Yavatmal News: गरिबांना मोफत सेवा देण्याच्या नावाखाली काही टोलेजंग रुग्णालयांनी ‘धर्मादाय रुग्णालया’चा दर्जा मिळविला. मात्र तेथे पैसे घेतल्याशिवाय सेवाच मिळत नसल्याचा प्रकार पुण्यातील ‘मंगेशकर रुग्णालया’मुळे चव्हाट्यावर आला. त्यामुळे आता राज्यातील सर्वच धर्मादाय रुग्णालयांच्या कारभारावर थेट नजर ठेवण्यासाठी १८६ आरोग्य सेवकांची नेमणूक केली जाणार आहे.
निर्धन आणि आर्थिक दुर्बल रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, या हेतूने राज्यात धर्मादाय रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे. असे मोफत उपचार मिळवून देण्यासाठी संबंधित रुग्णालयांमध्ये ‘वैद्यकीय समाजसेवक’ नेमण्याची तरतूद आहे. परंतु हे वैद्यकीय समाजसेवक संबंधित रुग्णालयांनीच नेमलेले आहेत. त्यामुळे ते गरीब रुग्णांना योजनेची परिपूर्ण माहिती देण्यापेक्षा संबंधित रुग्णालयाचे हित जपण्याकडेच अधिक लक्ष पुरवितात, असा निष्कर्ष राज्यस्तरीय धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने आपल्या अहवालात नोंदविला आहे.
रुग्णांच्या नातेवाइकांना धर्मादाय योजनेची उचित माहिती न देणे, अनावश्यक कागदपत्रांची मागणी करणे, योजनेअंतर्गत उपचार करण्यास टाळाटाळ करणे आदी प्रकार या वैद्यकीय समाजसेवकांकडून होत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले. त्यातच पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात अनामत रक्कम जमा न करू शकलेल्या एका गर्भवतीचा मृत्यू झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. त्यामुळे आता धर्मादाय रुग्णालयांनी नेमलेल्या ‘वैद्यकीय समाजसेवकां‘ऐवजी शासनाचेच प्रतिनिधी असलेले १८६ ‘धर्मादाय आरोग्य सेवक’ नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे आरोग्य सेवक शासनाने नेमलेले असल्यामुळे ते रुग्णालयाचे हितसंबंध जपण्यापेक्षा रुग्णाला योग्य माहिती व मदत देण्यावर भर देतील, असा शासनाचा कयास आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक धर्मादाय रुग्णालयात एक आरोग्य सेवक असेल. तर छोट्या शहरांमध्ये दोन-तीन रुग्णालयांसाठी एका सेवकाची नेमणूक होणार आहे.
..असे होणार फायदे
रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना धर्मादाय योजनेची माहिती मिळेल
धर्मादाय रुग्णालयांचा कारभार लोकाभिमुख होईल
केवळ आवश्यक कागदपत्रांच्या आधारे गरीब रुग्णांवर उपचार सुरू केले जातील
रुग्णालयातील रिक्त खाटांची माहिती ऑनलाइन केली जातेय की नाही, यावर आरोग्य सेवकांची नजर असेल.
तपासणी अहवाल शासनास सादर
विधी व न्याय विभागाच्या आदेशानुसार धर्मादाय रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी एक पथक गठित करण्यात आले होते. आठ जणांच्या या पथकाने पुण्यातील जहांगीर रुग्णालयाला भेट दिली असता तेथील जनसंपर्क अधिकारी फडके हे वैद्यकीय समाजसेवकाच्या कामात हस्तक्षेप करताना आढळले. त्यामुळे गरीब रुग्णांना लाभ मिळत नव्हता. त्यामुळे फडके यांना बडतर्फ करण्यात आले. तसेच आदित्य बिर्ला रुग्णालयाने तपासणीसच सहकार्य न केल्याने पथकाने या रुग्णालयावर गुन्हा दाखल केला. पुण्यातीलच संचेती हॉस्पिटलने स्वाती माळवदकर या गरीब रुग्णाकडून सहा लाख १७ हजारांची रक्कम घेतल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर ही रक्कम रुग्णास परत करण्यात आली. हा सर्व तपासणी अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.
धर्मादाय आरोग्य सेवकांच्या पदभरतीला शासनाने मान्यता दिली आहे. एक ते दीड महिन्यांत ही पदभरती होईल. हे आरोग्य सेवक शासनाचे प्रतिनिधी असल्याने ते रुग्णांच्या हिताचा विचार करतील.रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय, मुंबई
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.