Madhavrao More
Madhavrao More Agrowon
ताज्या बातम्या

Madhavrao More : प्रयोगशील शेतकरी, लढवय्या शेतकरी नेता शांत झाला

Team Agrowon

इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, प्रचंड अभ्यासू व विद्वानातील विद्वान व्यक्तिमत्त्व म्हणजे माधवराव (Madhavrao More) नाना होते. पिंपळगाव बसवंतसारख्या गावात राहूनही शेतीचा मूळ पिंड जपत त्यांनी शेती व शेती प्रश्नांचा दांडगा अभ्यास केला. प्रयोगशील शेतकरी म्हणून १९७० पासून माझा व त्यांचा स्नेह कायम होता. त्या वेळी त्यांनी कंबोडिया वाणाची कापूस लागवड केली होती.

त्या वेळी बागलाणचे नेते नारायण मन्साराम सोनवणे यांनी कापूस पीक पाहण्यासाठी शेतकऱ्यांना गाड्या करून घेऊन जाण्यासाठी मला सांगितले होते. कापूस व फ्लॉवर या भाजीपाला पिकांची त्या वेळी जिल्ह्यात चर्चा होती. हायब्रीड टोमॅटोच्या लागवड करणारे ते पहिले शेतकरी होते. त्यांच्या उत्पादनाची मुंबईत व्यापाऱ्यांमध्ये चर्चा असे.

शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग व त्यातून उद्योगनिर्मिती हा त्यांच्या कामाचा मुख्य गाभा होता. द्राक्षापासून वाइननिर्मिती, बेदाणा प्रक्रिया यासाठी ते आग्रही होते. शेतकऱ्यांच्या शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योगाची त्यांनी पायाभरणी केली. पिंपळगाव बसवंत येथील औद्योगिक वसाहत या प्रकल्पाची स्थापना करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले.

पारंपरिकऐवजी वेगळे विषय हाताळणे त्यांना आवडत असे. त्यामुळेच राज्यातील पहिला शॅम्पेन (पिंपेन) निर्मिती प्रकल्प त्यांनी उभारला होता. शेतकऱ्यांची पोरं उद्योगाला लागली पाहिजे यासाठी ते नेहमी प्रयोग करायचे. द्राक्ष पिकाला चालना देण्यासाठी द्राक्ष उत्पादक समूह त्या वेळी तयार केले होते. अनेकांना प्रक्रिया व निर्यातकामी त्यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

शेतीच चित्र बदललं पाहिजे यासाठी ते आग्रही होते. सरकारची शेतकऱ्यांबद्दलची धोरणे आणि त्यातून शेतकऱ्यांची झालेली दैन्यावस्था पाहून ते प्रचंड अस्वस्थ व्हायचे. शेतकरीविरोधी व्यवस्था मोडून काढण्यासाठी शेतकरी संघटनेचे उर्ध्वयू शरद जोशी यांच्या खांद्याला खांदा लान ८० च्या दशकात शेतकरी चळवळीत आले.

त्या वेळी आम्ही सोबत काम करायला लागलो. रोखठोक वक्तृत्व शैलीतून ते प्रश्‍नांची मांडणी करू लागले. अन् म्हणता म्हणता ते राज्यभर लोकप्रिय झाले होते. शेतकऱ्यांच्या चेहऱ्याकडे पाहून बोलायचो. कधी शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडताना चुकून शिवी निघाली तरी टाळ्या पडायच्या, लोक त्यांना स्वीकारायचे, असे नाना होते. शेतकऱ्यांमध्ये ऊर्जा व मानसिक बळ देण्याचे काम त्यांनी केले.

पिंपळगाव बसवंत येथे २८ सप्टेंबर १९८० रोजी व्यापक शेतकरी मेळावा झाला. राज्यातून हजारो लोक येथे आले. उसाला ३०० रुपये व कांद्याला १०० रुपये दर मिळण्यासाठी तत्कालीन राज्य साखर संघाचे अध्यक्ष माधवराव बोरस्ते यांना सोबत घेऊन आणून लढ्याला बळकटी आणि धार आणली. कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करत राज्यभर दौरे झाले.

१० नोव्हेंबर १९८० रोजी चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले. हे आंदोलन काही दिवस चिघळले. दिल्ली दरबारी ही धग पोहोचली. नाशिक ते धुळे रस्ता पूर्ण बंद झाल्याने वाहतूक खोळंबली होती. ‘बीबीसी लंडन’ने या घटनेची दखल घेतली होती. त्या वेळी तत्कालीन खासदार झेड. एम. कहांडोळे यांचा गाड्यांचा ताफा अडवला.

या वेळी त्यांच्याशी बाचाबाची झाली; मात्र ते मागे हटले नाहीत. त्यांच्यावर मोठा लाठीमार झाला. त्या वेळी संपूर्ण अंगावर वळ पडले; गंभीर जखमी होऊनही मागे हटले नाहीत. कुणी शेतकऱ्यांच्या रास्त भूमिकेला डावलले किंवा अवहेलना केल्यास ते चिडून जायचे. कुणाशी तडजोड करत नसत.

शेतकऱ्यांबद्दल तळमळ नेमकी कशी असावी हा आदर्श त्यांच्याकडून शिकण्यासारखा होता. प्रसंगी ते कुणालाही जुमानत नसत. कडक तितकेच भावनिक व प्रसंगी मावळ होते. ज्या वेळी कुणाला दुखावले गेल्यास त्यांच्या डोळ्यात अश्रू यायचे. कार्यकर्त्यांना जपण्याची त्यांची क्षमता कमालीची होती. त्यामुळे तरुण पिढी त्यांची चाहती होती.

औरंगाबाद येथील सुभेदार अतिथिगृहावर त्या वेळी मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांनी बैठक बोलावली होती. त्या वेळी शरद जोशी, माधवराव मोरे, प्रल्हाद पाटील कराड, भास्करराव बोरावके व मी बैठकीला उपस्थित होतो. उसाला ३०० रुपये प्रतिटन व १०० रुपये कांद्याला हमीभाव अशी मागणी केली. त्यात ते ठाम राहून यशस्वी झाले.

‘शेतकरी बाप जेव्हा मरणाच्या दारी जातो. तेव्हा माझ्या मुलासाठी कर्ज फेडून जात आहे. असा एकाने जरी हात केला तरी हे सर्व सोडून मी जाईल,’ असे ते शेतकऱ्यांना आवाहन करत. म्हणून त्या वेळी कर्जमुक्तीचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता.

अभ्यासू मुद्देसूद मांडणी, वैचारिक बैठक व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आक्रमकपणा हा त्यांच्या रक्तात भिनलेला होता. ते सभेला उभे राहिले, की उपस्थित शेतकऱ्यांच्या अंगात स्फुरण चढायचे. मी काही दिवसांपूर्वीच त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.

त्या वेळी या भेटीत माझ्याकडे बघून बापू बापू असा उच्चार करत होते. शेतकरी संघटनेच्या लाल बिल्ल्याकडे पाहून खुणावत होते. अखेरच्या श्‍वासापर्यंत शेतकरी चळवळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर त्यांची कायम तळमळ दिसून आली. असा नेता होणे नाहीच !

झाले बहु, होईल बहु, पण या सम हाच !!

- रामचंद्र बापू पाटील, ज्येष्ठ नेते व माजी प्रांताध्यक्ष, शेतकरी संघटना

(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात काकासाहेब वाघ, माधवराव बोरस्ते अशी रत्न होऊन गेली. त्यापैकी एक म्हणजे माधवराव खंडेराव मोरे होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर लढण्याची भूमिका घेऊन ज्यांनी शेवटच्या श्‍वासापर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे योगदान दिले ते सदैव स्मरणीय राहील. प्रयोगशील शेतकरी आणि लढवय्या शेतकरी नेता शांत झाला, तरी त्यांचा विचार शेतकरी चळवळीत स्फुल्लिंग चेतवत राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT