आपला भाऊ गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध विधानसभेलाही उभे राहिले.

पांढरा खादीचा शर्ट आणि पांढरा पायजमा असा साधा पेहराव असलेले दादा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते. बैठका, कार्यक्रमात आमचे अनेक वेळा भेटणे व्हायचे. अभ्यासू कार्यकर्ता कसा असावा याचे उत्तम उदाहरण आणि आदर्श म्हणजे चिमणदादा पाटील! शेतकरी संघटनेसारख्या लढाऊ संघटनेचा कार्यकर्ता असूनही ते कधी आक्रमक झालेले, विचलित झालेले जाणवले नाही, नेहमी अगदी शांत राहिले. आर्थिक लढाई दीर्घ पल्ल्याची असते, याची त्यांना जाणीव होती.

त्यांना भेटलं की आपण प्रत्यक्ष गांधींना भेटतोय की काय, असा भास व्हायचा. कोणत्याही चळवळीत जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते सहसा लिहिण्याच्या बाबतीत उदासीन असतात. कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याने सांगितलेले विचार आपल्या शब्दात व्यक्त करता आले पाहिजे. हे कौशल्य चिमणदादा यांच्याकडे होते. अभ्यासपूर्ण लिखाण करण्यात ते माहीर होते.

सकाळ-ॲग्रोवनमध्ये त्यांचे बहुतांश लेख प्रसिद्ध झाले. त्यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह असलेलं ‘बळीराज्य’ आणि अन्य पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कविता, चळवळीची गाणी, आणि इतर लिखाण त्यांनी विपुल केले आहे. आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी अलीकडे लिहिलेले मोठे बाड दाखवले. शेवटच्या क्षणापर्यंत ते नव्याने विचार करत आणि लिहीत राहिले.

त्यांचे अप्रकाशित असलेले विपुल साहित्य त्यांच्या घरी उपलब्ध आहे. मराठवाड्यासारख्या कमी पाणी उपलब्ध असलेल्या भागात मधुरा सारख्या गोड्या ज्वारीपासून इथेनॉल तयार करावे, यासाठी ते कायम आग्रही असायचे. स्वामिनाथन आयोगाच्या अहवालातील शिफारशींचा त्यांनी अभ्यास केला.

सरकारने कोणत्याही प्रकारे उत्पादन खर्च काढला आणि शेतकऱ्यांना दिला तरी शेतकऱ्‍यांचे कल्याण होणार नाही, या भूमिकेवर ते ठाम होते. शेती, शेतकऱ्‍यांच्या प्रश्नांशी निगडीत जागतिक व्यापार संस्था, डंकेल प्रस्ताव, स्वामिनाथन आयोग आदी विषयांचा तर्कशुद्ध अभ्यास त्यांनी केला. कापूस सीमापार आंदोलनापासून निवडणूक आंदोलनापर्यंत सर्व आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला.

१९९१ मध्ये नरसिंह राव सरकारने खुली व्यवस्था स्वीकारली. केवळ औद्योगिक क्षेत्रात लायसेन्स, परमीट, कोटा राज्याला काही अंशी आवर घातला. पण शेती व्यवसायातील निर्बंध मात्र कायम राहिले. शेतीमधील लायसेन्स, परमीट, कोटा असलेले जमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा रद्द झाले पाहिजे तरच शेतकरी स्वतंत्र होईल, अशी भूमिका मांडणाऱ्‍या किसानपूत्र आंदोलनाला शरद जोशी यांचेच काम मानले.

शेतकरी प्रश्नांच्या लढ्यातील सर्व कार्यकर्त्यांना ते एका कुटुंबातील सदस्य मानीत. ऑगस्ट महिन्यात त्यांचे भाऊ माजी आमदार गुलाबराव पाटील निवर्तले. सांत्वन करण्यासाठी रोहित पवार त्यांच्या घरी गेले असता त्यांनी चिमणदादांना विचारले, आता असलेल्या राजकीय नेतृत्वाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? रोहित पवार यांचा हात हातात घेऊन चिमणदादा म्हणाले ‘माणुसकी जिवंत ठेवा.’ अंतर्बाह्य पारदर्शी विचार करणारा ‘अंगारवाटेवरून’ चालणारा एक वाटसरू दृष्टीआड झाला. अलविदा चिमणदादा...!

(लेखक शेतकरी संघटना आंबेठाणचे विश्वस्त आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nursery Business : ‘नर्सरी, लॅंडस्केपिंग, गार्डनिंग’ व्यवसायातील कुशल निकीता

Dairy Business : विदर्भात दुग्ध व्यवसायाला तयार केली बाजारपेठ

Smart Meters : ‘स्मार्ट मीटर्स’ म्हणजेच खासगीकरणाकडे वाटचाल

Cotton Rate : शेतकऱ्यांच्या ‘सोन्या’चे दर कधी वाढणार?

Crop Damage : कंदर भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, पपई भुईसपाट

SCROLL FOR NEXT