अकोला ः पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांत रब्बी हंगामातील पिकांची बहुतांश ठिकाणी लागवड (Cultivation) पूर्ण झाली आहे. सध्या पिकांना रासायनिक खताची (Fertilizer) मात्रा देण्याचे काम अनेक शेतकरी करीत आहेत. काही पिकांना प्रामुख्याने युरिया खताची (Urea) गरज असताना बाजारात हा युरिया मिळत नसल्याने अडचणी वाढलेल्या आहेत. महिनाभरापासून हे खतच उपलब्ध नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, जवस, ज्वारी, मका अशा विविध पिकांची लागवड झाली आहे. काही शेतकरी अद्यापही खरिपातील पिके काढून रब्बी लागवडीची तयारी करीत आहेत. प्रामुख्याने महिना, दीड महिन्यापूर्वी लागवड केलेल्या पिकांना खताची दुसरी मात्रा दिली जात आहे.
त्यातही मका पिकाला युरियाची मात्रा देण्याची वेळ आली आहे. अशातच युरिया खत मिळत नसल्याची स्थिती आहे. शेतकरी विक्रेत्यांकडे वारंवार युरियाच्या उपलब्धतेची चौकशी करीत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यात तसेच वाशीम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड व इतर ठिकाणी युरिया मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
रिसोड तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून पिकांना खते देण्याच्या ऐनवेळी युरिया खताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यातच युरियाचा तुटवडा का निर्माण होतो, जाणुनबुजून तुटवडा निर्माण केला जातो का, असा प्रश्न निर्माण होत आहे. याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.शुभम खडसे, शेलुखडसे, ता. रिसोड, जि.वाशीम.
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून युरिया मिळत नाही. मका व इतर पिकांना युरिया देणे गरजेचे आहे. मात्र खतच उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत.दत्ता राऊत, शेतकरी, साखरखेर्डा, जि. बुलडाणा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.