Book Review Agrowon
ॲग्रो विशेष

Book Review : अन्न प्रक्रिया उद्योगाच्या मार्गावरील महत्त्वाचा मार्गदर्शक

Food Processing Industry : पुस्तक परिचय - अन्नप्रक्रिया उद्योग

सतीश कुलकर्णी

पुस्तकाचे नाव ः अन्नप्रक्रिया उद्योग
फळे, भाज्या प्रक्रिया ः तंत्रज्ञान आणि उद्योग
लेखिका ः डॉ. ललिता विजय बोरा
प्रकाशक ः सकाळ मीडिया प्रा. लि., पुणे
पाने ः १९४
मूल्य ः ७५० रुपये

भारतातील शेतकऱ्यांनी कृषी उत्पादनामध्ये आपला झेंडा रोवला आहे. एकेकाळी अन्नधान्यासाठी अन्य देशांवर अवलंबित्व त्याने संपवून टाकले आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांची संख्या आणि त्यांनी घेतलेल्या उत्पादनाचे कौतुक करतानाच एका बाबींमध्ये आपल्याला अजूनही खूप काम करायचे आहे, ते क्षेत्र म्हणजे काढणीपश्‍चात तंत्रज्ञान. पिकाच्या काढणीनंतर ग्राहकांच्या हातामध्ये पोहोचेपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान किती असेल, याचा थोडा अंदाज घ्यायचा म्हटले तर हे नुकसान वाचवू शकल्यास आणखी अर्धा भारत नक्कीच जगू शकेल इतके.

काढणीपश्‍चात तंत्रज्ञानामध्ये काढणी, साठवण, टिकवण, प्राथमिक व द्वितीय प्रक्रिया अशा अनेक घटकांचा समावेश असतो. आपापल्या परीने शेतकरी, ग्राहक आणि प्रक्रिया उद्योजक यामध्ये काम करत आहेत. यातील केवळ संधीचा विचार केला, तर अन्न आणि भुसार मालामध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक लागतो. त्यातही केवळ खाद्यपदार्थ बाजाराचा विचार केला असून, ३२ टक्के हिस्सा व्यापलेला आहे. जागतिकीकरणानंतर अन्नप्रक्रिया उद्योगाची वार्षिक वाढ ही १५ टक्क्यांनी होत असल्याचे सांगितले जाते. यामधील संधीचा विचार करता अनेक जण या क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी उत्सुकही आहेत. पण...

हा पण अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तिथेच सारे गाडे अडते. बहुतांश सारा कच्चा माल ग्रामीण पातळीवर उपलब्ध असूनही अनेक तरुण, तरुणी केवळ योग्य मार्गदर्शन आणि भांडवलाच्या अभावी पुढे जाऊ शकत नाहीत. अशा स्थितीमधून स्वतःचा मार्ग काढत ललिता बोरा याही पुढे आल्या. खरेतर कुटुंबाचा भार उचलायचा, या उद्देशाने १९९१ मध्ये त्यांनी वेफर्स आणि फरसाण निर्मितीतून आपल्या उद्योगाला सुरुवात केली. लग्नानंतर त्यात काही खंड पडला तरी अन्न प्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञानाविषयी वेगवेगळी प्रशिक्षणे घेत त्यांनी स्वतःला नेहमीच अपडेट ठेवले. आपल्यासोबतच अन्य महिला, तरुणांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने त्यांनी हार्ट अॅग्रो टेक इन्स्टिट्यूट ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. प्रक्रिया उद्योग प्रशिक्षणासाठी अत्यंत माफक शुल्क ठेवले होते. मात्र काही शुल्कही देऊ न शकणाऱ्या होतकरूंना मोफतही प्रशिक्षण त्या देत असत.

मात्र मोफत गोष्टींचे लोकांनाही मूल्य राहत नसल्याचे काही काळातच त्यांच्या लक्षात आले. पण त्यांनी संशोधन आणि नावीन्यपूर्ण उत्पादनाच्या निर्मितीच्या वेगवेगळ्या प्रकल्पावर आपले काम सुरूच ठेवले. द्राक्ष पोहे, तंबाखूमुक्तीसाठी समर्थ विडा, मधुमेही व्यक्तींसाठी मुखवास, संधिवाताच्या वेदना दूर करणारे वेदनाहारक अशी उत्पादने विकसित केली. त्यांच्या पेटंट मिळविण्याच्या प्रक्रियाही सुरू केली. एकूणच त्यांचा अन्नप्रक्रिया ते आयुर्वेद असा प्रवास पाहता त्यांना ‘विश्‍वकर्मा व्होकेशन युनिव्हर्सिटी’च्या वतीने ‘डॉक्टरेट इन फूट सायन्स’ ही पदवीही प्रदान केली. एक सामान्य गृहिणीला प्रक्रिया उद्योगाच्या ध्यासाने डॉक्टरेट प्राप्त झाली. १९९१ ते ९५ या काळात वेगवेगळे छोटेमोठे ५० पुरस्कार मिळाले आहेत.

प्रशिक्षणाद्वारे प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचण्यातील अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या एका विद्यार्थ्यांनी त्यांचे ज्ञान लोकांपर्यंत नेण्यासाठी पुस्तक स्वरूपात आणण्याची प्रेरणा दिली. तेच हे पुस्तक. या पुस्तकातून कृषी प्रक्रिया उद्योगाच्या पायाभूत तंत्रज्ञानापासून अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत सर्व घटकांचा अंतर्भाव केलेला आहे. अत्यंत संवेदनशील अशा फळे आणि भाज्यांच्या हाताळणी, साठवणीपासून प्रत्यक्ष एखादे उत्पादन तयार करण्याच्या प्रक्रियेविषयी त्यांनी इत्थंभूत माहिती दिली आहे. हेच या पुस्तकाचे अन्य प्रक्रियेच्या पुस्तकापेक्षा वेगळेपण आहे. अगदी प्रत्येक पदार्थ कसा तयार करायचा, याचे प्रमाण आणि प्रोटोकॉलही त्या न लपवता देतात. आवश्यक ते परवाने, वेगवेगळी प्रमाणपत्रे यांचीही माहिती दिलेली आहे. भांडवल उभारणीसाठी कर्ज प्रकरणे कशी करावीत अशा अत्यंत मूलभूत गोष्टींसह नावीन्यपूर्ण उत्पादनाचे पेटंट कसे घ्यावे, निर्यातीची प्रक्रिया हे सारे या पुस्तकातून येते. म्हणूनच
अन्नप्रक्रियेमध्ये पाऊल ठेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शन करणारे हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.


ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT