Jalgaon News : राज्य शासनाकडून निधी न प्राप्त झाल्याने जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२३-२४ च्या हंगामात सहभागी झालेले ५२ हजार केळी उत्पादक केळी विमा परताव्यांपासून वंचित आहेत.
फळ पीकविमा योजनेत शेतकरी ऑक्टोबर २०२३ मध्ये सहभागी झाले होते. केळी पिकास या योजनेतून नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी विमा संरक्षण होते. हा विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत म्हणजेच १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत पात्र केळी विमाधारकांना परतावे मिळणे अपेक्षित होते. परंतु विमा परतावे मिळालेले नाहीत. कमी व अधिक तापमान आणि वादळ किंवा वेगाचा वारा आदी नुकसानीसंबंधी या योजनेतून केळी पिकास विमा संरक्षण आहे.
२०२२-२३ मध्ये या योजनेत मोठा घोळ झाला. यामुळे अजूनही विमा परतावे न मिळणे, शेतकऱ्यांच्या तक्रारी बेदखल करणे, असा प्रकार सुरू आहे. मागील वेळेसही विमा परतावे विलंबाने मिळाले होते. यंदाही तशीच स्थिती तयार झाली आहे. काही योजनांची मागणी नसताना त्या योजना आणल्या व ज्या योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत, त्याबाबत शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या योजनेत सहभागी केळी उत्पादकांनी केळी पिकासाठी विमा संरक्षणासाठी विमा हप्त्यापोटी १० हजार रुपये भरले आहेत. केंद्र व राज्य शासन या योजनेसाठी निधी देते. यात केंद्र शासनाचा निधी प्राप्त झाला आहे. परंतु राज्य शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांना विमा परतावे मिळालेले नाहीत.
शासनाकडून निधी प्राप्त न झाल्यास विमा कंपनी परतावे देण्यासाठी बाध्य नाही. यातच शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर परतावे देण्यासाठी विमा कंपनीला २१ दिवसांचा अवधी दिला जातो. यामुळे पुढे निधी आल्यानंतर आणखी २१ दिवसांची प्रतीक्षा पात्र केळी विमाधारकांना परताव्यांसाठी करावी लागेल, अशी स्थिती आहे. यामुळे शासनाने तातडीने निधी देऊन विमा परतावे शेतकऱ्यांना या आठवड्यात द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.