Dhule News : तापमानाचा पारा कधी नव्हे तो दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वाढत्या तापमानाची ‘झळ’ मानवासह पशुपक्ष्यांनाही बसत आहे. बहुतेक ठिकाणच्या वनक्षेत्रातील पाणवठे आटल्याने पाण्याच्या शोधार्थ वन्य पशू शेतशिवाराकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.
वाढत्या उष्णतेमुळे भविष्यात पशुपक्ष्यांचे वास्तव्यही धोक्यात येऊ शकते. शुक्रवारी (ता. १२) दुपारी काळगावलगतच्या वनक्षेत्रात दुचाकीस्वारांना लांडग्यांची जोडी शेतशिवाराकडे जाताना दृष्टीस पडली. राज्यात धुळे जिल्ह्यात सर्वांत जास्त लांडगे असल्याची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कमी ३८ अंश सेल्सिअस इतका असलेला तापमानाचा पारा आता ४० अंशांवर पोहोचला आहे. उष्णतेच्या तीव्र झळा जाणवत असून, जणू ही धोक्याची घंटाच आहे.
यंदा एप्रिल महिना अवकाळी पावसात गेल्यामुळे एप्रिल हॉट ठरला नाही. मे महिन्यात तापमानवाढीचा अनुभव येऊ लागला. बुधवारी (ता. १०) देशभरात सर्वाधिक कमाल तापमान नोंदले गेले. अगदी सकाळी नऊपासून सायंकाळी पाचपर्यंत प्रचंड तापमान असते.
पश्चिम पट्ट्यातही उष्णतेचा दाह
साक्री तालुक्यातील पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील वनक्षेत्र बऱ्यापैकी सुरक्षित आहे. नैसर्गिक सौंदर्य, वनराई असल्याने उन्हाळ्यात पश्चिम पट्ट्यात उष्णतेचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले जाते; परंतु यंदा या भागातही उष्णतेची लाहीलाही होत आहे.
प्राणी, पक्ष्यांचे स्थलांतर
साक्री तालुक्यात हजारो हेक्टर सुरक्षित वनक्षेत्र आहे. वनक्षेत्रात ससा, हरणे, कोल्हे, लांडगे, तरस, वानरे, बिबटे यांसारखे वन्यपशू तर मोर, तितर, कबुतरासारखे पक्षी वास्तव्यास आहेत. मुबलक पावसामुळे वनक्षेत्रातील पाणवठ्यात पाणीसाठाही होता. तीव्र उन्हामुळे पाणवठे आटत चालले आहेत.
पाण्याच्या शोधार्थ वन्यपशू महसूल क्षेत्रात येतात किंवा स्थलांतर करतात. स्थलांतर करून ते प्राणी जाणार कुठे, हाही प्रश्न आहेच. दर वर्षी वन्यपशूंची संख्या वाढत असल्याचे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सांगतात. जंगल संपत्तीच्या संवर्धनाबरोबरच पशुपक्ष्यांचेही संवर्धन होणे आवश्यक असल्याचे निसर्ग, पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.