Kharif Crop Management : अतिपावसात पिकात कोणत्या उपाययोजना कराल?

Kharif Crop : मागील काही दिवसात बऱ्याच भागात अतिवृष्टी सदृश पाउस झाला. पाऊस झालेल्या भागात बऱ्याच काळापर्यंत शेतामध्ये पाणी साचून राहिल्याचे दिसून येत आहे. बऱ्याच पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
Paddy farming
Paddy farmingAgrowon

Heavy Rain : मागील काही दिवसात बऱ्याच भागात अतिवृष्टी सदृश पाउस झाला. पाऊस झालेल्या भागात बऱ्याच काळापर्यंत शेतामध्ये पाणी साचून राहिल्याचे दिसून येत आहे. बऱ्याच पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप पिकांच नुकसान होताना दिसत आहे. हे नुकसान रोखण्यासाठी ताबडतोब पिकांमधील पाण्याचा निचरा करणे अत्यंत आवश्यक आहे.

पावसाची शक्यता असल्यास फवारणीची कामे आणि वरखते देण्याची कामे पुढे ढकलावीत. पावसाचा अंदाज बघून पिकावर किटकनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणी करावी. ज्या भागात जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला असल्यास वाफसा येताच भारी जमिनीमध्ये आपत्कालीन पीक नियोजन करावे. आपत्कालीन पीक नियोजनानूसार  आंतरपीक पद्धतीने सुर्यफुल-तूर (२:१), तूर-कोथिंबीर (१:२), तूर-गवार (१:२) आणि मका यासारख्या पिकांची पेरणी करावी. पडणाऱ्या पावसाचे पाणी शेतात मुरविण्यासाठी उपाय योजना कराव्यात.आपल्या पिकाचे कीड व रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करुन जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास योग्य त्या उपाययोजना कराव्यात. पेरणी करुन १० ते १५ दिवस झालेल्या पिकामध्ये लोखंडी कोळप्याने कोळपणी किंवा खुरपणी करावी. त्यामुळे तण नियंत्रण व ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. 

Paddy farming
Sugarcane Management : अतिवृष्टिबाधित ऊस पिकात कोणत्या उपाययोजना कराव्यात?

भात पिकाच्या लागवडीसाठी भात खाचरात चिखलणी करुन २१ दिवस पूर्ण झालेल्या रोपांची लागवड करावी. भात पिकातील खोडकीडीच्या नियंत्रणासाठी पुनर्लागवडीपुर्वी रोपांची मुळे क्लोरपायरीफॉस २० टक्के इसी ०.१ टक्के द्रावणात १२ तास बुडवून ठेवावीत. नवीन लागवड केलेल्या भात खाचरात रोपे स्थिर होईपर्यंत पाण्याची पातळी १ ते २ सेंटीमीटर ठेवावी. ज्या ठिकाणी लागवड केलेली रोपे प्राथमिक अवस्थेत आहेत. तेथे २ ते ३ सेंमी पाण्याची पातळी ठेवावी. भात रोपवाटिकेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. जोरदार पावसात भात रोपे वाहून जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. सोयाबीन पिकात पीक उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक कोळपणी व नंतर खुरपणी करुन शेत तणमुक्त ठेवावे. मका पिकात पीक उगवणीनंतर कोवळे कोंब पक्षी उचलतात म्हणून पेरणीनंतर सुरुवातीच्या १० ते १२ दिवसांपर्यंत पक्ष्यांपासून संरक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे. मका पेरणीनंतर सुरुवातीच्या २० दिवसांपर्यंतच्या कालावधीत पिकात जास्त पाणी किंवा दलदलीची स्थिती असल्यास कोवळी रोपे पिवळी पडून मरतात. कारण मक्याची रोपावस्था या स्थितीस खूपच संवेदनशील असते. म्हणून पेरणीनंतरच्या सुरुवातीच्या २० दिवसांपर्यंतच्या काळात पिकात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तूर पिकात पेरणीनंतर उगवण न झालेल्या रिकाम्या जागी नांग्या भरण्याची कामे करावीत. पेरणी झालेल्या क्षेत्रात योग्य रोपांची संख्या राखण्यासाठी पिकाची विरळणी करावी जेणेकरुन जमिनीतील ओलावा व अन्नद्रव्यासाठी पिकांची परस्परांशी स्पर्धा होणार नाही.

आडसाली ऊस लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करुन रानबांधणी आखणी पूर्ण करावी. आडसाली उसाची लागवड करताना को-८६०३२ व कोएम-०२६५ या शिफारशीत जातींचा वापर करावा. केळी बागेतील जमीन स्वच्छ व भुसभुशीत ठेवावी. त्याकरिता उभी आडवी कुळवणी करावी. दर तीन महिन्याच्या अंतराने टीचणी बांधणी करावी. झाडांना मातीची भर द्यावी. केळीच्या बुंध्यालगत अनेक पिले येऊ लागतात. ती वेळच्यावेळी धारदार कोयत्याने नियमित काढून टाकावीत. केळीची रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नष्ट करावीत. हिरवी पाने कापू नयेत. आवश्यकता भासल्यास झाडाला आधार द्यावा. अशा प्रकारे पावसाच्या तिव्रतेनूसार पिकाचे नियोजन केल्या होणार नुकसान टाळता येतं.

------------------

माहिती आणि संशोधन - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com