Cooperative Banks
Cooperative Banks Agrowon
ताज्या बातम्या

Cooperative Banks : जिल्हा बॅंकांचा रोकडविरहीत व्यवहार जलद होणार

Team Agrowon

Pune News : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचा (District Cooperative Bank) रोकडविरहीत व्यवहार अधिक जलद होण्यासाठी शिखर बॅंक व ‘नाबार्ड’ने (NABARD) पावले टाकली आहेत. त्यासाठी २३ जिल्हा बॅंकांमध्ये आधार संलग्न देयक प्रणाली (एइपीएस) उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

सहकारातील कृषी पत पुरवठ्याची त्रिस्तरीय रचना बळकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.

जिल्हा बॅंकांकडून मिळणारा पत पुरवठा शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचे काम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या करतात. त्यामुळे बॅंका सक्षम झाल्या तरच सोसायट्या व्यवस्थित चालतील, अशी धारणा शिखर बॅंकेची आहे.

सोसायट्यांच्या बळकटीकरणाचा एक भाग म्हणून सोसायट्यांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय खर्च उचलण्यास शिखर बॅंकेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी अत्यावश्यक ३ कोटी रुपयांचा निधी यंदा शिखर बॅंकेने राज्य शासनाला दिला आहे.

बळकटीकरणाचा भाग म्हणून जिल्हा बॅंकांमध्ये एइपीएस प्रणाली बसविण्यासाठीदेखील शिखर बॅंकेने नियोजन केले आहे.

विशेष म्हणजे विदर्भातील भंडारा जिल्हा बॅंकेला एइपीएस प्रणाली सर्वप्रथम उपलब्ध करून देण्यात आली आहे. “एइपीएस प्रकल्पामुळे सर्व जिल्हा बॅंकांना मायक्रो एटीएम प्रणाली मिळते आहे.

त्यामुळे आधार संलग्न रोकडविरहीत व्यवहार जलद होतील. गेल्या वर्षी शिखर बॅंकेत ही प्रणाली उभारण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्हा बॅंकेत ही प्रणाली उपलब्ध करून दिली जात आहे,” अशी माहिती शिखर बॅंकेच्या सूत्रांनी दिली.

एइपीएस सुविधा तत्काळ मिळण्यासाठी शिखर बॅंकेने आधी ‘यूआयडीएआय’चे थेट सदस्यत्व घेतले आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांचा खर्च स्वतः शिखर बॅंकेनेच केला आहे.

विशेष म्हणजे जिल्हा बॅंकांमध्ये प्रणाली उभारण्यासाठी ‘नाबार्ड’च्या आर्थिक समावेशन निधीतून प्रत्येक मायक्रो एटीएमसाठी २२ हजार ५०० रुपयांची मदत मिळेल. सर्व जिल्हा बॅंकांमध्ये ही प्रणाली उपलब्ध झाल्यानंतर केंद्र शासनाच्या आर्थिक समावेशन मोहिमेला राज्यात खऱ्या अर्थाने बळकटी मिळेल.

या प्रणालीचा विस्तार करण्यासाठी श्री. अनास्कर यांच्यासह ‘नाबार्ड’चे मुख्य सरव्यवस्थापक जी. एस. रावत, सरव्यवस्थापिका रश्मी दराड, शिखर बॅंकेचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे तसेच इतर तंत्रज्ञांकडून पाठपुरावा केला जात आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

- पहिली एइपीएस प्रणाली विदर्भातील भंडारा जिल्हा बॅंकेत सुरू

- सर्व जिल्हा बॅंकांना मायक्रो एटीएम प्रणाली

- ‘नाबार्ड’च्या आर्थिक समावेशन निधीतून प्रत्येक मायक्रो एटीएमसाठी २२ हजार ५०० रुपयांची मदत

- शिखर बॅंकेकडून सोसायट्यांच्या निवडणुकांसाठी ३ कोटींचा निधी

शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार होणार सोपे

‘एइपीएस’ उपलब्ध होताच जिल्हा बॅंकेतील शेतकरी व इतर ग्राहकांना आधार कार्डद्वारे देशभर कोणत्याही बॅंकेच्या मायक्रो एटीएमद्वारे व्यवहार करता येतील. यात पैसे काढणे, जमा करणे, रक्कम हस्तांतरित करणे, खात्यातील रकमेची चौकशी किंवा सांराश रुपाने माहिती (मिनी स्टेटमेंट) मिळण्याची कामे जलदपणे होतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT