Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Rain Update : पावसाने तिसऱ्या दिवशी झोडपले

Latest Rain Update : राज्यात पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, वऱ्हाड, खानदेश आणि मराठवाड्याच्या काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली.

Team Agrowon

Pune News : राज्यात पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, वऱ्हाड, खानदेश आणि मराठवाड्याच्या काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग तिसऱ्या दिवशी रविवारी (ता. २४) पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांत पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहेत. तर काही मंडलांत अतिवृष्टी झाली असून, बहुतांश ठिकाणी पिकांना पावसाने दिलासा मिळाला आहे.

कोकणातील ठाणे, रायगड जिल्ह्यांत पावसाच्या जोरदार सरी पडल्या. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी होता. तर पालघर जिल्ह्यात पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या असून, काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या भात पिकांना चांगलाच आधार मिळाला.

खानदेशातील जळगाव जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे कपाशी, तूर पिकांना नवसंजीवनी मिळाली. नगर जिल्ह्यातील पारनेर आणि नगर तालुक्यांसह श्रीगोंदा कर्जतमध्येही शनिवारी (ता. २३) दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. नगर तालुक्यातील सर्व ११ महसूल मंडलांसह पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव तालुक्यांतील आठ अशा १९ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

जिल्हाभरातील ७० हून अधिक मंडलांत चांगला पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह शिरूर तालुक्याच्या पश्‍चिम भागाला मुसळधार पावसाने झोडपले.

सुमारे तीन तास चाललेल्या पावसामुळे आमदाबाद, सविंदणे, टाकळी हाजी या परिसरांतील ओढे, नाले खळखळून वाहू लागले. शेतात व रस्त्यावर पाणीच पाणी झाले. काही ठिकाणी शेताचे बांध फुटून पिके वाहून गेली. तर काही शेतांना तळ्याचे स्वरूप आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले.

नाशिक जिल्ह्यात दोन महिने पावसाने ओढ दिली होती. मात्र गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याची स्थिती आहे.

मालेगाव तालुक्यात पावसाची वाट पहिली जात असताना येथेही पावसाने उशिरा का होईना, कृपा केली. रविवारी (ता. २४) सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत मालेगाव, सुरगाणा व येवला तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गणेशोत्सवात जोरदार आभाळमाया झाल्याने पावसाने दिलासा मिळाला.

नागपूर शहरात अवघ्या चार तासांत ११६.५ मिलिमीटर कोसळत शनिवारी (ता. २३) पावसाने दाणादाण उडवून दिली होती. त्यानंतर रविवारी मात्र सर्वदूर पावसाने उघडीप दिल्याचे चित्र होते. धामणगावरेल्वे (अमरावती) परिसरातील काही गावांमध्ये पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. नागपूर शहर व परिसरात शनिवारी अवघ्या चार तासांत ११६.५ मिमी पाऊस कोसळला. परिणामी, शहर जलमय झाले होते. घरात पाणी शिरल्याने महेश नगरातील मीनाबाई पिल्ले (वय ७०), तेलंगखडीजवळ सुरेंद्रगड येथील संध्या ढोरे (वय ८०),

अयोध्यानगरातील संजय गाडेगावकर (व ५२) या तिघांचा मृत्यू झाला. त्यासोबतच पुराचे पाणी गोठ्यात शिरल्याने १४ जनावरांचाही मृत्यू झाला होता. मुंबई दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सायंकाळी महापालिकेत जात पूरस्थिती व बचाव कार्याचा आढावा घेतला. बाधितांना तत्काळ मदतीचे आदेश त्यांनी दिले.

शनिवारच्या परिस्थितीनंतर रविवारी (ता.२४) मात्र सर्वदूर पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा तालुक्यात शनिवारी (ता. २३) रात्री सर्वच मंडलांत मुसळधार पावसाने दाणादाण उडविली आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. या दमदार पावसात कंडारी धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे.

महाळुंगी व वडनेर मंडलात सर्वाधिक ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने केदार नदीला पूर आला आहे. त्यामुळे धाडी गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. माटोडा येथील प्रशांत दांडगे (वय ३२) हा युवक रविवारी (ता. २४) सकाळी ९ वाजता केदार नदीच्या पुरात वाहून गेला आहे. महाळुंगीतील २० ते २५ जनावरे वाहून गेली. अनेक घरांची पडझड झाली आहे.

मराठवाड्यातील परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ८२ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील पाऊस बाभळगाव १३२.५, पाथरी ९५.८, मानवत ९५.३, केकरजवळा ६५.३, पेडगाव ६७, राणीसावरगाव ६७.८ मिलिमीटर पाऊस झाला. या ६ मंडलांत व हिंगोली जिल्ह्यातील दिग्रस कऱ्हाळे ७२.३, आंबा ७४, येळेगाव ७२.३ ही ३ मंडले मिळून एकूण ९ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली.

गेल्या २४ तासांत परभणी जिल्ह्यात सरासरी २७.१ मिलिमीटर, तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी २०.९० मिलिमीटर पाऊस झाला. मराठवाड्यातील आठपैकी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड या सहा जिल्ह्यांत पावसाची दमदार ते जोरदार हजेरी लागली. या जिल्ह्यातील ५० मंडलांत अतिवृष्टी झाली. लातूर व धाराशिव जिल्ह्यांत पावसाचा जोर तुलनेने खूप कमी होता. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमधील काही मंडलांत धो-धो पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT