लेखक - बालाजी सुतार
एका मित्राला फोन करून विचारलं, “कुठं आहेस? काय चाललंय?” तो म्हणाला, “वावरात आहे. कापसावर फवारा चालूय..” मी म्हणालो, “काळजी घे रे नीट. ते यवतमाळमध्ये काय झालं माहितेय नं? बावीस की तेवीस लोक मेले औषध शरीरात जाऊन.” तो म्हणाला, “सुटले म्हण. उद्या जायचे ते आज गेले एवढंच. बाकी कुणाचं काय अडतंय शेतक-यांवाचून. आमची मरणं आम्हालाच भोगायची असतात.”
मी म्हणालो, “खरं आहे.”
त्याचं म्हणणं खरंच आहे. सगळ्या जगाने काही कुणब्यांचा इसार घेतलेला नाही.
कृषी अधिका-यांपासून कृषी महाविद्यालये, विद्यापीठांतल्या प्राध्यापकांपर्यंत आणि हवामानाचा अंदाज सांगणा-या शास्त्रज्ञांपासून प्रगत बीजांवर संशोधन करणा-यांपासून खते कीटकनाशके तयार करणा-या सगळ्यांपर्यंत सगळ्यांना महिनोमाल पगारपाणी मिळत असल्यावर त्यांचं काय अडणार आहे बावीस किंवा पंचवीस किंवा बावीसशे किंवा पंचवीसशे शेतकरी ह्या त्या कारणाने फुकाफुकी मरून गेले तरी? त्यांनी त्यांची पगारापुरती ऑफिसची कामं करावीत की शेतक-यांना मार्गदर्शन वगैरे फुकटची फौजदारी करण्यात टाईम बरबाद करावा?
आणि सत्तेच्या खुर्चीवर तर काय शेतक-यांचीच चिंता वाहणारे लोक बसलेले असतात; तरी शेतकरी मरत असतील किंवा बसल्या जागी कुजत असतील तर सरकारने तरी काय करावे? शेतक-यांचीच पोरे खुर्च्या उबवत असतात हे कितीही खरे असले तरी त्यांना त्यांची दुसरी काही कामच नसतात की काय? अं?
खूप कामं असतात त्यांना.
त्यांना टेंडरं काढायची असतात. ठेकेदार जगवावे लागतात, बड्या उद्योगपतींना सांभाळायचं असतं, कैक लाख कोटींच्या नोटा क्यान्सल करून कित्येक लाख कोटींच्या नव्या नोटा छापायच्या असतात, दररोज तीस की तीनशे किलोमीटर रस्ते बांधायचे असतात त्यांना. त्यांना जीडीपी वाढवायचा असतो, गरिबीही हटवायची असते, बुलेट ट्रेन आणायची असते, समुद्रात पुतळे उभे करायचे असतात, विद्यापीठांची नावे बदलायचं लचांड त्यांच्याच मागं असतं, अमक्या तमक्या फायरब्रँड पुढा-याला एकट्यालाच पक्षात घ्यायचं की त्याच्या पोराबाळांसकट घ्यायचं असल्या जटील प्रश्नांचा सामना करायचा असतो, ह्याच्या त्याच्या दसरा मेळाव्याला उतार चढाव द्यायचे असतात, २०१९ ला येऊ घातलेल्या निवडणूकींची चिंता त्यांच्याच मागे असते पुन्हा, अगदीच काही नाही म्हटलं तरी रिकामचोट ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागतात. एक ना दोन; हजार कामं असतात त्यांच्यामागं निकडीची.
बारोमास हे शेतक-यांचंच झेंगट लावून घ्यावं काय त्यांनी मागं?
आणि आपले लोक तरी कसले चमत्कारिक असतात बघा. बड्या अब्जाधीश उद्योगपतींकडेच कशाला लक्ष देताय असं विचारतात. त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं, त्यांना सोयीसवलती नाही दिल्या, त्यांना हजार कोटींचं कर्ज नाही दिलं तर सरकारने निवडणुकीत दिलेलं ‘विकास’ आणण्याचं वचन कसं पुरं होईल? आणि विकासच नाही झाला तर जीडीपी तरी कसा वाढेल? आता यावर ‘जीडीपी म्हणजे काय?’ असं विचारू नका. ते बरंच काहीतरी भारीपैकी असतंय. आणि ते वाढलं की विकास येतोय देशात. काही का असंना, आपल्याकडे येतंय तर त्याला कशाला अडवायचं लोकांनी? पण नाही; आपल्या लोकांना अकला कमीच असतात एकुणात. एवढी कितीतरी हजार कोटींची बुलेट ट्रेन कर्ज काढून म्हणजे जवळजवळ फुकटच मिळवलीये जपानकडून, त्याचं कौतुक करायचं सोडून लोकलच्या स्टेशनावर आपसात चेंगरून मेलेल्या लोकांबद्दल गहिवर काढत राहतात. लोकांनी त्यांची त्यांनी स्वत:हून चेंगराचेंगरी करून घेतली त्याला सरकार करेल?
आणि बुलेट ट्रेनच्या स्टेशनावर असं काही होणारच नाही मुळी. नुसतं इथून तिथवर जायला काही हजारांचं तिकीट काढावं लागतंय. तिथे कोण कशाला गर्दी करेल आणि चेंगरून मरेल? चेंगराचेंगरी थांबवण्याचा एक सर्वोत्तमच उपाय नाहीय काय? मग?
‘आपल्या देशात दररोज तीस किलोमीटर रस्ता बांधून तयार होतोय.’ असं परवा एकाला सांगत होतो, तर तो गृहस्थ म्हणाला, “हा बांधून तयार झालेला रोजचा तीस किलोमीटर रस्ता नेमका जातोय कुठं मग? आमच्या गावात तर नाही आला अजून?” मला हसावं की रडावं तेच कळेना. आता याचं गाव म्हणजे टीचभर लांबीरुंदीचं. तीन डोंगर चढून उतरावे लागतात मग याचं गाव येतं. याला कशाला हवाय नवा करकरीत बांधलेला रस्ता? कुठून कुठेही जाता येता डोंगर चढून उतरून माणसाचा व्यायाम होतो दणकून. तब्येती ठणठणीत राहतात सबंध गावाच्या; ते गेलं कुठंच! लेका, खणखणीत डांबरी रस्ते मोठ्ठ्या शहरांसाठी हवे असतात. धंदेवाल्यांचा माल लादून जाणा-या सोळा अठरा बत्तीस चाकी गाड्या नीट जात येत राहाव्यात म्हणून लागतात रस्ते. असे कुठल्याही भकी-बरगडीवरच्या वाड्यातांड्यांवर रस्ते न्यायला लागलो तर वाट लागेल सगळ्या विकासाची आणि अर्थव्यवस्थेची.
एक पुरोगामी दोस्त म्हणाला, “समुद्रात पुतळे बांधून कसा होणार विकास देशाचा?”
आता याला कसं सांगावं, की, बाबा, ‘विकास’ म्हणजे नुसते फ्याक्ट-या उभं करणं नसतं. माणसांच्या मनातला अभिमान, रग, मस्तीही वाढती राहील अशी तरतूद करावी लागते. या पुतळ्यात सामावलेल्या इतक्या दिव्य महापुरुषाचे आपण वंशज आहोत, या मदाने छात्या तटाटून फुगल्या की मग पोटात वेळेवर भाकरी नाही गेली तरी चालतं. आपला इतिहास केवढा वैभवशाली होता हे कळलं की आपल्या वर्तमान दारिद्र्याची टोचणी लागत नाही समाजपुरुषाच्या मनाला. हे केवढं मोठठं फलित असणार आहे समुद्री स्मारकाचं ! तुम्हाला अकलेच्या खंदकांना नाहीच कळणार हे.
सकाळीच एकजण म्हणाला, “‘बहुत हुई अंधरेकी मार, अबकी बार फलाणी सरकार’ असं म्हणणा-या लोकांनीच आता लोडशेडिंग गावातून पार मुंबईपर्यंत नेऊन पोहोचवलं. हे लोक निवडणुकीआधी खोटं बोलले असा याचा अर्थ होतो.”
कायच्या कायच नाही का हे म्हणणं? इथे तुमच्या वावरातल्या धानाला वेळच्यावेळी पाणी द्यायला लाईट मिळत नाही आज कितीतरी वर्षांपासून. ‘शहरांना अष्टौप्रहर लाईट आणि आमच्याकडेच का ही अशी बोंब?’ असं ओरडत होता इतके दिवस. आता मुंबईपुण्यातल्या लोकांनाही समान न्याय लावला तरी ओरड चालूच तुमची? सरकारसाठी काही लोक मोअर इक्वल असले तरी बाकीचे सगळे लोक सारखेच इक्वल असतात, हे कधी कळावं तुम्हाला? या मोअर इक्वलपणातून मुंबईपुण्यातले ऐटमारू लोकही आता सरकारने वगळून टाकले, हे चांगलंच झालंय की ! सरकार सगळ्यांकडे समदृष्टीने आणि समान मायेने पाहत आहे, याची ही खूणच आहे. तुम्हाला ती उमगत नसेल तर त्याचा दोष सरकारवर नका टाकू.
आणखी एक जण म्हणाला, “आमच्या गावाला येष्टी द्यायची सोडून जीयेष्टी कसली देतोस भावड्या?”
काय बोलावं असल्या अडाणी लोकांशी?
जागतिक कीर्तीचे (गुप्त) अर्थतज्ञ असलेल्या प्रधानसेवकांनी ज्याचं वर्णन ‘गुड अॅँड सिंपल टॅक्स’ असं केलेलं आहे तो साधा सोपा सुगम संगीतासारखा सुश्राव्य जीएसटी तुम्हाला नको वाटतोय? आणि त्याच्या नावावर विनोद करून बदल्यात मागताय काय तर किरकोळ महामंडळाची एक फालतू एसटी? कशाला? तालुक्याच्या गावात जाऊन चैन करायला?
कायतरीच!
जनतेपैकी लोकांनो, मापात राहा आपल्या. भलत्या अपेक्षा करू नका. नकाच करू.
बा अदब ! बा मुलाहिजा ! ‘विकास’ येतो आहे !
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.