Kolhapur News : गेले दोन-अडीच महिने झालेल्या मुसळधार पावसाने गारठलेल्या उसाला आता तांबेरा आणि करपा रोगाने ग्रासले आहे. सलग दोन महिने झालेल्या पावसाने आता विश्रांती घेतली असतानाच ऐन वाढीच्या काळातच या रोगांच्या प्रादुर्भावामुळे आता शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेकडील भागात या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे जाणवत असून, या नव्या संकटाने शेतकरी चिंतातूर बनला आहे.
यंदा उसाची भरणी झाल्यानंतर ऐन वाढीच्या काळातच मे महिन्याच्या मध्यापासून पावसाने सुरुवात केली. तो थांबलाच नाही. याचा विपरीत परिणाम ऊस पिकाच्या वाढीवर झाला. सततच्या पावसामुळे सऱ्या पाण्याने तुंबून राहिल्या आणि अन्नप्रक्रिया बंद झाली. सलग दोन महिने सूर्यप्रकाश नसल्याने उसाने एकही पान सोडले नाही. या काळात किमान दोन फूट ऊस वाढला असता. मात्र, यावर पावसाचे सावट पडले.
तब्बल दोन महिन्यांच्या सततच्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. पावसाच्या विश्रांतीचा आणि सूर्यप्रकाशाचा काळ हा वाढीसाठी उपयुक्त असतो. मात्र, याच काळात आता करपा आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. हवेतील आर्द्रता आणि उष्णता यामुळे या रोगासाठी हे वातावरण पोषक असते. वाफ्यात चिखल, पाणी अशा परिस्थितीत उसावर औषध मारणेही शक्य होत नाही. त्यामुळे नैसर्गिकरीत्या या रोगाचा अटकाव हाच एकमेव पर्याय आता शेतकऱ्यांकडे राहिला आहे.
उसाच्या २६५ जातीवर मोठ्या प्रमाणात आणि वेगाने तांबेरा आणि लाल ठिपक्या हा बुरशीजन्य रोग वाढू लागला आहे. तर को ८६०३२ या जातीवर तांबेऱ्याबरोबरच करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. थेट फवारणी करणे शक्य नसले तरी आता सांघिक स्वरूपात ड्रोनद्वारे फवारणी करावी लागेल तरच रोगावर नियंत्रण व उत्पादनात वाढ होऊ शकते. राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेकडील उसाच्या पट्ट्यात झपाट्याने तांबेरा व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
पाने वाळलेली आहेत, तर तांबेऱ्यामुळे ऊस तपकिरी-पिवळा दिसू लागला आहे. ही अन्नप्रक्रियेत बाधा आणणारी क्रिया असल्याने याचा वाढीवर आणि उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच पावसामुळे त्याला जोरदार धक्का बसला असतानाच आता या रोगाला कसे सामोरे जायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे ‘आ’वासून उभा आहे.
राधानगरी तालुक्यातील अतिपावसाच्या व आर्द्रतेच्या परिसरात उसावर तांबेरा व करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यावर कीटकनाशक फवारणी करणे शेतकऱ्यांना शक्य नाही. ड्रोनद्वारे फवारणी केल्यास यावर उपाय ठरू शकतो.- एस. बी. चरापले, ऊस विकास अधिकारी भोगावती कारखाना
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.