Pune News : राज्यात कृषी सचिव व आयुक्तांनंतर सर्वात महत्त्वाचे पद समजल्या जाणाऱ्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाच्या संचालकपदासाठी सोमवारी (ता.२७) मंत्रालयात वेगात घडामोडी घडल्या.
मुख्यमंत्र्यांनी गुणनियंत्रण संचालक (Quality Control Director) दिलीप झेंडे (Dilip Zende) यांची अचानक बदली केली असून या पदावर विकास पाटील (Vikas Patil) यांची नियुक्ती केली आहे. या बदल्यांमुळे कृषी आयुक्तालयासह (Agriculture Commissionerate) राज्याच्या विविध कृषी कार्यालयांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
कृषी विभागाच्या सहसचिव सरिता बांदेकर देशमुख यांनी झेंडे यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. झेंडे आता राज्याचे विस्तार व प्रशिक्षण संचालक म्हणून काम करतील.
तर, विद्यमान विस्तार संचालक विकास पाटील यांना झेंडे यांचे रिक्तपद देण्यात आले. विशेष म्हणजे झेंडे यांना संचालकपदावर तीन वर्षे पूर्ण झालेली नव्हती.
मात्र, मुख्यमंत्र्यांनी विशेषाधिकाराचा वापर करीत एक वर्ष आधीच झेंडे यांना पदावरून हटविले आहे. त्यांच्या बदलीसाठी विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आग्रह धरला होता, अशी चर्चा कृषी विभागात आहे.
श्री. झेंडे म्हणाले, ‘‘गुणनियंत्रण संचालक म्हणून मला दोन वर्षे पूर्ण झाली होती. त्यामुळे प्रशासकीय बदलीस मी पात्र होतो.
विस्तार संचालक म्हणून मला दिलेली नवी जबाबदारी माझ्यासाठी एक चांगली भेट आहे. कारण, विस्तार हा माझा आवडीचा भाग आहे. समस्याग्रस्त गुणनियंत्रण विभागात मी अनेक सुधारणा केल्या गेल्या.
ऑनलाइन परवाना प्रणालीची घडी बसवली. त्यासाठी स्कोच अॅवॉर्डदेखील मिळाला. लॉकडाउनच्या काळात १२ हजार परवाने आम्ही वाटले. त्यामुळे निविष्ठा उद्योगातील प्रतिनिधी काम करू शकले.
परिणामी शेतकऱ्यांची गैरसोय झाली नाही. घरचे सोयाबीन तयार करण्याची मोहीम हाती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी ७५० कोटी बियाणे स्वतः तयार केले.
त्यामुळे राज्याचा सोयाबीन पेरा वाढला. राज्यात निविष्ठांची टंचाई होऊ दिली नाही. केंद्र शासनाच्या सोबत उत्तम समन्वय ठेवल्यामुळे योजना व निधी यात अडचणी आल्या नाहीत.’’
नवे गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनीदेखील आपल्यासाठी ही बदली अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे. ‘‘विस्तार संचालक म्हणून मी क्षेत्रिय पातळीवर सर्व योजना नेण्याचा प्रयत्न केला.
कृषी सहायक बांधावर राहील, यासाठी पाठपुरावा केला गेला. क्षेत्रिय कामकाज प्रक्रियेचे संगणकीकरण करण्यावर भर दिला.
कापूस, सोयाबीन विस्तारविषयक योजना, क्रॉपसॅप, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कडधान्य व गळीतधान्य विकास योजना तसेच पीकविम्यासारख्या योजना प्रभावी राबविल्या.
नव्या जबाबदारीत माझ्याकडून गुणनियंत्रण विभागाचे कामकाज अधिकाधिक सुटसुटीत, लोकाभिमुख केले जाईल. परवाना पद्धतीचे पारदर्शक संगणकीकरण, राज्यभरातील निविष्ठात वितरणात सुरळीतपणा आणण्याकडे आपला भर राहील,’’ असे श्री.पाटील यांनी सांगितले.
भूकंपाचा केंद्रबिंदू सिल्लोडमध्ये
कोट्यवधी रुपयांची उलाढाल, परवान्यांचे वितरण व रद्द अधिकार आणि धाडी टाकण्याचे कायदेशीर हत्यार असलेल्या गुणनियंत्रण विभागात दिलीप झेंडे यांच्या बदलीमुळे भूकंप झाला आहे.
सिल्लोड महोत्सवात चुकीच्या पद्धतीने वर्गणी गोळा करण्यास झेंडे यांनी असमर्थता दर्शविली होती. तेच कारण, त्यांच्या बदलीस पूरक ठरले, असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दुसऱ्या बाजूला, भाजपच्या एका मंत्र्याने खास शिष्टाई करून झेंडे यांच्या रिक्त जागेवर आपल्या मर्जीतील अधिकारी आणला, अशीदेखील चर्चा आहे. काही अधिकाऱ्यांच्या मते, या पदासाठी फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी जोरदार व्यूहरचना केली होती.
परंतु, एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यासह कृषिमंत्री, महसूलमंत्र्यांनी मोतेंऐवजी पाटील यांच्या पारड्यात वजन टाकले. त्यामुळे मोते यांना मागे हटावे लागले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.