कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यात (Shree Dutt Co-operative Sugar Mill) ऊस उत्पादक (Sugar Cane Producers) शेतकऱ्यांच्या गळीतासाठी येणाऱ्या उसाकरिता कारखान्याच्या परंपरेनुसार एकरकमी एफआरपी (FRP) देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील (Ganpatrao Patil) यांनी दिली.
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व श्रीदत्त साखर कारखाना चॅरिटेबल टूस्टच्या १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
वार्षिक सभेत कारखान्याचा शेअर १० हजार रुपयांवरून पंधरा हजार रुपये करण्याच्या ठरावास सभासदांनी मंजुरी दिली. पाटील म्हणाले, की सभासदांच्या विश्वासास पात्र राहून आणि कामगारांच्या पाठबळावर दत्त साखर कारखान्याने चौफेर प्रगती साधली आहे.
यावर्षी कारखान्याकडे पुरेसा ऊस उपलब्ध होणार असून यंदाचा गळीत हंगामात जादा क्षमतेने गाळप करण्याचा मानस आहे. ते म्हणाले, की केंद्र शासनाने हंगामापूर्वी साखर निर्यातीबाबतचे धोरण जाहीर करणे आवश्यक आहे,
त्याशिवाय साखरेला केंद्र शासनाने प्रति क्विंटल तीन हजार सहाशे रुपये आधारभूत किंमत ठरवावी. कारखाना कार्यक्षेत्रातील १९ गावांमधील क्षारमुक्त प्रकल्प राबविण्यात आला असून यामध्ये तीन हजार एकर जमीन टिकाऊ झाली आहे.
क्षारमुक्त प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांना एकरी २४ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. ऊर्जांकूर प्रकल्प हा लवकरच कर्जमुक्त होणार असून तो कारखान्याच्या मालकीचा झाल्यानंतर ऊस उत्पादक सभासदांना त्याचा लाभ मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. त्याचबरोबर या सभेत सभासदांनी विचारलेल्या लेखी स्वरूपातील प्रश्नांना व्यवस्थापनाने उत्तरे दिली. व्हाइस चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक अनिलराव यादव यांच्यासह संचालक उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.