Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Khandesh Rain : खानदेशात वादळ, गारपिटीत पिके भुईसपाट

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशात शनिवार (ता. ४)पासून ठिकठिकाणी वादळ, पाऊस व गारपीट (Garpit) सुरू आहे. सोमवारी (ता. ६) सायंकाळी व रात्री धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांतील अनेक गावांत जोरदार गारपीट व वादळी पाऊस झाला.

यात हजारो हेक्टवरील पिके भूईसपाट झाली आहे. गारपिटीच्या तडाख्यात मोठे वृक्षही सोलले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. कोट्यवधींची हानी झाली असून, शेतकरी त्राहीमाम करीत आहेत.

धुळ्यातील साक्री तालुक्यात टिटाणे गावात सोमवारी सायंकाळी जोरदार गारपीट झाली. काही क्षणात रस्ते व शेतांत गारांचा खच तयार झाला.

वृक्षांनाही गारांनी सोलून काढले. या आपत्तीत साक्री व परिसरात सुमारे पाच हजार हेक्टरवरील पिके पुरती भुईसपाट झाल्याचा अंदाज आहे.


धुळ्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा भागांतही पाऊस व वादळाने कहर केला. यात दादर ज्वारी, गहू, फळपिके, केळी, हरभरा आदी पिकांची मोठी नासाडी झाली आहे. एकट्या धुळे जिल्ह्यात सुमारे १६ ते १७ हजार हेक्टरवरील पिके हातची गेल्याची माहिती आहे.

सलग सुट्ट्यांमुळे प्रशासनाने कुठलीही पंचनामे व इतर कार्यवाही या आपत्तीमध्ये मंगळवार (ता. ७) पर्यंत सुरू केलेली नव्हती. नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा भागांतही जोरदार गारपीट व वादळाचा पिकांना फटका बसला.

नवापुरातील विसरवाडी, खांडबारा, धडगावमधील सिसा भागांत गारपिटीने मका, ज्वारी व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. नंदुरबारात सुमारे चार हजार हेक्टरवरील पिकांचे ६० ते ७० टक्के नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, धरणगाव, अमळनेर, जळगाव, पारोळा, जामनेर, यावल आदी भागांत वादळ व पाऊस झाला. यात गहू, मका आदी पिके आडवी झाली आहेत.

चोपडा, जळगाव तालुक्यांत केळीचेही नुकसान झाले आहे. चोपड्यातील सनपुले, कठोरा, कोळंबा, कुरवेल, तावले, खाचणे, निमगव्हाण आदी भागांत मका, केळी, गव्हाचे मोठे नुकसान झाले.

जळगाव तालुक्यात आव्हाणे, खेडी खुर्द, वडनगरी, फुपनगरी, कानळदा, नांद्रा बुद्रुक, नंदगाव, फुपणी, गाढोदे या गिरणा काठावरील गावांतही वादळी पाऊस झाल्याने केळी, मका, फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

तसेच धरणगावमधील शिरूड, साळवा, नांदेड, सावखेडा या भागांतही मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे १५ ते १६ हजार हेक्टरवरील पिकांचे वादळी पावसात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.


प्रशासन, विमा कंपनीचा बेमालुमपणा
खानदेशात फळ पीकविमा योजनेत ८८ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. परंतु या योजनेबाबत तक्रारी, आरोप व शंका यामुळे चौकशी सुरू आहे.

अशात केळी व इतर फळपीक उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. पण विमा कंपनी या बाबत दखल घ्यायला तयार नाही. फळ पीकविमाधारक शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारून पंचनामे करावेत व तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

दुसरीकडे सलगच्या सुट्ट्यांत प्रशासन आनंद लुटत आहे. शासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून माहिती गोळा करावी व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे आत्माराम पाटील (कापडणे, जि. धुळे) यांनी केली आहे.


कापूस व इतर भाजीपाला पिकांचे दर कोलमडले आहे. वित्तीय संकटे मोठी आहेत. अशात माझ्या मका पिकाचे १०० टक्के नुकसान वादळी पावसात झाले आहे. तसेच परिसरात केळीचेही नुकसान झाले असून, प्रशासन, फळ पीकविमा कंपनीने तातडीने नुकसानीबाबत पंचनामे करावेत.
- सुधाकर रामदास पाटील, शेतकरी, सनपुले, ता. चोपडा, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT