ज्वारीकडे शेतकऱ्यांनी पाठ का फिरवली?

महाराष्ट्राच्या कृषी आणि खाद्यसंस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या ज्वारी पिकाची गेल्या २०-२५ वर्षांपासून घसरण सुरू आहे. आज एकीकडे आरोग्याबद्दल जागरूकता वाढल्यामुळे शहरी भागांत आहारामध्ये ज्वारीचा समावेश वाढल्याने मागणी वाढत आहे. पण दुसरीकडे ज्वारीचे लागवड क्षेत्र आणि उत्पादन मात्र घटत आहे.
Jowar Farming
Jowar FarmingAgrowon

महाराष्ट्राच्या कृषी आणि खाद्यसंस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या ज्वारी पिकाची गेल्या २०-२५ वर्षांपासून घसरण सुरू आहे. आज एकीकडे आरोग्याबद्दल जागरूकता वाढल्यामुळे शहरी भागांत आहारामध्ये ज्वारीचा समावेश वाढल्याने मागणी वाढत आहे. पण दुसरीकडे ज्वारीचे लागवड क्षेत्र आणि उत्पादन मात्र घटत आहे. ज्वारीपासून शेतकऱ्यांना खूपच कमी परतावा मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली आहे. ज्वारी पिकाला धोरणात्मक पातळीवरून भक्कम पाठबळ मिळाले तरच या पिकाला सोनेरी दिवस येऊ शकतात. गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची!

संयुक्त राष्ट्र महासभेने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष' (International Millet Year) म्हणून घोषित केले आहे. २०२२ चा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी भरडधान्य (millet) पिकांचे काढणी पश्चात मूल्यवर्धन (Value Addition), देशांतर्गत वापर आणि ब्रॅंडिंग यासाठी विशेष प्रोत्साहन देण्याची घोषणा केली. भरडधान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी आणि राई आदी पिकांचा समावेश होतो. मात्र सगळ्यात प्रमुख पीक म्हणजे ज्वारी. या पिकाची गेल्या २०-२५ वर्षांत मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. त्याला धोरणात्मक पातळीवरून उभारी मिळवून देणे आवश्यक आहे.

ज्वारी (Jowar Crop) हे पीक कोकण वगळता राज्यात सर्वत्र घेतले जाते. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे लागवड क्षेत्र जास्त आहे. सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. कापसापेक्षा ज्वारीतून जास्त उत्पन्न मिळते, असा मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांचा अलीकडचा अनुभव आहे. अगदी तीन-चार महिन्यांत निघणारे हे पीक आहे. खरीप हंगामात सोयाबीन, मूग, उडीद, तूर, धने इत्यादी पिके आणि रब्बी हंगामात ज्वारी असा त्यांचा पॅटर्न आहे. काळी जमीन असेल तर रब्बी ज्वारीला एकाही पाण्याची गरज नाही. जमिनीचा पोत कमी असेल तर दोन-तीन पाणी (भिजवनावर) मिळाले तरी शेतकऱ्यांच्या पदरात धान्य आणि कडबा पडणार याची खात्री. पाणी नाही मिळाले तर कमी वाढलेला कडबा (बाटूक) मिळतोच. ज्वारीचा पक्का-कच्चा चारा एक-दीड हजार रुपये शेकड्याने विकला जातो. जनावरे तो आवडीने खातात. त्यात पोषणघटक भरपूर प्रमाणात असतात.

रब्बी ज्वारीलाच पसंती

ज्वारी मुख्यतः रब्बी हंगामात घेतली जाते. पण खरिपातही संकरित वाण घेता येतात. परंतु खरिपात वातावरण पोषक नसणे, चवीला चांगले नसणे, कडबा कसदार नसणे आणि रोगराई या कारणांमुळे खरीप ज्वारीला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पूर्वापार ज्वारीची सर्वाधिक लागवड गोदावरी नदीच्या काठावरील परिसरात केली जाते. परभणी जिल्ह्यातल्या ताडकळस (ता. पालम) गावातील वयस्कर शेतकरी कामाजी आंभोरे सांगतात की, गोदावरी नदीच्या काठावरील गावांना ‘गंगथडी' म्हणलं जायचं. हा परिसर ज्वारीसाठी प्रसिद्ध होता. गंगथडी परिसरात ४०-५० वर्षापूर्वी ज्वारीच्या काढणीसाठी कोरडवाहू परिसरातून मजुरांची कुटुंबं स्थलांतरित व्हायची. अडीच-तीन महिने ज्वारीची काढणी-मळणी करून ते मजुरीच्या बदल्यात धान्य बैलगाडीने घेऊन जायचे. पण अलीकडे साखर कारखानदारीमुळे उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे ज्वारीचा पेरा घटला आहे. मालदांडी, गावरान, जामखेडी हे ज्वारीचे वाण प्रसिध्द आहेत. मालदांडी ज्वारीची भाकरी खमंग आणि चवदार असल्याने शहरातून मागणी जास्त आहे.

