Maharashtra Assembly Elections 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Assembly Constituency : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघांसाठी ३८५ अर्ज दाखल

Maharashtra Assembly Election : महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये खरी चुरस असली, तरी काही मतदार संघात अपक्षांचे मोठे आव्हान असणार आहे.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. २९) जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदार संघांसाठी तब्बल ३८५ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले.

शेवटचा दिवस आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काही मतदार संघात पक्षाच्या एबी फॉर्मवरून घोळ सुरूच राहिले. काही ठिकाणी पक्षापक्षांत संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, अशी शक्यता आहे.

जिल्ह्यात ११ मतदार संघ आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये खरी चुरस असली, तरी काही मतदार संघात अपक्षांचे मोठे आव्हान असणार आहे. त्यात करमाळ्यात विद्यमान आमदार संजय शिंदे हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. त्यांचे शिवसेनेचे दिग्विजय बागल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण पाटील यांना आव्हान असणार आहे.

तर दक्षिण सोलापूरमधून माजी आमदार दिलीप माने आणि सिद्धेश्‍वर साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. माने यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करूनही एबी फॉर्म न दिल्याने ते नाराज झाले आहेत. काडादींनाही असेच आश्‍वासन दिले. आता हे दोन्ही अपक्ष काय करणार, हे पहावे लागणार आहे. पण त्यांचे अर्ज राहिल्यास रंगत वाढणार आहे.

सांगोल्यात महाविकास आघाडीकडून शेकापला जागा सोडत, या ठिकाणी डॉ. बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. पण इथे शिवसेना ठाकरे यांनी राष्ट्रवादीतून आलेले दीपक साळुंखे यांना उमेदवारी देत आघाडीत बिघाडी केली आहे. त्याशिवाय या ठिकाणी महायुतीकडून विद्यमान आमदार शहाजी पाटील हे रिंगणात आहेत. या तिघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

माढ्यात विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांनी त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदेंना अपक्ष म्हणून उतरवले आहे. इथे काँग्रेसच्या अॅड. मीनल साठे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अभिजित पाटील हे उतरले आहेत.

अक्कलकोटला विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात लढत होणार आहे. त्याशिवाय पंढरपुरातही काँग्रेसला जागा सुटली असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अनिल सावंत यांना उमेदवारी देत आव्हान निर्माण केले आहे.

अपक्ष अर्जांची संख्या अधिक

उमेदवारी दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी यादीचा घोळ कायम होता. त्यामुळे अनेक ठिकाणी अपक्षांच्या अर्जाची संख्या अधिक झाली आहे. येत्या ४ नोव्हेंबरला उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Production : भात, भुईमुगाच्या उत्पादनात आजरा तालुक्यात घट

Sugarcane workers : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ऊसतोड कामगारांवर काळाची झडप; सीना नदीत ४ ऊसतोड कामगार बुडाले

Sugar and Ethanol : साखरेची किमान विक्री किंमत आणि इथेनॉलची खरेदी किंमत वाढवू; केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशीचे विस्माला आश्वासन

Crop Damage Compensation : सांगलीत अवकाळी, अतिवृष्टिबाधित पिकांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Assembly Election : महायुती, ‘महाविकास’मध्ये बंडखोरीच्या नाट्यमय घडामोडी

SCROLL FOR NEXT