Election Agrowon
ताज्या बातम्या

APMC Election : पिंपळगाव बसवंत, नाशिक बाजार समितीसाठी अर्ज दाखल

जिल्ह्यात १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये पिंपळगाव बसवंत, नाशिक येथे शुक्रवारी (ता. ३१) उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांची (APMC Election) रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये पिंपळगाव बसवंत, नाशिक येथे शुक्रवारी (ता. ३१) उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पिंपळगाव बसवंत बाजार समितीसाठी आमदार दिलीप बनकर व प्रतिस्पर्धी माजी आमदार अनिल कदम यांनी तर नाशिक बाजार समितीसाठी माजी सभापती देवीदास पिंगळे, संपतराव सकाळे, माजी संचालक दिलीपराव थेटे, तसेच बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासह उमेदवारांनी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत या निवडणुकीत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आमदार दिलीप बनकर यांच्या गटाकडून दीपक बोरस्ते, रामभाऊ माळोदे, विठोबा फडे यांनी अर्ज दाखल केले.

तर माजी आमदार अनिल कदम यांच्याकडून भास्करराव बनकर, दिलीप मोरे, आनंदराव बोराडे, राजेश पाटील, गोकुळ गीते, प्रभाकर कुयटे, बाळासाहेब जाधव यांनी अर्ज दाखल केले. माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांचा अर्ज दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोसायटी गटात ७५, ग्रामपंचायत गटात १७, व्यापारी गटात १३ तर हमाल मापारी गटात ३ अर्ज दाखल झाले आहेत.

नाशिक बाजार समितीसाठी २४६ अर्ज दाखल झाले आहेत. माजी खासदार तथा माजी सभापती देवीदास पिंगळे आणि शिवाजी चुंभळे, दिनकर पाटील यांच्या गटातील काही सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

मालेगाव बाजार समितीच्या १८ जागांसाठी शुक्रवारी (ता. ३१) दिवस अखेरपर्यंत ४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात सोसायटी गटातून सर्वाधिक ३९, ग्रामपंचायत गटातून ९, व्यापारी गटातून ५ तर हमाल मापारी गटातून २ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

येथे पालकमंत्री दादा भुसे आणि शिवसेना-उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या पॅनलमध्ये सरळ लढतीची शक्यता आहे. तर भाजपकडून इच्छुक असलेल्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करावेत.

पक्षाकडून पाहिजे ती मदत केली जाईल, असे आश्वासन जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्यासह भाजपचे देवा पाटील, नितीन पोफळे, लकी गिल, अरुण पाटील, नंदू सोयगावकर, दीपक देसले यांनी दिले.

येवल्यात बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला ५० टक्के जागावाटप केल्यास शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाईल अन्यथा बाजार समिती निवडणूक शिवसेना स्वतंत्र पॅनलची निर्मिती करून लढविणार असल्याची भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT