Ramoji Rao Agrowon
ॲग्रो विशेष

Ramoji Rao : शेतकऱ्यांविषयी तळमळ असलेले चित्रपट निर्माते

A Filmmaker Story : प्रख्यात चित्रपट निर्माते रामोजी राव यांचे नुकतेच निधन झाले आहे. रामोजी राव यांचे उद्योगविश्‍व वेगळे असले तरी शेतकऱ्यांप्रती त्यांना प्रचंड तळमळ होती. त्यांची ही तळमळ त्यांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या अनेक उद्योग-उपक्रमांतून दिसून येते.

डॉ. नागेश टेकाळे

Journey of Ramoji Rao : चित्रपटनगरी तसेच माहिती-मनोरंजन विश्‍वात आगळावेगळा ठसा उमटविणारे रामोजी राव यांचे नुकतेच वयाच्या ८७ व्या वर्षी हैदराबादमध्ये निधन झाले आणि मला २० वर्षांपूर्वीच्या त्यांच्या सहवासाची एक आठवण झाली. त्या वेळी मी उद्यानशास्त्र आणि लॅण्डस्केपच्या पदवीत्तोर विद्यार्थ्यांना घेऊन हैदराबादला रामोजी फिल्म सिटीमधील जगविख्यात लॅण्डस्केप डिझाइन आणि थीम पार्कचा अभ्यास करण्यासाठी गेलो होतो.

या अभ्यास सहलीचा अजून एक मुख्य उद्देश होता तो म्हणजे या मानव निर्मित निसर्गाचे निर्माते रामोजी राव यांना प्रत्यक्ष भेटणे! विद्यार्थी मुंबईहून आपणास भेटावयास येत आहेत हे समजल्यामुळे ते मुद्दाम फिल्म सिटीमध्ये आले. स्वर्गीय आनंदाचा भास होणाऱ्‍या त्यांच्या या चित्रनगरीमधील लॅण्डस्केप पाहून मुले हरखून गेली होती, कितीतरी वेळ ती निःशब्द होती. त्यांनी मुलांना पहिला प्रश्‍न केला, ‘‘तुमच्यापैकी किती जण शेतकऱ्यांची मुले आहात?’’

सर्व जण एकमेकांकडे पाहत होते. कारण त्यातील एकही शेतकऱ्याचा मुलगा नव्हता. रामोजी रावांना याचे आश्‍चर्य वाटले नाही. याउलट यांपैकी कोणीही नसणार याची त्यांना खात्रीच होती. प्रश्‍न-उत्तरात त्यांनी मुलांना आवर्जून सांगितले, की जरी तुम्ही शहरामधील नोकरदार व्यावसायिकांची मुले असलात, तरी शेतकऱ्यांना कधीही विसरू नका. तुमच्या ताटामधील अन्नाचा तो खरा निर्माता आहे.

मी पैसे देतो म्हणून मला ते मिळते, असे कधीही समजू नका, त्यामागची शेतकऱ्‍यांची मेहनत, कष्ट पाहा आणि त्यांचा नेहमीच सन्मान करा.’’ या चर्चासत्रात आम्हास ताजी बाजरीची भाकरी, लोणी आणि लसूण चटणीचा नाश्‍ता मिळाला. त्याच वेळी आमच्या बरोबरच न्याहारी करणाऱ्या रामोजी रावांच्या लहानशा प्लेटमध्ये पिवळीची भाकरी आणि जवसाची चटणी होती. कोट्यधीश माणूस एवढे साधे शेतकऱ्‍याचे जीवन जगतो हे माझ्यासाठी धक्कादायक होते.

सर्वाधिक खपाचे तेलुगू दैनिक ‘इनाडू’चे संस्थापक असलेल्या रामोजी राव यांनी माध्यम क्षेत्राबरोबरच, बिगर बॅकिंग वित्तीय संस्था, अन्न आणि किरकोळ विक्री साखळी यांसारख्या विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविला. ईटीव्ही चॅनेल्स, रामोजी फिल्म सिटी, डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स, उषाकिरण मूव्हीज, प्रिया फूड्‍स यासारख्या स्व-मालकीच्या उद्योगातून हजारो युवक-युवतींना रोजगार मिळवून दिला.

ते स्वतः मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून पुढे आले होते आणि आश्‍चर्य म्हणजे याचा त्यांनी कधीही विसर पडू दिला नव्हता. ते म्हणत, ‘‘मी सर्वप्रथम एक शेतकरी आहे आणि माझे ध्येय एकच आहे ते म्हणजे एकही अल्पभूधारक शेतकरी गरीब राहता कामा नये.’’ आंध्र प्रदेशात गरीब अल्प भूधारक शेतकऱ्यांना खरीप, रब्बीमध्ये सावकार कर्ज देऊन वसुलीच्या निमित्ताने खळ्यावर जाऊन त्यांच्या धान्याची पोती उचलून आणत. शेतकऱ्‍यांच्या या वेदना पाहून कमी व्याज दरात कृषीसाठी पैसा उपलब्ध व्हावा म्हणून त्यांनी १९६२ मध्ये ‘मार्गदर्शी चिट फंड’ सुरू केला. आज या चिट फंडाचे भांडवल तब्बल दहा हजार कोटी रुपये आहे.

एक आठवण सांगितली जाते. रमादेवी यांच्याबरोबर विवाह झाल्यावर प्रथमच ते सासुरवाडीस गेले, तेव्हा जेवताना त्यांना त्यांच्या ताटामधील लोणच्याची फोड खूप आवडली. नंतर त्यांना कळले ते लोणचे त्यांच्या पत्नीने तयार केले आहे. रामोजी रावांनी पत्नीच्या या पाककलेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘प्रिया लोणचे’ हा ब्रॅण्ड तयार करून देशविदेशात पाठविला. ‘प्रिया पिकल्स’ या उद्योगातून त्यांनी शेतकऱ्यांना गावठी रायवळ आंबा संवर्धन करण्याचे फक्त आवाहन न करता ते खरेदी सुद्धा केले. आज आंध्रामध्ये रायवळ आंबा सर्वांत जास्त आहे तो याचमुळे!

फक्त शेतकऱ्यांसाठी म्हणून त्यांनी ‘अन्नदाता’ हे मासिक १९६९ मध्ये सुरू केले. शेतकऱ्‍यांना शेतकरी, कष्टकरी म्हणण्यापेक्षा त्यांना ‘अन्नदाता’ म्हणावे हे ते नेहमी त्यांच्या वृत्तपत्रातून शहरामधील लोकांना सांगत. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होण्यापेक्षा एकत्रित येऊन गट शेती करा, करार शेतीला महत्त्व द्या, हे त्यांनी हजारो शेतकऱ्‍यांना फक्त पटवून दिले नाही तर स्वतःसाठी प्रत्यक्ष कृतीत आणले.

त्यांची ‘प्रिया फूड’ ही कंपनी शेतकऱ्यांचे उत्पादन त्यांच्या शेतात जाऊन खरेदी करत असे. त्यांच्या डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्ससाठी लागणारा भाजीपाला, दूध ते स्वतः निर्माण केलेल्या करार शेतीमधून मिळवत असत. पूर्वी म्हणजे ७० च्या दशकापर्यंत मराठवाडा आणि त्यांच्या सीमेला लागून असलेल्या आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पिवळ्या ज्वारीचे उत्पादन होत असे. कालांतराने मराठवाड्यात ते लयाला गेले, मात्र आंध्रमध्ये ते कायम राहिले ते रामोजी राव यांच्यामुळेच! त्यांनी अनेक महिला बचत गटांना या पिवळीच्या भाकऱ्यांचे उत्पादन करून त्यास परदेशी निर्यात करण्याची संधी दिली.

रामोजी रावांच्या ‘इनाडू’ नावापासूनच ‘ईटीव्ही’ मराठी चॅनल सुरू झाले, जे दोन दशकांपूर्वी घरोघरी पाहिले जात असे. या ईटीव्ही वर प्रति दिवशी ‘अन्नदाता’ असा एक सुरेख कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी असे. ज्यांचा शेतीशी काहीही संबंध नाही, असेही अनेक मराठी दर्शक हा कार्यक्रम आवर्जून पाहत. त्यामध्ये देशविदेशांमधील शेतकऱ्यांच्या यशोगाथा दाखवल्या जात असत. आज तेलुगूचा अपवाद वगळता इतर भारतीय भाषांमधील ईटीव्ही चॅनेल्स लुप्त झाले, ही खंत रामोजी राव विसरले असतील का?

रामोजी राव यांनी अल्पभूधारक शेतकऱ्‍यांना विषमुक्त शेतीकडे वळवून विविध प्रकारच्या भाजीपाला, फळे, कंदमुळे उत्पादित करण्यासाठी प्रोत्साहित केले. ते म्हणत, ‘‘ताणतणावावर एकच प्रभावी औषध आहे ते म्हणजे सदाहरित निसर्गाचा सहवास. ते आग्रहाने सांगत वृक्षावर कधीही कुऱ्हाड चालवू नका, निसर्गावर, पानाफुलांवर प्रेम करा, जेव्हा तुम्ही एकाकी, दुःखी असाल तेव्हा हक्काने निसर्ग सहवासात या, तुम्हाला भास होईल, तो तुमच्याशी बोलत आहे, तुमच्या दुःखावर फुंकर घालत आहे.’’

रामोजी रावांनी त्यांच्या कल्पनेमधील निसर्गसौंदर्य रामोजी फिल्म सिटीच्या १६०० एकर जागेवर हजारो सदाहरित वृक्ष वेलीच्या साहाय्याने प्रत्यक्ष कृतीत आणले म्हणूनच देश-विदेशामधील लाखो पर्यटक प्रति‍वर्षी या ठिकाणी येऊन उद्यान आणि लॅण्डस्केप निर्मितीचा आनंद लुटत असतात. रामोजी रावांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वासाठी २०१६ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. चांगल्यास चांगले आणि वाईटास वाईट म्हणणारे फार कमी लोक जगात असतात कारण यास वेगळे धाडस लागते. रामोजी रावांनी त्यांच्या स्वभावाचा हा पैलू शेवटपर्यंत जपून ठेवला. त्यांच्या जाण्याने हळहळ वाटते ते याचमुळे!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT