Department Of Agriculture
Department Of Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department : साखर आयुक्तालयाला मिळाला औट घटकेचा सहसंचालक

Team Agrowon

Pune News : साखर आयुक्तालयातील (Sugar Commissionerate) सहसंचालकपदी पांडुरंग सिगेदार (Pandurang Sigedar) यांची नियुक्ती औट घटकेची ठरली. निवृत्तीच्या दिवशीच सिगेदार यांची नियुक्ती केल्यामुळे सहसंचालकपद पुन्हा रिक्त झाले.

साखर आयुक्तालयाचे बहुतेक काम कृषी विभागाशी संबंधित असले तरी आयुक्तालयातील सर्व पदे सहकार विभागातून भरली जातात.

केवळ साखर विकास कक्षाचे सहसंचालकपद कृषी विभागाचा घेतला जातो. साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाचे नियोजन, ऊस लागवड, तोडणी, गाळप परवाने अशी कामे सहसंचालकांच्या अखत्यारित चालतात.

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सहसंचालकपद रिक्त आहे. या पदावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) दर्जाचा अधिकारी कृषी विभागाकडून पाठवला जातो.

परंतु, एसएओंच्या पदोन्नतीची फाइल मुख्यमंत्र्यांकडे अडकून पडल्यामुळे सहसंचालकपदासाठी उमेदवार सापडलेला नाही.

कृषी खात्यातील ८१ उपसंचालकांना एसएओपदावर पदोन्नती देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने मान्य केला आहे.

मात्र, या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे पदोन्नतीच्या यादीतील चार उपसंचालकांना पदोन्नती मिळाली; पण ती निवृत्तीच्या दिवशी दिलेली आहे.

याच मालिकेत उपसंचालक पांडुरंग शिगेदार यांनाही निवृत्तीच्या दिवशी एसएओ करण्यात आले. विशेष म्हणजे ३१ मार्च रोजी त्यांच्या पदोन्नतीचा आदेश येताच त्याचदिवशी त्यांनी

विस्तार व प्रशिक्षण विभागातील नगदी पिके योजनेचा पदभार सोडला. त्याच दिवशी त्यांनी साखर आयुक्तालयात नवा पदभार घेतला व सायंकाळी ते निवृत्तदेखील झाले.

साखर आयुक्तालयातील सहसंचालकपद आधी एसएओ पांडुरंग शेळके यांच्याकडे होते. त्यांना मृद संधारण विभागात सहसंचालकपदी पदोन्नती मिळाल्यानंतर पद रिक्त झाले.

मात्र, हा विभाग वाऱ्यावर सोडल्यासारखा होऊ नये यासाठी शेळके यांच्याकडे सहसंचालकपदाचे पालकत्व दिले आहे. सिगेदार यांच्याकडे एक दिवसाचा कार्यभार देत आता शेळके पुन्हा या विभागाचे तात्पुरते सहसंचालक बनले आहेत.

उपसंचालकांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक अपेक्षेमुळे मंत्रालयात आमच्या पदोन्नतीची फाइल दाबून ठेवण्यात आली आहे.

यामुळे बढतीच्या प्रतीक्षेत असलेले काही उपसंचालक हक्काची पदोन्नती न मिळताच निवृत्त होतील, असे सांगत अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले.

त्यामुळे निवृत्तीच्या दिवशी पदोन्नती देण्याचा फंडा मंत्रालयाने काढला. कृषी विभागातील बदल्या, पदोन्नत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात देवघेव करण्याची परंपरा आहे. त्याचा फटका अधिकाऱ्यांना बसतो आहे.

लवकरच होणार पदोन्नत्या

‘‘कृषी उपसंचालकांच्या पदोन्नतीच्या फाइलवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली आहे. त्यामुळे लवकरच पदोन्नतीचे आदेश जारी होतील. यामुळे किमान ६९ जणांना पदोन्नती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे कृषी विभागाच्या कामकाजाला गती मिळेल,’’ असा दावा कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Development : पंचायत राज रचनेतून ग्राम विकासाला चालना

Mango Festival Kolhapur : कोल्हापुरात आंबा महोत्सव, कृषी पणन मंडळाकडून आयोजन

Grape Farming : शेवडीची दुष्काळावर मात द्राक्षात तयार केली ओळख

Smart Meters : ‘स्मार्ट मीटर्स’चा बोजा ग्राहकांच्या खांद्यावरच

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्याला वळवाचा तडाखा, पूर्व, दक्षिण भागात जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT