Nanded News : जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त देगलूर, बिलोली, मुखेड, भोकर, मुदखेड, अर्धापूर आदी तालुक्यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अपेक्षा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या.
पाहणी दौऱ्यात नागरिकांनी निवेदने दिली, यात वेदना मांडल्या, नुकसानाची माहिती दिली व शासनाकडून मदतीची अपेक्षाही व्यक्त केली होती. त्या सर्व बाबी त्यांनी तपशीलवारपणे जिल्हा प्रशासनासमोर मांडल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. २९) झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, निवासी जिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, माजी आमदार अमर राजूरकर उपस्थित होते.नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया गेल्या.
जमीन खरवडून निघाली. घरांचे, दुकानांचे नुकसान झाले. रस्ते व पूल क्षतिग्रस्त झाले. जिल्हा प्रशासनाने झालेल्या संपूर्ण नुकसानाचा अहवाल लवकरात लवकर तयार करून राज्य सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवावा; जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना मदत मिळू शकेल, अशी सूचना अशोक चव्हाण यांनी मांडली.
पिकांचे पंचनामे, नागरिकांचे स्थलांतर, नागरिकांना धान्य व इतर संसारोपयोगी वस्तू देणे, पायाभूत सुविधा व शाळांसारख्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनी व विहिरीत जमा झालेला गाळ काढण्यासाठी मदत करणे, नाला खोलीकरण- सरळीकरण, ठिकठिकाणी खंडीत झालेला वीज पुरवठा, ट्रान्स्फॉर्मर्स बदलण्याची आवश्यकता आदी मुद्यांकडेही त्यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले.
युरिया लिकिंग’ नियमबाह्य; तक्रार करा, कारवाई करू
युरिया खरेदी करताना खते व औषधांच्या खरेदीची सक्ती केली जात असल्याची जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी तक्रार असल्याचे अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्याच्या कानावर घातले. मागणीनुसार युरिया उपलब्ध होत नसल्याचेही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
त्यावर उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी युरिया लिंकिंगचा प्रकार नियमबाह्य असून, शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार करावी. संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी स्पष्टोक्ती केली. नांदेड जिल्ह्यासाठी पुरेसा युरिया आहे व मागणीनुसार तो शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाईल. युरियाची कमतरता जाणवणार नाही, असेही ते म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.