पुणे ः राज्यात मॉन्सून (Monsoon) दाखल होऊन तब्बल तीन महिने झाले आहेत. या कालावधीत चांगला पाऊस (Rainfall Maharashtra) झाल्याने धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील ३ हजार २६७ धरणांची उपयुक्त पाण्याची क्षमता (Useful Water Stock) सुमारे १४३९.६९ टीएमसी एवढी आहे. त्यापैकी धरणांमध्ये आतापर्यंत तब्बल १२१३.१५ टीएमसी म्हणजेच सरासरी ८४ टक्के उपयुक्त पाणीसाठा (Water Storage) झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा १९ टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे आगामी काळात भेडसावणारा पाणीप्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.
राज्यात दहा जूनच्या दरम्यान मॉन्सून दाखल झाला होता. सुरुवातीच्या काळात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असल्या तरी काही प्रमाणात खंड पडल्याचेही चित्र होते. मात्र जुलैमध्ये झालेला दमदार पाऊस आणि ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ झाली. पश्चिम पट्यातील घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस कोसळळा होता. जोरदार पावसामुळे लहान व मध्यम स्वरूपामध्ये असलेली उर्ध्व पैनगंगा, गोसी खुर्द, निम्न वर्धा, हतनूर, खडकवासला, चासकमान, वीर, गुंजवणी, घोड अशी अनेक धरणे भरत आल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. ऑगस्टमध्ये मोठ्या आकाराची असलेली उजनी, जायकवाडी, कोयना, वारणा, मुळा अशी धरणे भरली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटल्याने शेतकरीही विविध पिकांचे नियोजन करू लागला आहे.
राज्यात दोन्ही महिन्यांची सरासरी ओलांडली आहे. एक जून ते ४ सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात सरासरीच्या ८३८.५ मिलिमीटरपैकी ९८३.३ मिलिमीटर म्हणजेच १७ टक्के अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोकणात पावसाने सरासरी गाठली आहे. उर्वरित राज्यात सरासरीच्या तुलनेने अधिक पाऊस पडला आहे. जून महिन्यात राज्यात सरासरी असलेल्या २०९.८ मिलिमीटरपैकी अवघा १४७.५ मिलिमीटर म्हणजेच ७० टक्के पाऊस पडला होता. मात्र जुलै महिन्यात सुरुवातीपासून सुरू झालेला पाऊस अखेरच्या आठवड्यापर्यंत सातत्याने कोसळत राहिल्याचे दिसून आले. त्यातच २५ जुलैनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी ४ ऑगस्टपासून पुन्हा पावसाने बरसण्यास सुरुवात केली. त्यामुळे गोदावरी, बाघ, कन्हान, वैनगंगा, बावनथडी, वणा, मुठा, भीमा, कोयना, कृष्णा, पंचगंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
गेल्या वर्षी याच काळात धरणांत ६५ टक्के एवढा पाणीसाठा होता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे. सध्या कोकण विभागातील धरणे ओसंडून वाहत आहे. कोकणातील १७६ धरणांत ११२.९४ टीएमसी म्हणजेच सरासरी ९१ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. यामध्ये भातसा, सूर्याधामनी, मोडकसागर, तानसा, विहार, तुलसी, मध्य वैतरणा, बारावे या धरणे भरल्याने धरणांतून विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक विभागातील ५७१ धरणांत १७३.१० टीएमसी म्हणजेच ८१ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. यामध्ये दारणा, गंगापूर, भंडारदरा, मुळा, गिरणा, हतूनर, वाघूर अशी सर्वच धरणे भरली आहेत.
पुणे विभागातील ७२६ धरणांत ४७३.८६ टीएमसी म्हणजेच ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या विभागातील धरणांत ७५ टक्के पाणीसाठा होता. यंदा चांगलीच वाढ झाली आहे. विभागातील कोयना, राधानगरी, दुधगंगा, उजनी, भाटघर, पवना, पानशेत, खडकवासला, घोड अशी अनेक धरणे भरली आहेत. मराठवाड्यातील अनेक भागांत कमीअधिक पाऊस असल्याने ९६४ धरणांत १९६.०४ टीएमसी म्हणजेच ७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र नाशिक विभागातून पाण्याची आवक वाढल्याने जायकवाडी धरणांतील पाण्यामध्ये चांगलीच वाढ झाली असून, विसर्ग सोडण्यात आला येत आहे.
अमरावती विभागातील ४४६ धरणांत ११९.३९ टीएमसी म्हणजेच ८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या धरणांत ६९ टक्के पाणीसाठा होता. यंदा जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे ऊर्ध्व वर्धा, अरुणावती, इसापूर, बेंबळा, काटेपूर्णा, पेनटाकीळ, खडकपूर्णा या धरणांत चांगलाच पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागातील ३८४ धरणांत १३७.८० टीएमसी म्हणजेच ८४ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामध्ये इरई, पंच तोडलाडोह, इटियाडोह, निम्नवर्धा या धरणांत चांगलाच पाणीसाठा झाला असून, धरणांत येणाऱ्या येव्यानुसार विसर्ग कमीअधिक करण्यात येत आहे.
प्रकल्पनिहाय पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
प्रकल्प संख्या पाणीसाठा टक्के
मोठे प्रकल्प १४१ ९३९.०१ ९१
मध्यम प्रकल्प २५८ १५३.५० ८०
लघू प्रकल्प २८६८ १२०.६३ ५३
एकूण ३,२६७ १२१३.१५ ८४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.