Parbhani News : मागील आठवड्यात पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे परभणी जिल्ह्यातील २१ पैकी १७ लघु सिंचन तलावात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. परभणी जिल्ह्यातील २१ व जालना जिल्ह्यातील १ मिळून एकूण २२ लघु सिंचन तलावात सरासरी ४२.२०५ दलघमीनुसार ८४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
परभणी जिल्ह्यातील करपरा व मासोळी या दोन मध्यम प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. येत्या रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील सिंचन तसेच अनेक गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
७ लघु सिंचन तलावात १०० टक्के पाणीसाठा...
जायकवाडी पाटबंधारे विभाग अंतर्गंत परभणी जिल्ह्यातील २१ व जालना जिल्ह्यातील लघु सिंचन प्रकल्पांची पूर्ण जल क्षमता सरासरी ४५.८२७ दलघमी तर उपयुक्त जलसाठा क्षमता ४२.२०५ दलघमी आहे.गुरुवारी (ता. ५) घेतलेल्या नोंदीनुसार २२ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ३५.३५२ दलघमीनुसार ८४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
परभणी जिल्ह्यातील १७ लघु सिंचन तलाव १०० टक्के भरले आहेत. त्यात देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा, चिंचोली, आडगाव, केहाळ, भोसी, कवड, मांडवी, दहेगाव (सर्व ता. जिंतूर), झरी (ता. पाथरी), राणीसावरगाव, टाकळगाव, कोद्री (सर्व ता. गंगाखेड), तांदूळवाडी (ता. पालम) या तलावांचा तसेच पाडाळी (जि. जालना) येथील तलावाचा समावेश आहे.
पेडगाव (ता. परभणी) तलावात ४५ टक्के, आंबेगाव (ता. मानवत) तलावात ३० टक्के, नखातवाडी (ता. सोनपेठ) तलावात ३९ टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) तलावात ९५ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी (२०२३) ५ सप्टेंबर रोजी लघु तलावांमध्ये सरासरी ४.०२८ दलघमी म्हणजेच १० उपलब्ध पाणीसाठा होता.
मध्यम प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा...
करपरा मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता २८.८२० दलमघी असून त्यापैकी उपयुक्त जलसाठा क्षमता २४.९०० दलघमी आहे. मासोळी मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता ३४.०८५ दलघमी असून त्यापैकी उपयुक्त जलसाठा २७.१४१ दलघमी आहे.
जायकवाडी पाटबंधारे विभागातर्फे गुरुवारी (ता. ५) घेतलेल्या नोंदीनुसार करपरा प्रकल्पामध्ये २४.९०० दलघमी म्हणजेच १०० टक्के तर मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये २७.१४१ दलघमी म्हणजेच १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दोन्ही मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ५२.०४१ १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी (२०२३) ५ सप्टेंबर रोजी करपरा मध्यम प्रकल्पामध्ये ४.९०५ दलघमीनुसार २० टक्के तर मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये ४.३८४ दलघमीनुसार १६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.