Kharif Season 2023 : लगान चित्रपटात 'काले मेघा काले मेघा पाणी तो बरसाओ' असे हे गीत आहे. आकाशात ढग जमा होताच त्याची शेतकऱ्यांसह सर्वांनाच आठवण येत आहे. ढग दिसतात पण पाऊस पडत नाही.
गेल्यावर्षी दौंड तालुक्यात सरासरीच्या दीडपट पाऊस झाला. मात्र, जुलै महिन्यातील पंधरा दिवस संपले तरी यंदा अद्याप अनेक भागात पावसाची सुरुवात झाली नाही. पावसाने मोठी ओढ दिल्याने तालुक्यातील जिरायती भागावर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
यंदा वळवाचा नाही अन् मोसमी पाऊसही पडला नाही. जिरायती भागात अद्याप खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत. पांढरेवाडी, कुसेगाव, पडवी या भागात मध्यंतरी झालेल्या थोड्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. मात्र, लवकर पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.
खडकवासला धरणसाखळीत यंदा ८.८८ टीएमसी (३०.४७ टक्के) पाणीसाठा आहे. खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात या दिवसात दररोज सुमारे ७० मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा येथील पाऊस खूपच कमी आहे. खडकवासला परिसरात काल (ता. १६) तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दौंडमध्ये जुलै महिन्यात कालव्याव्दारे हे तलाव १०० टक्के भरण्यात येतात. दोन दिवसापूर्वी बेबी कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता माधव टकले यांनी दिली. पाऊस नसल्याने दुकानातील ५० टक्के बियाणे पडून असल्याचे विक्रेते नितीन कटारिया यांनी सांगितले.
सध्या असलेला पाणीसाठा
माटोबा तलाव.........४२ टक्के
वरवंड तलाव..... २७ टक्के
खामगाव तलाव...... ३९ टक्के
पुणे-सोलापूर महामार्ग व कालव्याच्या दक्षिणेकडील भाग हा जिरायती म्हणून ओळखला जातो. या भागात शेतीची काम ठप्प आहेत. पाऊस लांबल्याने नदी पट्ट्यात फक्त उसाच्या लागवडी चालू आहेत. अन्य भागातील ऊस लागवड थांबली आहे.-महेश रूपनवर, 'आत्मा'चे समन्वयक
जून महिन्यात कालव्याला पाणी असल्याने या भागातील पिकांना पाणी टंचाई जाणवत नाही. मात्र, पावसाअभावी कालव्याखालील इतर पिकांना तरारी दिसत नाही. तालुक्यात २५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. ३० जुलैपर्यंत पाऊस झाला नाही तर खरीप हंगाम वाया जाईल,- राहुल माने, तालुका कृषी अधिकारी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.