पुणे ः जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकींच्या (Gram Panchayat Election ) निकालांमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापले गड राखले आहेत. मात्र जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आपले प्राबल्य सिद्ध केले असून, भाजपने काही ठिकाणी चंचूप्रवेश करत आपले अस्तित्व दाखविले आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाने आपापले गडदेखील राखल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता.२०) मतमोजणीनंतर विविध निकालांनंतर चित्र स्पष्ट होत गेले.
जुन्नरला नऊ ग्रामपंचायती ‘राष्ट्रवादी’कडे
जुन्नर तालुक्यातील निवडणूक झालेल्या १७ पैकी ९ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच निवडून आल्याचा दावा प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे यांनी केला आहे. यामध्ये आणे, पारगाव, झापवाडी, भिवाडे खुर्द, सोमतवाडी, शिंदे, काळवाडी, हिवरेतर्फे मिन्हेर व आंबे या नऊ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे.
शिरोली सुलतानपूर, काले व विठ्ठलवाडी तीन ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे सरपंच विजयी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, काळवाडी ग्रामपंचायतींचा सरपंचपदाचा निकाल राखून ठेवण्यात आला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेश ठुबे यांनी सांगितले. याबाबतच्या तक्रारीबाबत निवडणूक आयोगाकडून निर्णय आल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
मुळशीत तरुणांच्या हाती सत्ता
मुळशी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी तरुणांच्या हाती गावगाड्याची चावी दिली. बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले. सरपंचपदाबरोबरच निवड झालेल्या सदस्यांमध्ये तरुणांचीच क्रेझ पाहायला मिळाली. तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता.
त्यापैकी कोंढूर, वाजळे, लव्हार्डे, तव, असदे या पाच ग्रामपंचायतींच्या सरपंचांसह सर्व जागा बिनविरोध झाल्या. तर आडमाळ, मोसे, माळेगाव, भोडे, पाथरशेत, दासवे या ग्रामपंचायतींच्या जागांसाठी मतदान झाले. पाथरशेत ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाल्याने या जागेसाठी उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे ही जागा रिक्त राहिली. सर्वच उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचत मतांसाठी साकडे घातले. नात्यागोत्यांसह खिसे गरम करण्याचीही उपाययोजना अनेकांनी राबविल्या. प्रत्येकानेच ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे विजयाचा गुलाल कोण उधळणार याची मुळशीकरांना उत्कंठा लागली होती.
आंबेगावला ‘राष्ट्रवादी’ पुन्हा
आंबेगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीपैकी १७ ग्रामपंचायतींवर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दोन, भाजप एक व महाविकास आघाडीने एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. घोडेगाव येथे मंगळवारी (ता. २० डिसेंबर) सकाळी मतमोजणी झाली. चिंचोडी-लांडेवाडी व भावडी गावात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने पुन्हा सत्ता काबीज केली आहे. निघोटवाडी, पारगावतर्फे खेड, घोडेगाव व मेंगडेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनुक्रमे शिवाजीराव निघोट, सरपंच सचिन पानसरे, कैलास बुवा काळे, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्ता काबीज केली आहे.
वेल्ह्यात आमदार थोपटे यांची एकहाती सत्ता
वेल्हे तालुक्यात २८ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसची सरशी झाली असून, आमदार संग्राम थोपटे यांनी एकहाती सत्ता राखली आहे. प्रतिष्ठेच्या व महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक १३ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत, तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांना १० ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले असून, शिवसेना ठाकरे गटाला २ जागा, भारतीय जनता पार्टीला १ जागा, तर दोन ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक विकास आघाडी मिळाल्या आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.