Nashi News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकेत जमा करता येतील, असे स्पष्ट केले आहे.
तसेच नागरिकांना या नोटा बँकेतून मुदतीत बदलून घेता येणार आहे. मात्र आता बाजार समित्यांमध्ये शेतीमाल खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना २ हजार रुपयांच्या नोटा देऊन व्यवहार पूर्ण करण्याचा जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी सपाटा लावला आहे.
अचानकपणे या नोटा कुठून येत आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दडवून ठेवलेल्या नोटा आता व्यवहार पूर्ण करताना काही व्यापाऱ्यांकडून माथी मारल्या जात आहे, अशी ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे.
शेतीमालाचा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. असे असताना आता खरिपाच्या तोंडावर भांडवल व आनुषंगिक खर्चासाठी शेतीमाल विक्री होत आहे. मात्र व्यापारी देयके अदा करताना सर्रासपणे २ हजारांच्या नोटा देत आहेत.
मात्र शेतकऱ्यांनी नकार दिल्यानंतर काही ठिकाणी बाचाबाची झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना ३ ते ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम देताना दोन हजार रुपयांच्या नोटा देण्यात आल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
एकीकडे कवडीमोल दराने शेतीमालाची विक्री होत आहे. त्यामुळे थोडे फार पैसे हाती मिळत असल्याने शेतकरी हतबल आहे.
दुसरीकडे व्यापारी बळजबरीने २ हजारांची नोट देऊन शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. असे प्रकार नाशिक व धुळे जिल्ह्यांत समोर आले आहेत. तर राज्यभरातून तक्रारी समोर येत आहेत.
शेतकऱ्यांची अशी झालीय कोंडी...
- कृषी सेवा केंद्रे, किराणा, कापड दुकानदार यांच्याकडून नोटा स्वीकारण्यास नकार.
- शेतीमाल विक्री केल्यानंतर घरी परतताना जेवणास थांबल्यावर हॉटेलचालक नोटा घेईनात; काही ठिकाणी घडले वादाचे प्रकार.
- शेतीमाल वाहतूकदार, काही ठिकाणी पेट्रोल पंप यांच्याकडून नोटा घेण्यास नकार.
- सेवा पुरवठादार, शेतमजूरही नोटा स्वीकारेना.
अचानक दोन हजारांच्या नोटा आल्या कुठून?
यापूर्वी शेतीमाल विक्री झाल्यानंतर १० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतच्या नोटांचा वापर अधिक होता; मात्र यापूर्वी २ हजार रुपयांच्या नोटांमध्ये व्यवहार कमी प्रमाणात होते. मात्र २ हजार रुपयांच्या नोटबंदीची घोषणा झाल्यानंतर अचानकपणे व्यवहारात त्यांचा वापर कसा वाढला? जर बँका २ हजार रुपयांच्या नोटा रोकडमध्ये देत नाहीत, मग व्यापाऱ्यांकडे या नोटा अचानक कशा आल्या? त्यांचा वापर का वाढला, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
यापूर्वी शेतीमाल विक्रीपश्चात पेमेंट घेताना मोठ्या नोटांची मागणी केली असता व्यापारी मोठ्या नोटा देत नव्हते. आता बँकांनी दोन हजारांच्या नोटा देणे बंद केले असताना लासलगाव येथील व्यापारी मात्र बळजबरीने आता दोन हजार रुपयांच्या नोटा देऊन व्यवहार पूर्ण करत आहेत. ग्रामीण भागात दोन हजारांच्या नोटा स्वीकारायला कोणी व्यावसायिक, शेतमजूर तयार नाही. त्यामुळे आता व्यवहार करताना नाहक वाद होत आहेत.- सोमनाथ शेळके, शेतकरी, ठाणगाव, ता. येवला
राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी आणि अडत्यांनी कांदा आणि इतर शेतीमाल विक्रीचे पेमेंट करताना सर्रासपणे दोन हजारांच्या नोटा दिल्या आहेत, असे अनेक शेतकऱ्यांनी कळविले आहे.- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
शेतकऱ्याची मागणी नसेल, तर २ हजारांच्या नोटा बळजबरी व्यापाऱ्यांनी देऊ नयेत. कोणी जबरदस्ती करून शेतकऱ्यांच्या माथी मारत असतील तर हे योग्य नाही. शेतकऱ्यांची पिळवणूक होत असेल तर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही चौकशीची मागणी करतो. शेतकऱ्याची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरू.- शिवनाथ जाधव, माजी प्रदेशाध्यक्ष, रयत क्रांती संघटना.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.