कमी परतावा

गेल्या तीन दशकांपासून राज्यात ज्वारीच्या लागवड क्षेत्रात आणि उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून येते. शेतीतील तुकडीकरणामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. मोठा शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकतो. मात्र मध्यम आणि लहान शेतकऱ्यांना आठवडी बाजारातील व्यापारी, आडते आणि स्थानिक व्यापारी यांच्याकडेच विक्री करावी लागते. ज्वारीमध्ये परतावा खूपच कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा हरभरा, घेवडा, राजमा आणि उन्हाळी सोयाबीनकडे वाढलेला आहे. नांदूर घाट (ता. केज, जि. बीड) येथील शेतकरी अमोल जाधव सांगतात की, ज्वारीला चांगला भाव मिळत नाही. ज्वारीच्या काढणीसाठी मजुरांवर मोठा खर्च होतो, तो परवडत नाही. ज्वारीपेक्षा हरभरा हे पीक चांगलं येतं. मजूरखर्च कमी आहे. त्यामुळे रब्बी ज्वारीऐवजी हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. जालना, परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांशी चर्चा केली असता हमीभावाचा प्रश्न आणि ज्वारी काढण्यासाठी मजुरांचा खर्च या कारणांमुळे त्यांनी ज्वारीकडे पाठ फिरवल्याचे दिसते.

दुसरीकडे या वर्षी खरिपात अतिवृष्टी आणि रब्बी हंगामात ढगाळ वातावरण, पाऊस, गारपीट, धुके यांचा सामना करावा लागला. त्याचा ज्वारी पिकावर मोठा परिणाम झाला. कधी नव्हे शेतकऱ्यांना रोगराईमुळे ज्वारी पिकावर फवारणी करावी लागली. तसेच वातावरणात गारवा असल्यामुळे ज्वारीवर ‘हिव' पडलेले पाहण्यास मिळाले. वाऱ्यामुळे ठिक-ठिकाणी ज्वारी भुईसपाट झाली होती. एकंदर यंदा ज्वारीचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगतात.

हमीभाव कागदावर

केंद्र सरकारने २०२१-२२ मध्ये संकरित ज्वारीला २७३८ रुपये प्रति क्विंटल (मालदांडी-२७५८ रु.) हमीभाव जाहीर केला. २०१९-२० साली संकरित ज्वारीला २५५० रुपये (मालदांडी-२७५० रु.) हमीभाव होता. दरवर्षी हमीभावात किरकोळ वाढ केली जाते. सरकारकडून ज्वारीची खरेदीच होत नसल्यामुळे हा हमीभाव कागदावरच राहतो.

ग्रामीण भागात ज्वारीला प्रति क्विंटल १९०० ते २२०० रुपये भाव चालू आहे. जुन्या ज्वारीला तर केवळ १५०० ते १७०० रूपये भाव मिळतो. पुणे-मुंबईसारख्या शहरांत मात्र भाव ४२००-४३०० रुपये आहे. इतर शहरांतही कमी-जास्त प्रमाणात अशीच स्थिती आहे. ज्वारीचा केवळ आटा तयार करून बंद पिशवीमधून किराणा दुकाने आणि मॉलमध्ये विकला तर ७५०० ते १२००० रुपये प्रति क्विंटल दर मिळतो. दरात इतकी तफावत का, हा मूळ प्रश्न आहे.

प्रक्रियेकडे दुर्लक्ष

ज्वारीपासून प्रकिया करून अनेक उत्पादने बनवता येतात. उदा. स्टार्च, द्रव ग्लुकोज, फ्रुक्टोज, इन्व्हर्ट सिरप, माल्ट व माल्टपासून बिअर, व्हिस्की, पोहे, स्नॅक्स, शेवया, ब्रेकफास्ट सिरियल, रवा आदी उत्पादने ज्वारीपासून तयार करता येतात. तसेच ज्वारीपासून जैवइंधनाचीही निर्मिती करता येते. मात्र सरकारी पातळीवर ज्वारीच्या प्रकिया उत्पादनांच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकिया उत्पादनाचे छोटे छोटे युनिट ग्रामीण भागात विकसित करणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा आणि बेरोजगारांना नोकरी-व्यवसायाचा स्त्रोत निर्माण होईल. ज्वारी पिकाला धोरणात्मक पातळीवरून भक्कम पाठबळ मिळाले तरच या पिकाला सोनेरी दिवस येऊ शकतात. गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची!

ज्वारीची घसरण

महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल २०२१-२२ च्या आकडेवारीनुसार २०००-०१ साली एकूण लागवड क्षेत्रापैकी ५०७४ हजार हेक्टरवर (३८.०६ टक्के) ज्वारीची लागवड होती. २०११-१२ साली हे क्षेत्र ४०६० हजार हेक्टरवर (३१.१७ टक्के) आले. तर २०२१-२२ मध्ये ते २३२० हजार हेक्टरवर (१९.८७ टक्के) घसरले. उत्पादनाताही उतरता आलेख आहे. २०००-०१ साली ३९८८ हजार टन उत्पादन झाले होते. २०११-१२ साली ३४५२ हजार टन, तर २०२१-२२ मध्ये २१८६ हजार टन उत्पादन मिळाले. यंदा तर ज्वारीचा पेरा खूपच घटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ज्वारीमधील ही घसरण भविष्यातील अन्न-धान्याच्या संकटाची जाणीव करून देणारी आहे.

-------------

(लेखक शेती, दुष्काळ, पाणी प्रश्नांचे अभ्यासक असून ‘द युनिक फाउंडेशन, पुणे' येथे वरिष्ठ संशोधक आहेत. )(somnath.r.gholwe@gmail.com)

९८८१९८८३६२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com