Jalgaon News : खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पण कृषी यंत्रणा हलायला तयार नाहीत. हा प्रादुर्भाव असाच राहिल्यास नुकसानीची पातळी काही दिवसांत ५० टक्क्यांवर जाईल, अशीही स्थिती आहे.
खानदेशात यंदा ज्वारी, सोयाबीनऐवजी अनेकांनी मका लागवड केली आहे. कारण ज्वारी, कडधान्य पेरणीला उशीर झाला.
जळगाव जिल्ह्यात सुमारे ५० हजार हेक्टरवर, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत मिळून सुमारे ३० हजार हेक्टरवर मका पीक आहे. यात १८ ते २० दिवसांच्या पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. पीक पिवळे पडत आहे.
पाने अळ्या कुरतडत असून, पोंग्यामध्ये अळ्यांची संख्याही वाढत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हा प्रादुर्भाव सर्वत्र आहे. परंतु यावल, चोपडा, जळगाव या भागात अधिकचा प्रादुर्भाव दिसत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
धुळ्यात शिसपूर, धुळे, नंदुरबारमध्ये नवापूर, तळोदा तालुक्यात लष्करी अळी अधिक असल्याची माहिती मिळाली. सुमारे २० ते २२ हजार हेक्टरवर अळीचा प्रादुर्भाव आहे. वेळीच उपाय न केल्यास ही समस्या आणखी गंभीर बनू शकते.
काही शेतकरी कीटकनाशके, सोबत संप्रेरके, अन्नघटक फवारणीतून पिकाला देत आहेत. यासाठी एकरी १ हजार रुपये किमान खर्च लागत आहे. किमान तीन फवारण्या घ्याव्या लागतील. यामुळे हा खर्च एकरी तीन हजार किंवा यापेक्षा अधिक राहील, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे उत्पादन खर्च वाढेल.
कृषी व महसूल विभाग याबाबत नेहमीप्रमाणे दखल घेत नसल्याचे चित्र आहे. नुकसानीचे पंचनामे करायचे नाहीत, यासाठी नुकसान न झाल्याचे अहवाल वरिष्ठ व इतरांना पाठवायचे आणि नामानिराळे व्हायचे, अशीच भूमिका सध्या महसूल व कृषी विभागाची असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ही समस्या दरवर्षी येत आहे.
पण महसूल व कृषी विभागाच्या अंगकाढूपणामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याची स्थिती आहे. पिकांचे पंचनामे करून तातडीने पुढील कार्यवाही प्रशासनाने करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करून अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशके व इतर बाबी अनुदानातून पुरवाव्यात, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
बारा एकर मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे. कृषी पदवीधर असल्याने अळीची ओळख व तिला रोखण्याची कार्यवाही करू शकतो. परंतु याबाबत अनेक शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसल्याने कीटकनाशकांवरील खर्च वाढताना दिसतो. या अळीला शासनाने नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करून पुढील काम करावे.- देवेंद्र पाटील, शेतकरी, घाडवेल (ता. चोपडा, जि.जळगाव)
अमेरिकन लष्करी अळीची समस्या जळगाव जिल्ह्यात आली आहे. सध्याचे वातावरण अळीला पूरक आहे. या वातावरणात पाने कोवळी, मऊ असतात. त्यामुळे समस्या वाढते. या स्थितीत शेतकऱ्यांनी सर्वेक्षण व त्वरित उपायांची कार्यवाही करावी.- डॉ. हेमंत बाहेती, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद (ता. जळगाव)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.