Grape Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Disease : द्राक्ष मण्यांवरील ‘ॲन्थ्रॅक्नोज स्पॉट’

Grape Farming : द्राक्ष पिकामध्ये अनेक बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्यामध्ये मुख्यत: डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, ॲन्थ्रॅक्नोज, जीवाणूजन्य करपा इत्यादी महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव आढळतो.

Team Agrowon

राहुल वडघुले

द्राक्ष पिकामध्ये अनेक बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्यामध्ये मुख्यत: डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, ॲन्थ्रॅक्नोज, जीवाणूजन्य करपा इत्यादी महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. या रोगांच्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष पिकामध्ये मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी या रोगांची ओळख माहिती असणे गरजेचे आहे.

आजच्या लेखात मण्यांवर येणारा ‘ॲन्थ्रॅक्नोज स्पॉट’ या रोगाविषयी माहिती घेऊया. मागील वर्षी (२०२३-२४) सांगली, कोल्हापूर या भागांत हा रोग मणी सेटिंग झाल्यानंतर आढळून आला होता. योग्य वेळेत या रोगाची ओळख न पटल्याने द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते.

रोगाची माहिती

  • रोगाचे नाव ः ॲन्थ्रॅक्नोज स्पॉट

  • शास्त्रीय नाव ः कोलेट्रोटीकम ग्लोईओस्पोरिओईड्स (Colletotrichum gloeosporioides)

  • रोगाचे कारण ः हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.

  • बुरशीचे डिव्हिजन ः Ascomycota

  • परजीवी प्रकार ः Facultative Parasite

  • यजमान पिके ः मिरची, कांदा, टोमॅटो, पपई

लक्षणे

  • मागील वर्षी या रोगाची लक्षणे फळांवर (द्राक्ष मणी) दिसून आली होती.

  • फळांवर तपकिरी रंगाचे लहान ठिपके दिसू लागतात. मध्यभागी काळा रंग, तर बाजूने तपकिरी रंगाचे हे ठिपके दिसतात. सुरुवातीला ही लक्षणे फिक्कट असतात. नंतर गर्द होत जातात.

  • बऱ्याच वेळा अतिरिक्त सी.पी.पी.यू. वापरल्यामुळे किंवा फुलकिडीने अंडी घातल्यामुळे अशी लक्षणे दिसतात. परंतु या रोगात याचे प्रमाण जास्त असून ते हळूहळू वाढत जाते.

  • हे ठिपके हाताने स्पर्श केले तरी हाताला जाणवतात.

  • हा रोग शक्यतो द्राक्ष मणी मोठे होण्याच्या ते मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेत दिसून येतो.

पोषक वातावरण

  • रोगाच्या वाढीसाठी २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान तसेच हवेतील आर्द्रता ८० ते ९५ टक्के पर्यंत वाढल्यास, रोगाचा प्रादुर्भाव चांगल्या प्रकारे होतो.

  • कोरड्या हवामानात रोगाची वाढ होत नाही.

  • मण्यांमध्ये पाणी उतरण्याच्या अवस्थेत अशी हवामान स्थिती निर्माण झाल्यानंतर बागेचे नियमित निरीक्षण करणे अत्यंत गरजेचे असते.

रोग कसा निर्माण होतो?

या रोगाची बुरशी मागील वर्षीच्या जुन्या फांद्यांवर किंवा पानांवर तंतू स्वरूपात किंवा स्क्लेरोशिया (sclerotia) तयार करून जिवंत राहते. पोषक वातावरण निर्मिती होताच, हे तंतू किंवा स्क्लेरोशिया (sclerotia) बिजाणूधानी (Acervuli) तयार करतात. या बिजाणूधानीमध्ये बीजाणू (Conidia) तयार होतात.

हे बीजाणू पाणी, वारा यांच्या मार्फत मुख्य पिकावर पोचतात व रोग निर्माण करतात. याला ‘प्राथमिक लागण’ असे म्हणतात. साधारण ३ ते ४ दिवसांत रोग निर्माण होतो. रोगाची लागण झाल्यानंतर दिसणाऱ्या ठिपक्यांमध्ये बीजाणूधानी (Acervuli) तयार होते. या बीजाणूधानीमध्ये बीजाणू (Conidia) तयार होऊन त्यांच्यामार्फत पुढील रोगाचा प्रसार होतो. याला ‘दुय्यम लागण’ असे म्हणतात.

सूक्ष्मदर्शिकेखाली काय दिसते?

या रोगाची बीजाणू (Conidia) सूक्ष्मदर्शिकेखाली अत्यंत स्पष्टपणे पाहू शकतो. हे बीजाणू रंगहीन, एक पेशी, दंड गोलाकार असतात. या बिजाणूच्या आतमध्ये गोलाकार खड्यासारखा भाग प्रकर्षाने दिसून येतो. हे या बुरशीचे ‘अलैंगिक बीजाणू’ असतात. हे बीजाणू पुढील रोग निर्मितीस कारणीभूत असतात.

नियंत्रणाचे उपाय

  • बागेत हवा खेळती राहील असे नियोजन करावे.

  • कॅनोपी व्यवस्थित ठेवावी.

  • संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा अवलंब करावा. कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता भासणारी नाही याची काळजी घ्यावी.

  • रोगाचा प्रादुर्भाव दिसून येणारी फांदी, पाने त्वरित तोडून नष्ट करावीत.

  • बागेत तणांचा प्रादुर्भाव वाढू देऊ नये.

  • जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.

  • मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेत बॅसिलस स्पे. या जैविक बुरशीनाशकाचा फवारणीद्वारे वापर करावा.

  • रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, शिफारशीत बुरशीनाशकांचा वापर करावा.

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत.

फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे.

खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे.

बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे.

लेबल क्लेम वाचावेत.

पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत.

रसायनांचा गट तपासावा.

पीएचआय, एमआरएल तपासावेत.

पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा.

पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 20th Installment : पीएम किसानचा २० वा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात?

Sangli Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; सुरेश वरपूडकर भाजपवासी तर कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश गुरुवारी

Sangli Rain : वारणा धरण क्षेत्रात संततधार

Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

SCROLL FOR NEXT