पुणे ः राज्यात पुणे विभागात हरभऱ्याचे क्षेत्र मोठे असून, यंदा रब्बी हंगामात (Rabbi Sowing) हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. आतापर्यंत सरासरीच्या एक लाख ८२ हजार ११९ हेक्टरपैकी एक लाख ७७ हजार ७१४ हेक्टर म्हणजेच ९८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पेरणी झालेल्या ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत आहे, असे कृषी विभागाच्या (Agriculture Department) सूत्रांनी सांगितले.
मागील दोन वर्षांपासून हरभरा पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत. यंदाही शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची पेरणी केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी हरभरा पिकांमध्ये विद्यापीठाकडील विजय, विशाल यांसारख्या वाणाच्या हरभऱ्यांची पेरणी केली आहे. यंदा पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असताना हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पीककर्ज घेऊन रब्बीची तयारी केली आहे. अनेकांनी बैलाच्या व ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी केली आहे.
पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकांची पेरणी केली. परंतु ज्या ठिकाणी ओल कमी आहे, अशा ठिकाणी कमी प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. विभागात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली असून, सरासरीच्या १६ हजार ९५० हेक्टरपैकी २६ हजार ३०१ हेक्टर म्हणजेच १५५ टक्के पेरणी झाली आहे. तर उत्तर सोलापूर, बार्शी, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यांत चांगली पेरणी झाली आहे. तर दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली असून, सरासरीच्या ३ हजार ६७ हेक्टरपैकी ३ हजार २२१ हेक्टर म्हणजेच १०५ टक्के पेरणी झाली आहे. तर, उर्वरित तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे. ज्या ठिकाणी पेरणी झाली आहे, तेथे हरभरा उगवून आला असून, पिके वाढीच्या अवस्थेत आहे.
नगर तालुक्यात ११० टक्के पेरणी
नगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात १० हजार ४९ हेक्टरपैकी सुमारे ११ हजार ६१ हेक्टर म्हणजेच ११० टक्के पेरणी झाली आहे. तर पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, अकोला, श्रीरामपूर या तालुक्यांत ५० टक्क्यांहून अधिक, तर शेवगाव, पाथर्डी, राहुरी, राहाता या तालुक्यांत ५० टक्क्यांहून कमी पेरणी झाली आहे.
जिल्हानिहाय हरभरा पिकांची पेरणी, हेक्टरमध्ये
जिल्हा सरासरी क्षेत्र झालेली पेरणी टक्के
नगर ८८,३७७ ७५,२१४ ८५
पुणे ३४,३३० १६,७७९ ४९
सोलापूर ५९,४१२ ८५,७२१ ११४
एकूण १,८२,११९ १,७७,७१४ ९८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.