Agriculture  Agrowon
ताज्या बातम्या

Akola Rain News : जून कोरडा गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंता कायम

Team Agrowon

Akola News : पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने मोठ्या अडचणी तयार झाल्या आहेत. प्रामुख्याने पावसाच्या अपेक्षेने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. शिवाय धूळपेरणी केलेल्या क्षेत्रात अनेकांना दुबार पेरणीलाही सामोरे जाण्याची चिन्हे तयार होत आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या २५ टक्के, अकोल्यात २१.५, तर वाशीम जिल्ह्यात ३४.७ टक्के पाऊस नोंद झालेला आहे. अद्यापही पाऊस सक्रिय झालेला नसल्याने पेरण्या रखडलेल्या आहेत.

मागील काही वर्षांत जून महिन्यात मृग नक्षत्रात हमखास पाऊस झाल्याने शेतकरी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच सार्वत्रिक पेरणीच्या तयारीला लागतात. यंदाही शेतकऱ्यांनी तयारी करून ठेवली होती. मात्र उजाडणारा प्रत्येक दिवस विना पावसाचा गेला.

अधून-मधून हलक्या सरी येत राहिल्याने अपेक्षा कायम होती. मात्र संपूर्ण जून महिना लोटला तरी पावसाने जोरदार हजेरी लावली नाही. परिणामी, यंदा अनेक वर्षांत पहिल्यांदा बऱ्याच शेतकऱ्यांना जून महिन्यात पेरणीचा मुहूर्त साधणे जुळले नाही.

बुलडाणा जिल्ह्यात मोताळा, नांदुरा, मलकापूर, बुलडाणा तालुक्यांतील काही भागात जूनमध्ये शेतकऱ्यांनी धूळपेरणी धरली. हलक्या सरीवर हे पीक उगवले. मात्र आता खंड वाढल्याने दुबार पेरणीचे या धूळक्षेत्रावर संकट घोंघावत आहे. या जिल्ह्यात कपाशीची आजवर १५ हजार हेक्टरपेक्षा जास्त लागवड झाली आहे.

अकोला जिल्ह्यातही सिंचन क्षेत्रात कपाशीची पेरणी झालेली असून, काहींनी सोयाबीनही टोकण पद्धतीने पेरणी केले. तर, काही शेतकऱ्यांनी पाऊस शक्यता पाहून सरसकट पेरणीलाही सुरुवात करण्याचे धाडस केले होते.

या भागातील सर्वच जिल्ह्यात सोयाबीन हेच खरिपात प्रमुख पीक असल्याने जूनमधील पेरणी उत्पादकतेच्या दृष्टीने फायदेशीर ठरत असते. आता जुलै महिना सुरू झाला असून, किमान पहिल्या आठवड्यात तरी पेरणीलायक पाऊस होईल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.

जिल्हानिहाय खरीप क्षेत्र

जिल्हा खरीप क्षेत्र हेक्टर सोयाबीन क्षेत्र हेक्टर झालेला पाऊस मिमी

बुलडाणा ७ लाख ३५ ३२१ ३९४४२६ ३५.२ मिमी

अकोला ४ लाख ४३११८ १९९८७० २९,५ मिमी

वाशीम ४ लाख ५१०४ २९७८६१ ५७.८ मिमी

मोताळा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी धूळपेरणी केलेली आहे. पाऊस नसल्याने आता बहुतेक गावांमध्ये दुबार पेरणी करावी लागणार आहे. - श्रीकृष्ण शेलकर, शेतकरी, मोताळा, जि. बुलडाणा
मागील अनेक वर्षांत पहिल्यांदा एक जुलै सुरू झाला तरी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही, असे घडले आहे. शेतकरी चातकासारखी प्रतीक्षा करीत आहे. गेले आठ दिवस डोक्यावर काळे ढग दाटून येतात, पण पाऊस काही येत नाही. बहुतेक शेतकऱ्यांच्या सहनशीलतेची परीक्षा सुरू आहे.
- कैलास नागरे, शिवणी आरमाळ, जि. बुलडाणा मेहकर
तालुक्यातील देऊळगाव माळी परिसरात पावसाचा पत्ता नाही. जुलै महिना सुरू झाला तरी पेरणी नाही. काही शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय पाहून पेरण्या धरल्या. पण हे शेतकरीही आता अस्वस्थ आहेत. दररोज ढग येतात. पण जोमदार पाऊस येत नाही.
-डॉ. गजानन गिऱ्हे, शेतकरी, देऊळगाव माळी, जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT